क्रीडा

फिरकीपटूंच्या द्वंद्वाची आज पर्वणी! जयपूर येथे अग्रस्थानावरील राजस्थानची चाचपडणाऱ्या गुजरातशी गाठ

Swapnil S

जयपूर : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्स संघ सलग चार विजयांसह गुणतालिकेत अग्रस्थानी विराजमान आहे. मात्र मुंबईकर सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या कामगिरीची त्यांना चिंता आहे. त्यामुळे बुधवारी घरच्या मैदानात गुजरात टायटन्सशी दोन हात करताना यशस्वीला सूर गवसणार का, हे पाहणे रंजक ठरेल. त्याशिवाय दोन्ही संघांत मातब्बर फिरकीपटूंचा समावेश असल्याने चाहत्यांना ‘फिरकीचे द्वंद’ अनुभवता येईल.

जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियमवर ही लढत होणार असून येथे यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांत राजस्थानने बाजी मारली आहे. त्यामुळे त्यांचे पारडे निश्चितच पुन्हा एकदा जड असेल. राजस्थानने लखनऊ, दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू यांच्यावर एकतर्फी विजय मिळवले आहेत. विशेषत: गेल्या सामन्यात त्यांनी बंगळुरूने दिलेले १८३ धावांचे लक्ष्य सहज गाठून अन्य संघांना इशारा दिला आहे. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने किमान २०० धावा करणे अपेक्षित आहे.

दुसरीकडे युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने पाचपैकी तीन सामने गमावले असून दोन विजयांसह ते गुणतालिकेत सातव्या स्थानी आहेत. मुंबई आणि हैदराबादला नमवणाऱ्या गुजरातला चेन्नई, पंजाब, लखनऊकडून हार पत्करावी लागली. मात्र गेल्या सामन्यात लखनऊविरुद्ध बिनबाद ५४ अशा स्थितीतूनही गुजरातचा संघ १३० धावांत गारद झाला. त्यामुळे त्यांना फलंदाजीकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. राजस्थानचे रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल या ऑफस्पिनर-लेगस्पिनरच्या फिरकी जोडीविरुद्ध गुजरातचे रशिद खान-नूर अहमद या अफगाणी फिरकी जोडीतील जुगलबंदी सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने मोलाची ठरणार आहे.

अश्विन, यशस्वीची राजस्थानला चिंता

यशस्वीने चार सामन्यांत अनुक्रमे २४, ५, १०, ० अशा ३९ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडून आता कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. मात्र त्या व्यतिरिक्त राजस्थानचा संघ उत्तम लयीत आहे. जोस बटलरने गेल्या सामन्यात शतक झळकावून सूर मिळवला. त्याशिवाय सॅमसन, रियान पराग सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. शिम्रॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांना पुरेशी संधी मिळालेली नाही. गोलंदाजीचे पंचक ही राजस्थानची ताकद आहे. ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर आणि आवेश खान यांचे वेगवान त्रिकुट व अश्विन-चहलची फिरकी जोडी यामुळे राजस्थानविरुद्ध धावा करणे अन्य संघांना कठीण जात आहे. मात्र अश्विनने पाच लढतींमध्ये एकच बळी मिळवला आहे, हेसुद्धा विशेष. सध्या सांघिक कामगिरी पाहता राजस्थान गुजरातच्या तुलनेत वरचढ आहे.

रशिद, मिलरकडून गुजरातला अपेक्षा

लेगस्पिनर आणि गुजरातचा मॅचविनर रशिदला या हंगामातील पाच सामन्यांत फक्त पाचच बळी मिळाले आहेत. तसेच फलंदाजीतही तो अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याचे योगदान संघासाठी मोलाचे असेल. त्याशिवाय डेव्हिड मिलर दुखापतीतून सावरत संघात परतला आहे. त्यामुळे केन विल्यम्सन संघाबाहेर जाण्याची शक्यता आहे. रशिदव्यतिरिक्त नूर आणि अझमतुल्ला ओमरझाई या अफगाणी खेळाडूंकडे चाहत्यांचे लक्ष असेल. फलंदाजीत कर्णधार गिल व साई सुदर्शन सातत्याने धावा करत आहेत. मात्र विजय शंकर सपशेल अपयशी ठरला आहे. तसेच उमेश यादवही धावा लुटत असल्याने मोहित शर्मावर अतिरिक्त दडपण येत आहे. मोहम्मद शमीची उणीव गुजरातला जाणवत आहे.

प्रतिस्पर्धी संघ

  • गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यम्सन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, आर. साईकिशोर, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अझमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरूख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुतार, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर, बी. आर. शरथ.

  • राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), अबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल सिंग राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिम्रॉन हेटमायर, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, टॉम कोल्हर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल, तनुष कोटियन, केशव महाराज, आवेश खान.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल