कौलून : हाँगकाँग ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीची शानदार कामगिरी उपांत्य फेरीत संपुष्टात आली. शनिवारी झालेल्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात मलेशियाच्या आठव्या मानांकित मॅन वेई चोंग आणि टी काई वुन या जोडीने भारतीय जोडीचा सरळ गेममध्ये २१-१८, २१-१९ असा पराभव केला.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सात्विक-चिराग जोडीला अवघ्या ४१ मिनिटांत पराभव स्वीकारावा लागला. या वर्षी सिंगापूर आणि चीनमध्ये दोन विजेतेपदे मिळवणाऱ्या भारतीय जोडीची स्पर्धेतील आगेकूच थांबली.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या मलेशियन जोडीविरुद्ध सात्विक-चिराग यांचा यापूर्वी ४-१ असा विजय पराभवाचा विक्रम होता. मात्र, २०२५ मधील इंडोनेशिया ओपनमध्ये मलेशियन जोडीने भारताला पराभूत केले होते.
अपेक्षेप्रमाणे सामना वेगवान आणि आक्रमक झाला. दोन्ही जोड्यांनी सुरुवातीपासून आक्रमणावर भर दिला. भारतीय जोडीने ३-० अशी आघाडी घेतली, मात्र मलेशियन जोडीने लगेच बरोबरी साधली. दोन्ही बाजूंनी चपळ रॅली, कोनातून मारलेले फटके आणि अचूक प्लेसमेंटचा वापर केला. ४-४ वरून ७-७ अशी बरोबरी झाली. चिरागने जोरदार स्मॅश मारत गुण मिळवून भारताला बरोबरीत आणले. नेटजवळ भारतीयांची बचावात्मक कामगिरी चांगली होती. मलेशियन आक्रमणाला त्यांनी प्रभावीपणे रोखले. दोन्ही बाजूंचा फटक्यांची निवड आणि खेळाचा दर्जा उच्च होता.
सात्विक चिराग यांनी शटल सपाट ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र चुका निर्णायक ठरल्या. १०-१० अशी बरोबरी असताना मलेशियन जोडीने अचूक फटका कोपऱ्यात मारून मध्यंतरापूर्वी एका गुणाची आघाडी घेतली. टी काई वुनने शानदार खेळ करत मलेशियन जोडीला १६-१२ अशी आघाडी मिळवून दिली. मलेशियन जोडीने दोन गेम पॉइंट मिळवले आणि पहिलाच गेम पॉइंट साधत गेम जिंकला. मॅनने सात्विकच्या शरीरावर फटका मारून निर्णायक गुण मिळवला.
दुसऱ्या गेममध्येही तीव्रता कायम राहिली. भारतीय जोडीने ७-३ अशी आघाडी घेतली, मात्र मॅन आणि टी यांनी सलग सहा गुण मिळवत ९-७ अशी आघाडी घेतली. मध्यंतराला मलेशियन जोडी दोन गुणांनी पुढे होती. त्यानंतर त्यांनी आघाडी १४-९ अशी वाढवली.
सात्विक-चिराग यांनी हळूहळू पुनरागमन केले. चिरागच्या सर्व्हिसला शॉर्ट सर्व्हिस फॉल्ट ठरवल्यानंतर भारत १५-१८ असा पिछाडीवर होता. मलेशियन जोडीच्या दोन नेटवरील चुका आणि चिरागच्या जोरदार स्मॅशमुळे भारताने १८-१९ अशी आघाडी कमी केली. त्यानंतर चांगली रॅली जिंकत भारतीयांनी १९-१९ अशी बरोबरी साधली. मात्र, मलेशियन जोडीने चिरागला लक्ष्य करत मॅच पॉइंट मिळवला आणि कोपऱ्यात अचूक पुश मारून सामना जिंकला. दरम्यान, भारताचा लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या तिसऱ्या मानांकित अँडर्स अँटोनसेनशी भिडणार आहे.
लक्ष्यची विजयी घोडदौड संपुष्टात
डेन्मार्कच्या अॅडर्स अँटोनसेनने लक्ष्य सेनचा २१-१३, २१-१३ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या पराभवामुळे लक्ष्यची गेल्या दोन आठवड्यांतील विजयी घोडदौड संपुष्टात आली. लक्ष्यने या कालावधीत हायलो ओपन आणि कुमामोटो मास्टर्स जपान या स्पर्धामध्ये विजेतेपद पटकावले होते. पहिल्या गेममध्ये ८-८ अशी बरोबरीनंतर अॅटोनसेनने घेतलेली आघाडी कायम ठेवत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यच्या किंचित मंदावलेल्या हालचालींचा फायदा उठवत अँटोनसेनने बाजी मारली.