@egend_rohit45/ Instagram
क्रीडा

रोहितकडे नेतृत्व; विराटला वगळले! आयसीसीच्या टी-२० विश्वचषक संघात भारताचे एकूण ६ खेळाडू

प्रथेप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी यंदाच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला.

Swapnil S

बार्बाडोस : प्रथेप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी यंदाच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला. या संघाचे नेतृत्व भारताचा विश्वविजेता कर्णधार रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. तसेच भारताच्या एकूण सहा खेळाडूंना या संघात स्थान लाभले आहे. मात्र तारांकित फलंदाज विराट कोहलीला या संघातून वगळण्यात आले आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने शनिवारी दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी सरशी साधून दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक उंचावला. २००७ नंतर भारताने प्रथमच ही स्पर्धा जिंकली, तर २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचे हे पहिलेच आयसीसी जेतेपद ठरले. मुख्य म्हणजे या स्पर्धेत भारताने अखेरपर्यंत अपराजित राहून जगज्जेतेपद काबिज केले. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील संघाचे नेतृत्वही रोहितकडेच सोपवण्यात आले होते.

३७ वर्षीय रोहितने यंदाच्या टी-२० विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक २५७ धावा केल्या. यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश होता. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रोहित अफगाणिस्तानच्या रहमनुल्ला गुरबाझनंतर (२८१ धावा) दुसऱ्या स्थानी होता. दुसरीकडे विराटने मात्र या स्पर्धेत ८ सामन्यांत फक्त १५१ धावा केल्या. अंतिम लढतीत त्याने निर्णायक ७६ धावांची खेळी साकारली. मात्र त्यापूर्वीच्या ७ लढतींमध्ये विराटला ७५ धावाच फटकावता आल्या होत्या. त्यामुळे विराटला या संघात स्थान लाभलेले नाही.

दरम्यान, सूर्यकुमार यादव (१९९ धावा), हार्दिक पंड्या (१४४ धावा, ११ बळी), अक्षर पटेल (९२ धावा, ९ बळी) यांना आयसीसीच्या संघात स्थान लाभले. या तिघांनी मधल्या फळीत भारतीय संघासाठी सातत्याने योगदान दिले. त्याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेला जसप्रीत बुमरा (१५ बळी) आणि भारताकडून स‌र्वाधिक १५ बळी मिळवणारा अर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांचाही आयसीसीच्या संघात समावेश आहे. त्याव्यतिरिक्त, अफगाणिस्तानचा गुरबाझ, रशिद खान व फझलहक फारुकी, ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस आणि वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन यांचा संघात समावेश आहे.

बीसीयीआयकडून १२५ कोटींचे बक्षीस

विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला बीसीसीआयने तब्बल १२५ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यासंबंधी माहिती दिली.

विश्वचषकातील ११ खेळाडूंचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), रहमनुल्ला गुरबाझ, निकोलस पूरन, सूर्यकुमार यादव, मार्कस स्टॉयनिस, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रशिद खान, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, फझलहक फारुकी. १२वा खेळाडू : आनरिख नॉर्किए

भारतीय संघ अद्याप बार्बाडोसमध्येच

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रविवारी रात्री भारतीय संघ मायदेशी परतणे अपेक्षित होते. मात्र बार्बाडोसमध्ये आलेल्या ‘बीरल’ वादळामुळे भारतीय संघाचे सर्व खेळाडू तसेच बीसीसीआयचे सचिव जय शहा व भारतातील विविध माध्यमांचे प्रतिनिधी बार्बाडोसमध्येच अडकून आहेत. बार्बाडोसमधील विमान सेवा सोमवारी दिवसभर बंद होती. वादळ शमल्यास मंगळवारी सकाळी भारतीय संघ चार्टर्ड फ्लाइटसह नवी दिल्लीसाठी रवाना होईल. दिल्लीत भारतीय खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले