बार्बडस: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शनिवारी (२९ जून) इतिहास रचला आणि T20 विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला. या विजयात अष्टपैलू हार्दिक पांड्याची भूमिका महत्त्वाची ठरली.
फायनलमध्ये धोकादायक ठरत असलेला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेन्रिक क्लासेनला पायचीत करून पंड्यानेच भारतीय संघाला सामन्यात परत आणलं. शिवाय पंड्यानेच शेवटचे षटक टाकले, ज्यामध्ये आफ्रिकेला विजयासाठी १६ धावांची गरज होती. पण या षटकात हार्दिकने केवळ ८ धावा दिल्या आणि १ बळी घेत संघाला चॅम्पियन बनवले.
हा तोच हार्दिक पांड्या आहे, जो या T20 विश्वचषकापूर्वी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात प्रचंड ट्रोल झाला होता. मुंबई इंडियन्स (MI) फ्रँचायझीने रोहित शर्माच्या जागी पंड्याला कर्णधार बनवले होते. त्यानंतर प्रत्येक स्टेडियममध्ये पांड्याला प्रेक्षकांकडून तिरस्काराचा सामना करावा लागला होता.
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक म्हणाला, "चाहत्यांनी आणि सर्वांनी संयमी राहायला हवं. आपले आचरण चांगलं असलं पाहिजे. मला खात्री आहे की, आता ते लोक आनंदी असतील. खरं सांगायचं तर मला मजा येत होती. आयुष्य बदलून टाकणाऱ्या अशा संधी फार कमी लोकांना मिळतात. या गोष्टींचा उलट परिणामही होऊ शकतो., पण मला ग्लास अर्धा भरलेला दिसतो, अर्धा रिकामा नाही."
T20 विश्वचषकातील हार्दिकची कामगिरी कशी होती?
स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने या T20 विश्वचषकात एकूण ८ सामने खेळले, ज्यात त्याने ४८ च्या सरासरीने १४४ धावा केल्या. सोबतच एक फिक्टीही केली. या विश्वचषकातील त्याची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद ५० धावा. पांड्या गोलंदाजीतही हिट ठरला. त्याने एकूण २५ षटके टाकली, १७.३६च्या सरासरीने ११ बळी घेतले. २० धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
टी-20 विश्वचषकातील हार्दिकचा प्रवास-
- हार्दिकने न्यूयॉर्कमध्ये आयर्लंडविरुद्ध २७ धावांत ३ बळी
- हार्दिकने न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानविरुद्ध ७ धावा, २४ धावांत २ बळी
- हार्दिकने न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेविरुद्ध २ विकेट
- हार्दिकने अफगाणिस्तानविरुद्ध ३२ धावांची खेळी
- हार्दिकने बांगलादेशविरुद्ध तुफानी शैलीत नाबाद ५० धावा, एक विकेट
- हार्दिकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २७ धावांची नाबाद खेळी
- हार्दिकने इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात २३ धावा
- हार्दिकने फायनलमध्ये २० धावांत ३ विकेट