क्रीडा

कामगिरीत सातत्य राखण्याचे ध्येय! गुजरात टायटन्स चौथ्या, तर दिल्ली कॅपिटल्स तिसऱ्या विजयासाठी उत्सुक

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी रात्री रंगणाऱ्या लढतीत गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स कामगिरीत सातत्य राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील.

Swapnil S

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी रात्री रंगणाऱ्या लढतीत गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स कामगिरीत सातत्य राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात गुजरात हंगामातील चौथ्या, तर दिल्ली तिसऱ्या विजयासाठी उत्सुक असेल. त्यामुळे चाहत्यांना कडवी झुंज पाहायला मिळू शकते.

यंदा प्रथमच शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने आतापर्यंतच्या सहापैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आहे, तर तीन लढतींमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या सामन्यात गुजरातने राजस्थानला अखेरच्या चेंडूवर नमवले होते. २०२२चा विजेता गुजरातचा संघ तूर्तास गुणतालिकेत सहाव्या स्थानी असून घरच्या मैदानावरील तीनपैकी दोन लढती त्यांनी जिंकल्या आहेत. त्यामुळे ते आता पुन्हा एकदा चाहत्यांच्या पाठिंब्याचा लाभ उचलून कामगिरी उंचावण्यास आतुर असतील.

दुसरीकडे ऋषभ पंतच्या दिल्लीने सहापैकी दोन सामने जिंकले आहेत. तूर्तास गुणतालिकेत नवव्या स्थानी असलेल्या दिल्लीने चेन्नई व लखनऊ यांसारख्या दमदार संघांना नमवले आहे. विशेषत: लखनऊविरुद्ध त्यांच्या गोलंदाजांनी कामगिरीत सुधारणा केली. त्यामुळे आता अहमदाबादच्या खेळपट्टीवर ते कसा खेळ करणार, हे पाहणे रंजक ठरेल. मोदी स्टेडियमवर २०० धावांचा पाठलाग करणेही सोपे असून येथे दुसऱ्या डावात दवाचा घटक मोलाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला किमान २००हून अधिक धावसंख्या उभारावी लागेल.

गिल, रशिदवर गुजरातच्या आशा

कर्णधार शुभमन गिलने आतापर्यंत दोन अर्धशतकांसह या स्पर्धेत गुजरातकडून २५५ धावा केल्या आहेत. त्याला साई सुदर्शन व राहुल तेवतिया यांची उत्तम साथ लाभत आहे. मात्र अनुभवी डेव्हिड मिलरला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मॅथ्यू वेड संघात परतल्याने केन विल्यम्सनला पुन्हा एकदा संघाबाहेर बसावे लागू शकते. गोलंदाजीत अफगाणी फिरकी जोडी रशिद खान व नूर अहमद यांच्याकडे सर्वांच्या नजरा असतील. रशिदने राजस्थानविरुद्धच्या लढतीत सामनावीर पुरस्कार पटकावून सूर गवसल्याचे संकेत दिले. त्याशिवाय मोहित शर्मा गुजरातसाठी हुकमी एक्का ठरत आहे. मात्र उमेश यादव व स्पेन्सर जॉन्सन धावा रोखण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे गोलंदाजी विभाग व गिलवर अति विसंबून राहणे गुजरातसाठी धोकादायी ठरू शकते.

पंत, कुलदीपवर दिल्लीची भिस्त

पंतने गेल्या चार सामन्यांत दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे त्याच्याकडे पुन्हा एकदा लक्ष असेल. त्याशिवाय मुंबईकर पृथ्वी शॉ व पदार्पणातच अर्धशतक साकारणारा जॅक फ्रेसर-मॅकगर्क धडाकेबाज सुरुवात करून देऊ शकतात. डेव्हिड वॉर्नर व अक्षर पटेल यांचे फलंदाजीतील अपयश दिल्लीसाठी चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीत चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव दिल्लीचे प्रमुख अस्त्र आहे. खलिल अहमद, मुकेश कुमाक व इशांत शर्मा यांचे वेगवान त्रिकुट प्रभावी मारा करत आहे. मात्र आनरिख नॉर्किए अथवा झाय रिचर्डसनला दिल्ली पुन्हा संधी देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. मिचेल मार्श मायदेशी माघारी परतल्याने दिल्लीला अष्टपैलू खेळाडूची उणीव जाणवत आहे. अभिषेक पोरेल व ट्रिस्टन स्टब्स यांनी गेल्या काही लढतींमध्ये चमक दाखवली आहे.

प्रतिस्पर्धी संघ

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यम्सन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, आर. साईकिशोर, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अझमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरूख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुतार, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर, बी. आर. शरथ.

दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, स्वस्तिक चिकारा, यश धूल, आनरिख नॉर्किए, इशांत शर्मा, झाए रिचर्डसन, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रसिक दर, विकी ओस्तवाल, अक्षर पटेल, जेक फ्रेसर-गर्क, ललित यादव, सुमित कुमार, अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्र, रिकी भूई, शाय होप, ट्रिस्टन स्टब्स, लिझाड विल्यम्स.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी