हरारे : युवा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (१९ वर्षांखालील) आपलीच सत्ता असल्याचे भारताने बुधवारी पुन्हा दाखवून दिले. सलामीवीर आरोन जॉर्जने (१०४ चेंडूंत ११५ धावा) साकारलेल्या शतकाला वैभव सूर्यवंशी (३३ चेंडूंत ६८) आणि कर्णधार आयुष म्हात्रे (५९ चेंडूंत ६२) यांच्या अर्धशतकांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारतीय युवा संघाने उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानचा ७ गडी व ५३ चेंडू राखून फडशा पाडला. स्पर्धेच्या इतिहासात सर्वात विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करण्याचा पराक्रमही भारताने केला.
अफगाणिस्तानने दिलेले ३११ धावांचे लक्ष्य भारताने ४१.१ षटकांत सहज गाठून सलग सहाव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी २००६मध्ये न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध ३०५ धावांचे शिखर सर केले होते. एकंदर भारताने १०व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. १९८८पासून सुरू झालेल्या विश्वचषकाचे हे १६वे पर्व सुरू आहे. भारतानेच सर्वाधिक ५ वेळा (२०००, २००८, २०१२, २०१८, २०२२) या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. तर चार वेळा त्यांना (२००६, २०१६, २०२०, २०२४) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
आता शुक्रवारी रंगणाऱ्या महाअंतिम सामन्यात भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असेल. २०२२मध्ये भारताने अखेरचा युवा विश्वचषक उंचावला, तेव्हा इंग्लंडलाच अंतिम फेरीत नमवले होते. तर २०२४च्या युवा विश्वचषकातील अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारत यंदा पुन्हा जेतेपद मिळवणार की इंग्लंड २०२२चा वचपा काढणार, हे पाहणे रंजक ठरेल.
झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे १५ जानेवारीपासून युवा विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. एकूण १६ संघांचा स्पर्धेत समावेश होता. मुंबईचा १८ वर्षीय आयुष या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत आहे. भारताने साखळी फेरीत सलग तिन्ही लढती जिंकताना अमेरिका, बांगलादेश व न्यूझीलंड यांना धूळ चारली. मग सुपर-सिक्स फेरीत भारताने झिम्बाब्वे व पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. दुसरीकडे इंग्लंडने उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. भारत-इंग्लंड दोन्हीही संघ एकही लढत न गमावता अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. त्यामुळेच दोघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळू शकते.
दरम्यान, उपांत्य सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ४ बाद ३१० धावांचा डोंगर उभारला. फैजल शीनोझादा (९३ चेंडूंत ११०) आणि उझरुल्ला निझाई (८६ चेंडूंत नाबाद १०१) या तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावरील जोडीने शानदार शतके झळकावतानाच तिसऱ्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी रचली. वेगवान गोलंदाज दीपेश देवेंद्रने फैजलचा अडसर दूर केला. तसचे कनिष्क चौहानने २ बळी मिळवले. पहिल्या इनिंगनंतर भारताला हे आव्हान खडतर जाईल, असे वाटले.
मात्र आयपीएलमधून नावारुपास आलेल्या १४ वर्षीय वैभवने धडाकेबाज सुरुवात करताना ९ चौकार व ४ षटकारांसह ३३ चेंडूंत ६८ धावा फटकावल्या. वैभव व आरोन यांनी १० षटकांतच ९० धावांची सलामी नोंदवली. वैभव बाद झाल्यावरही आरोन एक बाजू सांभाळून होता. मग तिसऱ्या क्रमांकावरील आयुषने ५ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांचे योगदान दिले. आयुष-आरोन यांनी ११४ धावांची भागीदारी रचली.
मग २७व्या षटकात आयुष माघारी परतल्यावर आरोनने सूत्रे हाती घेत विहान मल्होत्राच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भर घातली. १५ चौकार व २ षटकारांसह त्याने विश्वचषकातील पहिले शतक साकारले. आरोन संघाला १० धावा हव्या असताना बाद झाला. मात्र विहान (नाबाद ३८) आणि वेदांत त्रिवेदी (नाबाद ५) यांनी ४१.१ षटकांत भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. आरोनला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ऋषिकेश कानिटकर या संघाचे प्रशिक्षक असून व्हीव्हीएस लक्ष्मणही मार्गदर्शन करत आहे.
भारताने विक्रमी १०व्यांदा युवा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. भारतानेच सर्वाधिक ५ वेळा (२०००, २००८, २०१२, २०१८, २०२२) या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. तर चार वेळा त्यांना (२००६, २०१६, २०२०, २०२४) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
भारताने सलग सहाव्यांदा युवा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. २०१६, २०१८, २०२०, २०२२, २०२४ व २०२६ या सहा वर्षांचा त्यात समावेश आहे. २०१४मध्ये भारताला अखेरची अंतिम फेरी गाठता आली नव्हती.
इंग्लंडने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. १९९८मध्ये त्यांनी जेतेपद मिळवले, तर २०२२मध्ये त्यांना भारताकडूनच पराभव पत्करावा लागला होता.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान : ५० षटकांत ४ बाद ३१० (फैजल शीनोझादा ११०, उझरुल्ला निझाई नाबाद १०१; दीपेश देवेंद्र २/६४) पराभूत वि.
भारत : ४१.१ षटकांत ३ बाद ३११ (आरोन जॉर्ज ११५, वैभव सूर्यवंशी ६८, आयुष म्हात्रे ६२; नुरिस्तानी ओमरझाई २/६४)
सामनावीर : आरोन जॉर्ज