Photo : X (BCCI) 
क्रीडा

IND vs SA : हार्दिकचे दणक्यात पुनरागमन! पहिल्या टी-२० सामन्यात भारताचे दक्षिण आफ्रिकेवर १०१ धावांनी सहज वर्चस्व

भारताचा तारांकित अष्टपैलू हार्दिक पंड्याने मंगळवारी धडाक्यात पुनरागमन करताना २८ चेंडूंत नाबाद ५९ धावा फटकावल्या. त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यांत १०१ धावांनी शानदार विजय नोंदवला. भारताने दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ १२.३ षटकांत ७४ धावांतच गारद झाला.

Swapnil S

कटक : भारताचा तारांकित अष्टपैलू हार्दिक पंड्याने मंगळवारी धडाक्यात पुनरागमन करताना २८ चेंडूंत नाबाद ५९ धावा फटकावल्या. त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यांत १०१ धावांनी शानदार विजय नोंदवला. भारताने दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ १२.३ षटकांत ७४ धावांतच गारद झाला.

कटकच्या बारबती स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या लढतीत आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र खेळपट्टी आव्हानात्मक असल्याने भारताची सुरुवात खराब झाली. उपकर्णधार शुभमन गिल (४), कर्णधार सूर्यकुमार यादव (१२), अभिषेक शर्मा (१७) यांनी निराशा केली. लुंगी एन्गिडीने गिल व सूर्यकुमारला चकवले. तिलक वर्मा (३२ चेंडूंत २६) व अक्षर पटेल (२१ चेंडूंत २३) यांनाही अपेक्षित धावगतीने खेळी करता आली नाही. फिरकीपटू लुथो सिपामलाने अभिषेक व अक्षरचा अडसर दूर केला.

त्यामुळे एकवेळ भारतीय संघ १२ षटकांत ४ बाद ७८ अशा स्थितीत होती. तेथून मग ३२ वर्षीय हार्दिकने आपल्या फटकेबाजीने चाहत्यांची मने जिंकली. त्याने ६ चौकार व ४ षटकारांसह टी-२० कारकीर्दीतील सहावे अर्धशतक साकारले. हार्दिकने शिवम दुबेसह (११) सहाव्या विकेटसाठी ३३ धावांची, तर जितेश शर्मासह (नाबाद १०) सातव्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताने पावणेदोनशे धावांचा पल्ला गाठला.

लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिका सुरुवातीपासूनच ढेपाळली. बुमरा, अर्शदीप, वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २, तर हार्दिकने एक बळी घेत आफ्रिकेला ७४ धावांतच गुंडाळले.

दरम्यान, सध्या आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्यांनी कसोटी मालिकेत भारताला २-० अशी धूळ चारली होती. मात्र एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकित खेळाडूंच्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने आफ्रिकेला २-१ असे पराभूत केले. गिल व श्रेयस अय्यर हे नियमित कर्णधार व उपकर्णधार विविध दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकल्याने के. एल. राहुलवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणात तसेच राहुलच्या नेतृत्वात भारताने उत्तम कामगिरी केली.

आता मोर्चा भारताच्या प्रामुख्याने युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या टी-२० मालिकेकडे वळेल. पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात भारतात टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी भारताला आफ्रिकेविरुद्ध ५, तर न्यूझीलंडविरुद्धही ५ टी-२० सामने खेळायचे आहेत. त्यामुळे मायदेशातील या १० लढतींद्वारे भारताला विश्वचषकासाठी आपले सर्वोत्तम १५ खेळाडू निवडण्याची संधी आहे. २०२४ मध्ये भारताने रोहितच्या नेतृत्वात आफ्रिकेला नमवूनच टी-२० विश्वचषक उंचावला होता. मात्र आता रोहित, विराट हे टी-२० संघाचा भाग नसल्याने भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने सप्टेंबरमध्ये आशिया चषकाचे जेतेपद मिळवले. मग ऑस्ट्रेलियात जाऊन त्यांनाही टी-२० मालिकेमध्ये नमवले. भारताने २०२४च्या विश्वचषकानंतर अद्याप एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. गेल्या २६ टी-२० सामन्यांत भारताने चार लढती गमावल्या आहेत. आता गुरुवारी दुसरा टी-२० सामना मुल्लानपूर येथे होईल.

हार्दिकने भारतासाठी टी-२० कारकीर्दीतील १०० षटकार लगावले आहेत. अशी कामगिरी करणारा तो रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, विराट कोहलीनंतर भारताचा चौथा फलंदाज ठरला.

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी

Mumbai : धक्कादायक! SNDT कॉलेजच्या कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

Thane : 'स्वस्त घर' आणि शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.९७ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात तक्रार

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण