दुबई : २०२७च्या पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या मोहिमेला ७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. २०२३चा उपविजेता भारत पहिल्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. हा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स स्टेडियमवर होईल, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी केली. विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून भारत-पाकिस्तान एकाच गटात आहेत.
भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा सामना १० ऑक्टोबरला जोहान्सबर्गमधील वांडरर्स स्टेडियमवर होणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी एकूण १२ सामने खेळावे लागू शकतात. भारताला ‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, सहयजमान झिम्बाब्वे, अफगाणिस्तान आणि एका पात्रता संघासोबत स्थान देण्यात आले आहे. ‘ब’ गटात इंग्लंड, सहयजमान दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, बांगलादेश, श्रीलंका आणि दुसरा पात्रता संघ असतील.
भारत १४ ऑक्टोबरला सेंच्युरियन येथे अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. त्यानंतर १७ ऑक्टोबरला ब्लूमफॉन्टेन येथे पात्रता मिळवणाऱ्या संघाविरुद्ध सामना होईल. साखळी फेरीतील भारताचा अखेरचा सामना २४ ऑक्टोबरला झिम्बाब्वेविरुद्ध व्हिक्टोरिया फॉल्स स्टेडियमवर होणार आहे.
साखळी फेरीनंतर २५ ऑक्टोबरपासून ‘सुपर ७’ फेरीला सुरुवात होईल. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ आणि दोन्ही गटांतील चौथ्या क्रमांकावरील सर्वोत्तम संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. भारताला ‘ए१’, ऑस्ट्रेलियाला ‘ए२’ आणि पाकिस्तानला ‘ए३’ असे मानांकन देण्यात आले आहे. या तिन्ही संघांनी सुपर ७ फेरी गाठल्यास भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा ७ नोव्हेंबरला केपटाऊनमध्ये सामना होईल. त्याआधी २८ ऑक्टोबरला झिम्बाब्वेतील व्हिक्टोरिया फॉल्स येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा आमनेसामने येऊ शकतात. एकूणच यामुळे रंगत वाढेल.
दोन उपांत्य सामने १७ आणि १८ नोव्हेंबरला केपटाऊन आणि सेंच्युरियन येथे होतील. अंतिम सामना २१ नोव्हेंबरला जोहान्सबर्गमधील वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाईल. म्हणजेच या स्पर्धेत भारत-पाकिस्तान किंवा भारत-ऑस्ट्रेलिया एकंदर तीन वेळा आमनेसामने येऊ शकतात.
तिकीटविक्री सुरू, १२ ठिकाणी सामने
स्पर्धेतील सामने एकूण १२ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. नामिबियातील विंडहोक येथे तीन सुपर सिरीज सामने आणि तीन साखळी सामने होतील. झिम्बाब्वेतील व्हिक्टोरिया फॉल्स, हरारे आणि बुलावायो येथेही सामने होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन, पार्ल, जोहान्सबर्ग, त्श्वाने (सेंच्युरियन), ब्लूमफॉन्टेन, डर्बन, कुगोम्पो सिटी आणि गेकेबरहा या ठिकाणी सामने आयोजित केले जातील. विश्वचषकासाठी तिकिटांची सुरुवातीची किंमत ९.६२ अमेरिकन डॉलर (१५८ रँड) असून, सर्वाधिक किमतीचे तिकीट ३१.३१ डॉलर (५१४ रँड) असेल.