नवी दिल्ली : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याच्या उजव्या पायाच्या नडगीला (शिन) पुन्हा दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे तो आगामी न्यूझीलंडच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यासह किमान तीन आठवडे स्पर्धात्मक क्रिकेटमधून बाहेर राहण्याची शक्यता आहे.
पंड्याचे मैदानात पुनरागमन
करण्यासाठी २० सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती आणि त्यानुसार निवडकर्त्यांनी ऑस्ट्रेलिया 'अ' संघाविरुद्ध ६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी इंडिया 'अ' संघात त्याची निवड केली होती. मात्र, त्याच्या ताज्या स्कॅन रिपोर्टमध्ये उजव्या नडगीला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याला दोन आठवडे पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
'बीसीसीआय'च्या वैद्यकीय पॅनेलचे प्रमुख डॉ. दिनशॉ पर्डीवाला जपानहून परतल्यानंतर पंड्याची तपासणी करतील.
चार महिन्यांत तीनदा जायबंदी
हार्दिक पंड्या आयपीएल संपल्यापासून बेंगळुरू येथे वास्तव्यास असून तो तेथील 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये सराव करत आहे. गेल्या चार महिन्यांत अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका, इंग्लंड द्वेन्टी-२० आणि आता ऑस्ट्रेलिया 'अ' मालिकेदरम्यान त्याला तीनदा दुखापतीचा सामना करावा लागला आहे. पंड्याला आता झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची किंवा विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.