क्रीडा

IND vs AFG, ICC U19 World Cup 2026 : युवा संघाची अफगाणी परीक्षा; १९ वर्षांखालील विश्वचषकात आज भारत-अफगाणिस्तान उपांत्य सामना

भारत-अफगाणिस्तान यांच्यात हरारे स्पोर्टस क्लबवर १९ वर्षांखालील विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला नमवून अंतिम फेरी गाठलेली असल्याने शुक्रवारी रंगणाऱ्या महामुकाबल्यात त्यांच्यासमोर कोणाचे आव्हान असेल, हे पाहणे रंजक ठरेल.

Swapnil S

बुलावायो : युवा विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी भारतीय संघाची अफगाणी परीक्षा असेल. भारत-अफगाणिस्तान यांच्यात हरारे स्पोर्टस क्लबवर १९ वर्षांखालील विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला नमवून अंतिम फेरी गाठलेली असल्याने शुक्रवारी रंगणाऱ्या महामुकाबल्यात त्यांच्यासमोर कोणाचे आव्हान असेल, हे पाहणे रंजक ठरेल.

एकीकडे टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही, याविषयी संभ्रम कायम असतानाच भारताने रविवारी पाकिस्तानला ५८ धावांनी धूळ चारून उपांत्य फेरीत धडक मारली होती. अष्टपैलू योगदान देणारा कनिष्क चौहान (२९ चेंडूंत ३५ धावा, १ बळी) भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

बुलावायो येथे झालेल्या या लढतीत भारताने दिलेल्या २५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४६.२ षटकांत १९४ धावांत गारद झाला. त्यामुळे सुपर-सिक्स फेरीच्या दुसऱ्या गटात भारताने अग्रस्थान मिळवत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. भारत व इंग्लंड यांनी प्रत्येकी ८ गुण कमावले. तर पाकिस्तानला ४ गुणांवरच समाधान मानावे लागल्याने ते स्पर्धेबाहेर गेले.

मुख्य म्हणजे पाकिस्तानने ही लढत ३३.२ षटकांत लक्ष्य पार करून जिंकली असती, तर तेसुद्धा उपांत्य फेरीत दाखल झाले असते. मात्र त्यांनी सावध खेळ केला व परिणामी त्यांना सामनादेखील जिंकता आला नाही. अन्य गटातून ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांनी आगेकूच केली.

झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे १५ जानेवारीपासून युवा विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. मुंबईचा १८ वर्षीय आयुष या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत आहे. आयपीएलपासून लक्ष वेधणारा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीसुद्धा भारतीय संघाचा सदस्य आहे. भारताने नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले होते. भारताचा ब-गटात समावेश करण्यात आला असून त्यांनी साखळी फेरीत सलग तिन्ही लढती जिंकून आगेकूच केली. भारताने अमेरिका, बांगलादेश व न्यूझीलंड यांना धूळ चारली.

एकूण १६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून त्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली होती. त्यांपैकी प्रत्येकी गटातील आघाडीचे तीन संघ सुपर-सिक्स फेरीसाठी पात्र ठरले. सुपर-सिक्समध्ये मग सहा-सहा संघांचे दोन गट बनवण्यात आले. येथे प्रत्येक संघ आपल्या आधीच्या गटातील संघांविरुद्ध न खेळता अन्य गटातून आलेल्या तीन संघांशी खेळला. ६ तारखेला अंतिम सामना रंगेल. यंदा या विश्वचषकाचे हे १६वे पर्व आहे. भारताने सर्वाधिक ५ वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. २०२४ मध्ये भारताला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

दरम्यान, सुपर-सिक्स फेरीतील अखेरच्या सामन्यात भारताचा संघ प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकांत २५२ धावांत गारद झाला. वैभव सूर्यवंशी (३०) व आरोन जॉर्ज (१६) यांनी ४७ धावांची सलामी नोंदवली. मात्र मोहम्मद सय्यमने एकाच षटकात वैभव व आयुष (०) यांना बाद केले. मग आरोनदेखील माघारी परतला. वेदांत त्रिवेदीने ६८ धावांची एकाकी झुंज दिली. त्याला सातव्या क्रमांकावरील अंब्रिश (२९) व कनिष्क (३५) यांनी उत्तम साथ दिली. त्यामुळे भारताने किमान २५० धावांचा पल्ला गाठला. मग लक्ष्याचा पाठलाग करताना हाम्झा झाहूर (४२) व उस्मान खान (६६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली होती. मात्र खिलान पटेल व आयुष यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवून पाकिस्तानचा डाव २ बाद १५१ वरून १९४ धावांत गुंडाळला.

वेळ : दुपारी १ वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, सिलेक्ट आणि जिओहॉटस्टार ॲप

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके