दक्षिण आफ्रिकेचे विजयी सप्तक; झिम्बाब्वेवर वर्चस्व; आता बुधवारी न्यूझीलंडशी उपांत्य लढत 
क्रीडा

ICC T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेचे विजयी सप्तक; झिम्बाब्वेवर वर्चस्व; आता बुधवारी न्यूझीलंडशी उपांत्य लढत

एडीन मार्करमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने रविवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग सातवा विजय नोंदवला. त्यांनी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुपर-आठ फेरीतील अखेरच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेचा ५ गडी व १३ चेंडू राखून पराभव केला. याबरोबरच आफ्रिकेने पहिल्या गटातून अग्रस्थानासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.

Swapnil S

नवी दिल्ली : एडीन मार्करमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने रविवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग सातवा विजय नोंदवला. त्यांनी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुपर-आठ फेरीतील अखेरच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेचा ५ गडी व १३ चेंडू राखून पराभव केला. याबरोबरच आफ्रिकेने पहिल्या गटातून अग्रस्थानासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. आता त्यांच्यासमोर ४ तारखेला न्यूझीलंडचे आव्हान असेल.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

या स्पर्धेत साखळी फेरीसाठी प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले होते. त्यांपैकी अ-गटातून भारत, पाकिस्तान, ब-गटातून झिम्बाब्वे, श्रीलंका, क-गटातून वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ड-गटातून दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड यांनी आगेकूच केली. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार करण्यात आले होते. यांपैकी पहिल्या गटात भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश होता. तर दुसऱ्या गटात पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका हे संघ सहभागी होते. दुसऱ्या गटातून इंग्लंड व न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.

दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्ध आफ्रिकेने प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार सिकंदर रझाच्या ४३ चेंडूंतील ७३ धावांच्या खेळीमुळे झिम्बाब्वेने २० षटकांत ७ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली. क्वेना मफाका व कॉर्बिन बोश यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. ब्रायन बेनेट (१५) यावेळी स्वस्तात बाद झाला. रायन बर्ल (५), मारुमणी (७) यांनीही निराशा केली. ३९ वर्षीय रझाने मात्र पुन्हा संघाला सावरताना ८ चौकार व ४ षटकारांसह अर्धशतक साकारून झिम्बाब्वेला १५० धावांपलीकडे नेले.

आफ्रिकेने मात्र १७.५ षटकांत पाच फलंदाजांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. मार्करम (४) व क्विंटन डीकॉक (०) यांना रझाने पहिल्या दोन षटकांतच माघारी पाठवले होते. मात्र डेवाल्ड ब्रेविसने १८ चेंडूंत ४२ धावा फटकावल्या. त्याला रायन रिकल्टन (३१), डेव्हिड मिलर (२२), जॉर्ज लिंडे (नाबाद ३०), ट्रिस्टन स्टब्स (नाबाद २१) यांनीही मोलाचे योगदान दिले. त्यामुळे आफ्रिकेने सुपर-आठ फेरीतील सलग तिसरा, तर स्पर्धेतील एकंदर सातवा विजय साकारला. झिम्बाब्वेचे सलग तिसऱ्या पराभवासह आव्हान संपुष्टात आले. मात्र अष्टपैलू कामगिरीसाठी रझाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. आता सर्वांचे लक्ष उपांत्य फेरीच्या थराराकडे असेल. यामध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.

संक्षिप्त धावफलक

झिम्बाब्वे : २० षटकांत ७ बाद १५३ (सिकंदर रझा ७३, क्लाइव्ह मदांडे नाबाद २६; क्वेना मफाका २/२१) पराभूत वि.

दक्षिण आफ्रिका : १७.५ षटकांत ५ बाद १५४ (डेवाल्ड ब्रेविस ४२, रायन रिकल्टन ३१; रझा ३/२९)

सामनावीर : सिकंदर रझा

Mumbai : म्हाडा लॉटरीला उत्स्फूर्त प्रतिसाद; २,६४० घरांसाठी ७५ हजारांहून अधिक अर्ज, २५ जूननंतर सोडतीची घोषणा

Mumbai : फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका; मे महिन्यात २ लाख प्रवाशांकडून १३.९४ कोटी रुपयांचा दंड वसूल

इंधन दरवाढीचा फटका! आजपासून देशभरात २५० फ्लाइट्स रद्द; 'या' मार्गांवरील प्रवाशांची गैरसोय

Mumbai : मान्सूनपूर्व तयारीला वेग; ८० टक्क्यांहून अधिक नालेसफाई पूर्ण, महापौर रितू तावडे यांची माहिती

Pune : १५ जूनपासून भीमाशंकर मंदिर पुन्हा सुरू; दर्शनासाठी ऑनलाइन पास आवश्यक, जाणून घ्या नवे नियम