चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : दिलप्रीतमुळे भारताचा सलग पाचवा विजय (Photo-X)
क्रीडा

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : दिलप्रीतमुळे भारताचा सलग पाचवा विजय

पाच वेळच्या विजेत्या भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपला विजयी धडाका कायम राखला आहे.

Swapnil S

जालंधर : पाच वेळच्या विजेत्या भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपला विजयी धडाका कायम राखला आहे. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा ८-० असा धुव्वा उडवला. या विजयासह भारताने पाचही सामने जिंकत १५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. आता उपांत्य फेरीत भारताची पुन्हा एकदा दक्षिण कोरियाशी गाठ पडणार आहे.

सोमवारी झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. दिलप्रीत सिंगने आठव्या आणि ४०व्या मिनिटाला गोल करत दोन गोलची नोंद केली. त्याच्याशिवाय जुगराज सिंग (११वे मिनिट), कर्णधार हरमनप्रीत सिंग (१५वे), शिलानंद लाक्रा (३३वे), सुखजीत सिंग (३४वे), संजय (३६वे) आणि अंगद बीर सिंग (६०वे) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

भारताने चौथ्याच मिनिटाला गोल करण्याचा प्रयत्न केला होता. कर्णधार हरमनप्रीतच्या पासवर सुखजीतने रिव्हर्स हिट मारला, मात्र दक्षिण कोरियाचा गोलरक्षक जेह्यॉन किम याने चांगला बचाव केला. अखेर आठव्या मिनिटाला जर्मनप्रीत सिंगच्या पासवर दिलप्रीतने रिव्हर्स हिटद्वारे गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. ११व्या मिनिटाला दक्षिण कोरियाला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले; मात्र त्यांना त्याचा फायदा घेता आला नाही. याचाच फायदा घेत जुगराजने रिबाउंडवर गोल करत भारताची आघाडी २-० केली. त्यानंतर १५व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने अचूक ड्रॅगफ्लिक मारत तिसरा गोल केला.

उत्तरार्धात भारताने गोलांचा वर्षाव सुरूच ठेवला. ३३व्या मिनिटाला शिलानंदने पेनल्टी कॉर्नरवरील रिबाउंडवर गोल केला. त्यानंतर अवघ्या एका मिनिटात सुखजीतने मैदानी गोल नोंदवला. ३६व्या मिनिटाला संजयनेही गोल करत भारताची आघाडी ६-० केली. ४०व्या मिनिटाला संजयच्या फटक्याला हलका स्पर्श करत दिलप्रीतने आपला दुसरा गोल केला. अखेरच्या मिनिटाला अंगद बीर सिंगने रिव्हर्स हिटवर अप्रतिम मैदानी गोल करत भारताच्या ८-० विजयावर शिक्कामोर्तब केले.

गुणतालिकेत भारत अव्वल

पाच विजयांसह १५ गुणांची कमाई करत भारताने साखळी फेरीत अपराजित राहण्याचा पराक्रम केला. भारताकडून हरमनप्रीतने स्पर्धेत सर्वाधिक ९ गोल केले आहेत. भारताने अनुक्रमे बांगलादेश, चीन, जपान, मलेशिया व कोरिया यांना धूळ चारली. त्यामुळे पाच वेळच्या विजेत्या भारतालाच जेतेपदाची संधी आहे.

उपांत्य फेरीत पुन्हा कोरियाचे आव्हान

भारताने यापूर्वी बांगलादेशला १३-०, चीनला ५-२, जपानला ४-१ आणि मलेशियाला ४-२ असे पराभूत केले आहे. पाचही सामने जिंकून भारताने साखळी फेरीत निर्विवाद वर्चस्व राखले. स्पर्धेचा अंतिम टप्पा आता मोहाली येथे रंगणार आहे. बुधवारी भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात पहिला उपांत्य सामना होईल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मलेशियाची जपानशी गाठ पडेल.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तिकीट दरांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सरकारला अधिकार; प्रवासी भाड्याबाबत नवे नियम जाहीर

Mumbai : शिक्षक मारहाण प्रकरण; अखेर १० वर्षांनी महापौर रितू तावडे न्यायालयात हजर

Gold Rate Hike : दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत वाढ; चांदी स्थिर

Mumbai : ११०० कोटींच्या थकबाकीमुळे महालॅब, डायलिसिस केंद्रांना टाळे

दिवाळीत पाणी कपात स्थगित; ठाणेकरांना किंचित दिलासा; स्टेमपाठोपाठ MIDC चा निर्णय