PTI
क्रीडा

क्रिकेट भारतीयांचा श्वास; मात्र हॉकीतील पदक खास! निवृत्त गोलरक्षक पी. आर. श्रीजेशची भावना

क्रिकेट हा एक सुंदर खेळ असून देशातील असंख्य चाहत्यांसाठी तो जणू श्वास आहे. मात्र पॅरिस ऑलिम्पिकमधील हॉकी संघाने मिळवलेले पदकही तितकेच खास आहे.

Swapnil S

पॅरिस : क्रिकेट हा एक सुंदर खेळ असून देशातील असंख्य चाहत्यांसाठी तो जणू श्वास आहे. मात्र पॅरिस ऑलिम्पिकमधील हॉकी संघाने मिळवलेले पदकही तितकेच खास आहे. अनेकांच्या या खेळाशी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून भावना जोडल्या गेल्या आहेत, अशा शब्दांत भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने त्याचे मत मांडले.

३६ वर्षीय श्रीजेशने गुरुवारी हॉकीतून निवृत्ती पत्करली. भारताने स्पेनला २-१ असे नमवून सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले. ५२ वर्षांनी प्रथमच लागोपाठच्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात भारतीय हॉकी संघ यशस्वी ठरला. तसेच हॉकीतील हे एकंदर १४वे ऑलिम्पिक पदक होते. भारताचे ३३६ सामन्यांत प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीजेशने या ऑलिम्पिकमध्ये ६२पैकी ५० हल्ल्यांचा भक्कमपणे बचाव करून संघाच्या वाटचालीत मोलाची भूमिका बजावली.

“क्रिकेटचे भारतात असंख्य चाहते आहेत. अनेकांसाठी तो श्वास आहे, हे माझ्यासह तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. मात्र स्वातंत्र्यापूर्वीपासूनच हॉकीशी भारताचे भावनिक नाते आहे. भारताने या खेळात ८ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यामुळे यंदा भारतीय संघाने पॅरिसमध्ये पटकावलेले कांस्यपदकही तितकेच खास आहे. दोन्ही खेळांची तुलना करणे अयोग्य आहे,” असे श्रीजेश म्हणाला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ऑलिम्पिकपूर्वी भारतीय संघाची भेट घेतली, तेव्हा अन्य क्रीडा प्रकारांच्या तुलनेत भारतीय हॉकी संघ जेव्हा ऑलिम्पिक पदक जिंकते, त्याचा आनंद व समाधान निराळेच असते, असे सांगितले. चाहत्यांचाही या वाटचालीत अमूल्य वाटा आहे. गेली ४-५ वर्षे भारतीय हॉकीसाठी संस्मरणीय ठरली असून यापुढेसुद्धा आपले तारे देशाचे नाव उज्ज्वल करत राहतील,” असेही श्रीजेशने अखेरीस सांगितले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?