मालिका विजयासाठी आज चढाओढ; भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्यात नाणेफेक, दव ठरणार निर्णायक Photo- X
क्रीडा

IND vs SA: मालिका विजयासाठी आज चढाओढ; भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्यात नाणेफेक, दव ठरणार निर्णायक

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका सध्या १-१ अशा बरोबरीवर आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासह मालिकेत कोण बाजी मारणार, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. विशाखापट्टणम येथील डॉ. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर उभय संघांतील हा सामना रंगणार असून या लढतीत पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल आणि दवाचा घटक (ड्यू) निर्णायक भूमिका बजावणार आहे.

Swapnil S

विशाखापट्टणम : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका सध्या १-१ अशा बरोबरीवर आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासह मालिकेत कोण बाजी मारणार, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. विशाखापट्टणम येथील डॉ. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर उभय संघांतील हा सामना रंगणार असून या लढतीत पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल आणि दवाचा घटक (ड्यू) निर्णायक भूमिका बजावणार आहे.

सध्या आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्यांनी कसोटी मालिकेत भारताला २-० अशी धूळ चारली. आता ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर उभय संघांत पाच टी-२० सामनेही होणार आहेत. एकदिवसीय मालिकेसाठी अनुभवी फलंदाज के. एल. राहुलकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. शुभमन गिल व श्रेयस अय्यर हे नियमित कर्णधार व उपकर्णधार विविध दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकणार असल्याने राहुलवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा ३८ वर्षीय रोहित शर्मा व ३७ वर्षीय विराट कोहली यांना खेळताना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळत आहे.

दरम्यान, उभय संघांतील पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताने आफ्रिकेवर १७ धावांनी सरशी साधली होती. विराटचे ५२वे शतक आणि रोहितच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने दिलेल्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने कडवी झुंज दिली. मात्र ४९.२ षटकांत त्यांचा संघ ३३२ धावांत गारद झाला. मग दुसऱ्या लढतीतही विराटने आणखी एक शतक साकारले. त्याला ऋतुराज गायकवाडच्या शतकाचीही साथ लाभली. मात्र ३५८ धावांचा डोंगर उभारूनही भारतीय गोलंदाजांना बचाव करता आला नाही. सुमार गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व दवामुळे ओलसर खेळपट्टी हे घटक पराभवास कारणीभूत ठरले.

गेल्या २० एकदिवसीय सामन्यांत भारत एकदाही नाणेफेक जिंकलेला नाही. तसेच विशाखापट्टणमवर भारताने १० पैकी ७ लढती जिंकल्या आहेत. २०२३मध्ये येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना झाला होता. त्यावेळीही नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने म्हणजेच ऑस्ट्रेलियाने भारताला नमवले होते. त्यामुळे भारताला गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यांसह नशिबाची साथही आवश्यक असेल.

विराट-ऋतुराज लयीत, यशस्वीकडे लक्ष

श्रेयसच्या अनुपस्थितीत संधी लाभलेल्या महाराष्ट्राच्या ऋतुराजने दुसऱ्या लढतीत शानदार पहिले शतक साकारले. त्याशिवाय विराटही उत्तम लयीत आहे. मात्र मुंबईकर सलामीवीर यशस्वी जैस्वालला अद्याप छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात यशस्वीकडून मोठी खेळी अपेक्षित आहे. तसेच रोहितही आक्रमक सुरुवात करण्यासह खेळपट्टीवर ठाण मांडण्यास आतुर असेल. वाढत्या टी-२० क्रिकेटमुळे एकदिवसीय प्रकारात आता ३५० धावांचा पाठलाग करणेही फलंदाजांसाठी सोपे जात आहे. अशा स्थितीत भारताला अखेरच्या षटकांत आणखी हाणामारी करावी लागेल. कर्णधार राहुल लयीत असला तरी तो, रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर अपेक्षित धावगतीने धावा करू शकलेले नाहीत. विशेषत: सुंदरच्या कामगिरीवर चाहते नाराज आङेत. त्यामुळे भारतीय संघ तिलक वर्मा किंवा ऋषभ पंतला संधी देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

