नवी मुंबई : मुलांमधील अंगभूत कौशल्ये ओळखून त्यांना योग्य वयात संधी उपलब्ध करून देण्याची भूमिका जपत असून मुलांच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याचे काम करीत असल्याबद्दल महानगरपालिका, शिक्षक व पालकांची प्रशंसा करीत क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी या माध्यमातून दर्जेदार खेळाडू घडतील असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम येथे असलेल्या सचिन तेंडुलकर क्रिकेट अॅकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध क्रिकेट प्रशिक्षण मिळावे यादृष्टीने ॲकॅडमीच्या पुढाकाराने क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणाच्या शुभारंभप्रसंगी सचिन तेंडुलकर यांनी उपस्थित शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते.
यावेळी लहानपणीच्या क्रिकेट खेळाच्या आठवणी सांगताना सचिन तेंडुलकर म्हणाले की, माझ्या भावाने क्रिकेट खेळण्याचे माझ्यातील कौशल्य हेरून मला आचरेकर सरांकडे प्रशिक्षणासाठी पाठविले. आपल्यातील कौशल्ये ओळखणारा व त्यासाठी योग्य संधी उपलब्ध करून देणारा आपुलकीचा व्यक्ती जीवनात गरजेचा असतो, असे तेंडुलकर म्हणाले.
२४० मुलांची अंतिम चाचणीसाठी निवड
सचिन तेंडुलकर क्रिकेट अॅकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक अतुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अॅकॅडमीच्या निवड समितीने तीन दिवसांचे शिबीर राबवून महानगरपालिकेच्या शाळांतील ११०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या क्रिकेट खेळाची चाचणी घेतली. त्यामधून २४० मुलांची अंतिम चाचणीसाठी निवड केली. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम येथे त्या मुलांचा काही वेळ खेळ बघत सचिन तेंडुलकर यांनी मुलांशीही संवाद साधला. त्यामधील २० मुले व २० मुली यांची निवड करण्यात येऊन त्यांना वर्षभर विनामूल्य क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मुलांना क्रिकेट किटही अॅकॅडमीमार्फतच देण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षण शुल्क घेतले जाणार नाही.