रोहित, विराटसह गिलच्या नेतृत्वाची परीक्षा; भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका आजपासून | X 
क्रीडा

IND vs AUS : रोहित, विराटसह गिलच्या नेतृत्वाची परीक्षा; भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका आजपासून

माजी कर्णधार रोहित शर्मा,दिग्गज खेळाडू विराट कोहली यांचे संघातील पुनरागमन, शुभमन गिलकडे एकदिवसीय संघाचे नेतृत्व या पार्श्वभूमीवर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना रविवारी खेळणार आहे. ही मालिका गिलच्या नेतृत्वाची परीक्षा घेणारी ठरणार असून रोहित, विराटच्या कामगिरीचे मूल्यांकन करणारी ठरणार आहे.

Swapnil S

पर्थ : माजी कर्णधार रोहित शर्मा,दिग्गज खेळाडू विराट कोहली यांचे संघातील पुनरागमन, शुभमन गिलकडे एकदिवसीय संघाचे नेतृत्व या पार्श्वभूमीवर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना रविवारी खेळणार आहे. ही मालिका गिलच्या नेतृत्वाची परीक्षा घेणारी ठरणार असून रोहित, विराटच्या कामगिरीचे मूल्यांकन करणारी ठरणार आहे.

मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळल्यानंतर रोहित आणि विराट हे दिग्गज भारतीय संघात खेळाडू परतले आहेत. मात्र या सात महिन्यांत भारतीय क्रिकेटमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत.

या कालावधीत कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये रोहित आणि विराटशिवाय भारतीय संघातील युवा खेळाडूंना शिकण्याची संधी मिळाली आहे. हे दोन्ही खेळाडू दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जातात. या दुकलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी कठोर मेहनत घेतली आहे. रोहितने आपले बरेच वजन घटवले आहे. कोहली त्याच्या खासगी प्रशिक्षकासोबत लंडनमध्ये मेहनत घेताना दिसला.

मात्र या दुकलीने आयपीएलनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेली नाही. त्यामुळे या मालिकेत त्यांना स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान असेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका या दोघांसाठी पुनरागमन करण्याची संधी असू शकते. रोहित आणि विराटने त्यांच्या मोठ्या कारकीर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावा जमवल्या आहेत.

रोहित आणि विराट ही जोडी केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळत आहे. ही मालिका त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणारी ठरू शकते. या दोघांनाही वरिष्ठ खेळाडू म्हणून आपली वेगळी छाप पाडावी लागेल. रोहितने अखेरच्या टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांत आयसीसीची ट्रॉफी उंचावली आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने अखेरची कसोटी मेलबर्न येथे खेळली होती. जर का कोहली आणि रोहित यांच्या बॅटमधून धावांची बरसात झाली. तर ही दुकली आणखी काही काळ भारतीय संघातील आपले स्थान टिकवून ठेवू शकते. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवुड यांच्यापुढे 'रो-को' या जोडीला रोखण्याचे आव्हान असेल. क्रिकेटच्या मैदानातले हे जुने युद्ध पुन्हा पाहायला मिळणार आहे.

गिल आणि रोहित सलामीला येणार?

एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल आणि माजी कर्णधार रोहित शर्मा ही सलामीची जोडी म्हणून पहिली पसंती असण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मुंबईकर यशस्वी जयस्वालला बॅकअप म्हणून ठेवले जाऊ शकते. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. त्यानंतर मुंबईकर श्रेयस अय्यर आणि यष्टिरक्षक के. एल. राहुलला संधी मिळेल. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे संघाबाहेर असू शकतो. त्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीला पहिला एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते. हर्षीत राणा आणि प्रसिध कृष्णा यांच्यातील एका वेगवान गोलंदाजाला सिराज व अर्शदीपसोबत वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळू शकते. अष्टपैलू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्याकडे फिरकी विभागाची जबाबदारी असेल.

रोहित, विराटशी घट्ट नाते - गिल

गिल आणि रोहित, कोहली यांच्यातील वादावर सोशल मीडियावर बातम्या फिरत असल्या तरी त्या खोट्या असल्याचे समोर आले आहे. गिलचे रोहित आणि विराटशी असलेले नाते घट्ट आहे. स्वतः गिलने याबाबत खुलासा केला आहे. एखाद्या सामन्यात अडचण आली तर गिल या दोन्ही दिग्गजांकडे मार्गदर्शनासाठी जाण्यास अजिबात संकोच करणार नाही, असे गिल म्हणाला.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, के. एल. राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल.

ऑस्ट्रेलिया : मिशेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनॉली, बेन द्वाशुइस, नॅथन एलिस, जोश हॅझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू कुहनमॅन, मार्नस लबुशेन, मिचेल ओवेन, जोश फिलीपे, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क.

Mumbai : मुंबई पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती