धरमशाला : भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना गुरुवार, ७ मार्चपासून धरमशाला येथे सुरू होईल. भारताचा ३७ वर्षीय अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या कारकीर्दीतील ही शतकी म्हणजेच १००वी कसोटी असेल. कारकीर्दीत विविध टप्प्यांवर निराशा आणि अपयश पचवावे लागले, तर कधी मिळालेल्या संधीचे सोनेही केली. त्यामुळेच अजूनही क्रिकेटच्या रणभूमीत टिकून आहे, अशा शब्दांत अश्विनने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेत अश्विनने आतापर्यंत १७ बळी मिळवले आहेत. त्याने तिसऱ्या कसोटीत ५०० बळींचा टप्पाही गाठला. ९९ कसोटी सामने खेळलेल्या अश्विनच्या खात्यात २३.९१च्या सरासरीने ५०७ बळी जमा आहेत. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान अश्विनने १३ वर्षांच्या कारकीर्दीला उजाळा दिला. यावेळी त्याने कारकीर्दीतील कलाटणी देणारा क्षण तसेच कटू अनुभवही सांगितले.
“गोलंदाजांना नेहमीच फलंदाजांच्या तुलनेत वेगळा न्याय लागू असतो. त्यामुळेच मी गोलंदाजांच्या हक्कासाठी झटत आलो आहे. कारकीर्दीत अनेकदा उत्तम कामगिरी करत असतानाही मला संघाबाहेर बसावे लागले. मात्र माझ्या अनुपस्थितीतही संघ जिंकत असेल, तर सर्वात आनंदी मीच असतो. हे तुम्ही ड्रेसिंग रूममधील कुणालाही विचारू शकता. सुरुवातीच्या काळात निराशा व अपयश पचवणे खरंच अवघड होते. नंतर याची सवय झाल्याने मी कामगिरीत सुधारणा केली. त्यामुळेच आजपर्यंत टिकून आहे,” असे अश्विन म्हणाला.
“फलंदाजीची आवड असताना जेव्हा फिरकीपटू म्हणून पूर्णपणे गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. त्यावेळी १०० कसोटी खेळू शकेन, असा विचारही केला नव्हता. कारकीर्दीत निश्चितच असंख्य चढ-उतार पाहिले. मात्र माझ्यापेक्षा माझे कुटुंबीय विशेषत: वडील या क्षणी अत्यंत आनंदी असतील, हे मी खात्रीने सांगू शकतो. देशाचे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत प्रतिनिधित्व करणे, हेच स्वप्न मी उराशी बाळगले होते. आता १००व्या कसोटीच्या उंबरठ्यावर असताना मागे वळून पाहताना संपूर्ण कारकीर्द डोळ्यांसमोर उभी राहते,” असेही अश्विनने प्राजंळपणे नमूद केले. अश्विन हा भारतासाठी १०० कसोटी खेळणारा १४वा क्रिकेटपटू ठरणार आहे, त्यामुळे या कसोटीत त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.
२०१२च्या मालिकेमुळे कलाटणी
२०१२ला इंग्लंडचा संघ जेव्हा भारतात कसोटी मालिकेसाठी आला. त्यावेळी ॲलिस्टर कूक, केव्हिन पीटरसन यांनी माझ्याविरुद्ध सहज धावा केल्या. भारताने मायदेशात गमावलेली ती अखेरची कसोटी मालिका ठरली. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मला वगळण्यात येईल, अशाही चर्चा रंगू लागल्या. तसेच माझ्याविषयी वृत्तपत्रांमध्ये व माजी क्रिकेटपटूंकडून नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. त्यावेळी काहीसा निराश नक्कीच झालो. मात्र माझी कामगिरी इतकीही खराब नव्हती. या मालिकेद्वारे मग मी गोलंदाजीवर अधिक मेहनत घेतली व यशाचे शिखर एकमागून एक सर केले, अशा शब्दांत अश्विनने कारकीर्दीला कलाटणी देणारा क्षण तसेच खडतर काळातील आठवण सांगितली.
२०१८चा बर्मिंगहॅम येथील स्पेल संस्मरणीय
२०१८मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यात बर्मिंगहॅम येथील कसोटीत अश्विनने सात बळी मिळवले. वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर त्याने कूक, जो रूट असे महत्त्वाचे फलंदाज बाद केले. भारतीय संघाने ही कसोटी ३१ धावांनी गमावली. मात्र कारकीर्दीतील तो स्पेल नेहमीच स्मरणात राहील, असे अश्विन म्हणाला. त्यानंतर बंगळुरू २०१७ विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि सेंच्युरियन २०१८ येथे आफ्रिकेविरुद्धची कामगिरी मला सातत्याने प्रेरित करते, असेही अश्विनने नमूद केले.