भारताच्या वेगवान गोलंदाजांवर दडपण

भारताचे वेगवान गोलंदाज दोन्ही सामन्यांत सपाटून मार खाताना दिसले. प्रसिध कृष्णा व हर्षित राणा हे षटकामागे ६ पेक्षाही अधिक सरासरीने धावा लुटत आहेत. त्यामुळे अर्शदीप सिंगवर दडपण येत आहे. फिरकी विभागात कुलदीप यादव एकटाच छाप पाडत आहे. जडेजा व सुंदर यांना गोलंदाजीत अपेक्षित योगदान देता आलेले नाही. अशा स्थितीत भारतीय गोलंदाजांचा तिसऱ्या लढतीत पुन्हा एकदा कस लागणार आहे. तसेच भारताची प्रथम गोलंदाजी आली, तर आफ्रिकेला किमान ३५० धावांच्या आत रोखण्याचे आव्हानही भारतापुढे असेल. जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, तर मोहम्मद शमी संघाचा भाग नसल्याने काही चाहत्यांनी टीकासुद्धा केली आहे. नितीश रेड्डीचा पर्यायही भारताकडे उपलब्ध आहे. मात्र तूर्तास तीन वेगवान व तीन फिरकीपटू हेच सूत्र भारतीय संघ कायम राखेल, असेच सध्या दिसते.

ब्रीट्झके, ब्रेविसमुळे आफ्रिका भक्कम

टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वात खेळणारा आफ्रिका संघ दौऱ्यावर सलग दुसरी मालिका जिंकण्यास आतुर आहे. मात्र त्यांनाही गोलंदाजीची चिंता सतावत आहे. मार्को यान्सेन व लुंगी एन्गिडी यांची वेगवान जोडी धावा रोखण्यात अपयशी ठरत आहे. तसेच फिरकीपटू केशव महाराजवरही भारतीय फलंदाजांनी आक्रमण केले होते. कॉर्बिन बोश व नांद्रे बर्गर यांनी त्या तुलनेत आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. फलंदाजीत क्विंटन डीकॉकचे अपयश संघाला सतावत आहे. एडीन मार्करमने गेल्या सामन्यात शतक झळकावून लय गवसल्याचे दाखवून दिले. मात्र आफ्रिकेची खरी ताकद ही त्यांची मधली फळी आहे. बव्हुमा, मॅथ्यू ब्रीट्झके व डेवाल्ड ब्रेविस असे तगडे फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. त्यांची फलंदाजी आठव्या क्रमांकापर्यंत लांबलेली असल्याने आफ्रिकेने ३५९ धावांचा सहज पाठलाग केला. बर्गर व टॉनी डी झॉर्झी यांना दुखापत झाली असल्याने त्यांच्या खेळण्याविषयी संभ्रम आहे. यान्सेन व बोश यांनी गोलंदाजीत कंजुशीने धावा दिल्या, तर आफ्रिकेला भारताला पुन्हा नमवू शकेल. त्यामुळे एकूणच तिसरी लढत उत्कंठावर्धक ठरणार आहे.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज

  • विशाखापट्टणम येथेही सायंकाळनंतर मोठ्या प्रमाणात दव येते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देईल.

  • या लढतीवर पावसाचे सावट नसेल. खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असेल. मात्र २०२३मध्ये येथे झालेल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ११७ धावांत गुंडाळले होते.

  • ९६ उभय संघांत आतापर्यंत ९६ एकदिवसीय सामने झाले असून भारताने त्यापैकी ४१, तर आफ्रिकेने ५२ लढती जिंकल्या आहेत. ३ सामने रद्द करण्यात आले आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : के. एल. राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, ऋषभ पंत, तिलक वर्मा.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बव्हुमा (कर्णधार), ओटनिल बार्टमन, कॉर्बिन बोश, मॅथ्यू ब्रीट्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डीकॉक, टॉनी डी झॉर्झी, रुबिन हर्मन, केशव महाराज, मार्को यान्सेन, एडीन मार्करम, लुंगी एन्गिडी, रायन रिकल्टन, प्रेनलेन सुब्रायन.

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

प्रभाग समित्यांचे १७ पैकी ११ अध्यक्ष बिनविरोध; मुंबईतील ६ प्रभाग समित्यांची निवडणूक ५, ६, ९ मार्चला

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार; मविआकडून शरद पवार यांना उमेदवारी; काँग्रेस, ठाकरे गटाचा पाठिंबा

आम्ही महाविकास आघाडीसोबतच! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपला - जयंत पाटील

गृहनिर्माण संस्थांच्या अकृषिक कराची थकबाकी माफ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती