IND vs SA : फिरकीपुढे भारताची पुन्हा नांगी! दक्षिण आफ्रिकेची ३० धावांनी सरशी;  Photo : X
क्रीडा

IND vs SA : फिरकीपुढे भारताची पुन्हा नांगी! दक्षिण आफ्रिकेची ३० धावांनी सरशी; १५ वर्षांनी प्रथमच भारतात कसोटी जिंकण्यात यश

दक्षिण आफ्रिकेने १२४ धावांचा यशस्वी बचाव करताना भारतावर पहिल्या कसोटी सामन्यात ३० धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. २०१० म्हणजे १५ वर्षांनी प्रथमच आफ्रिकेने भारताविरुद्ध भारतात एखादी कसोटी जिंकली,

Swapnil S

कोलकाता : गतवर्षी न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातच पत्कराव्या लागलेल्या कसोटी मालिका पराभवातून भारताने अद्याप बोध घेतला नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. फिरकीला पूर्णपणे पोषक खेळपट्टी बनवण्याचा डाव भारताच्या अंगलट आला. कारण दक्षिण आफ्रिकेने १२४ धावांचा यशस्वी बचाव करताना भारतावर पहिल्या कसोटी सामन्यात ३० धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. २०१० म्हणजे १५ वर्षांनी प्रथमच आफ्रिकेने भारताविरुद्ध भारतात एखादी कसोटी जिंकली, हे विशेष.

कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या कसोटीत फिरकीला पोषक खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची रविवारी त्रेधातिरपीट उडाली. भारताचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशीच दुसऱ्या सत्रात ३५ षटकांत ९३ धावांत संपुष्टात आला. ऑफस्पिनर सायमन हार्मर (२१ धावांत ४ बळी), डावखुरा फिरकीपटू केशव महाराज (३७ धावांत २ बळी) व वेगवान गोलंदाज मार्को यान्सेन (१५ धावांत २ बळी) हे त्रिकुट आफ्रिकेच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले. त्यामुळे टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आफ्रिकेने दोन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही डावांत मिळून एकूण ८ बळी घेणाऱ्या हार्मरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. आता २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे दुसरी कसोटी सुरू होईल.

दरम्यान, आफ्रिकेचा संघ हा जागतिक अजिंक्यपद विजेता असल्याने त्यांच्याविरुद्ध भारताचा कस लागेल, याचा अंदाज होता. या कसोटी मालिकेनंतर भारत-आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय व ५ लढतींची टी-२० मालिकासुद्धा रंगणार आहे. तूर्तास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) दृष्टीने आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ जगज्जेत्या आफ्रिकेला कडवी झुंज देईल, अशी अपेक्षा होती. यानंतर भारताची पुढील कसोटी मालिका थेट जून २०२६ मध्ये असेल. मात्र सध्या भारताची डब्ल्यूटीसी गुणतालिकेत चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

आफ्रिकेचा संघ २०१९नंतर प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. त्यावेळी भारताने त्यांना ३-० अशी धूळ चारली होती. गतवर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे फलंदाज फिरकीविरुद्ध सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे भारताला ०-३ असा व्हाइटवॉश पत्करावा लागला होता. आफ्रिकेच्या संघातही उत्तम असे फिरकीपटू आहेत. त्यांच्याविरुद्ध भारताचे फलंदाज कसे खेळणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून होते.

या लढतीचा विचार करता आफ्रिकेला पहिल्या डावात १५९ धावांत गुंडाळल्यावर भारताने शनिवारी पहिल्या डावात १८९ धावांपर्यंत मजल मारून ३० धावांची आघाडी घेतली. त्यावेळी ही आघाडी निर्णायक ठरेल, असे वाटले होते. कारण शनिवारी दुसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेची ७ बाद ९३ अशी स्थिती होती, त्यांच्याकडे ६३ धावांची आघाडी होती. तेथून पुढे रविवारी तिसऱ्या दिवसाला प्रारंभ करताना कर्णधार बव्हुमा व कॉर्बिन बोश यांनी जिद्दीने फलंदाजी केली. भारताला १२० ते १३० धावांचा पाठलाग करणे कठीण जाऊ शकते, हे दिसून येत होते.

मान लचकल्याने गिल मैदानात नव्हता. त्यामुळे ऋषभ पंत भारताचे नेतृत्व करत होता. मात्र सुरुवातीच्या ४० मिनिटांत भारताने अतिशय स्वैर मारा केला. फिरकीपटूंना बव्हुमा नेटाने सामोरा गेला. त्याने ४ चौकारांसह १३६ चेंडू किल्ला लढवताना कसोटीतील २६वे अर्धशतक साकारले. बव्हुमा व बोशने आठव्या विकेटसाठी ४४ धावांची उपयुक्त भागीदारी रचली. त्यातच जसप्रीत बुमराला सुरुवातीच्या अर्धा तासात गोलंदाजी न देणे भारताला महागात पडले. अखेरीस बुमरानेच बोशचा २५ धावांवर त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. मग मोहम्मद सिराजने एकाच षटकात हार्मर व महाराजला बाद करून ५४ षटकांत १५३ धावांत आफ्रिकेचा दुसरा डाव गुंडाळला. आफ्रिकेने १२३ धावांची आघाडी घेतल्याने भारतापुढे १२४ धावांचे लक्ष्य उभे ठाकले.

लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र पहिल्या षटकापासूनच भारताचे फलंदाज घाबरून खेळताना दिसले. यान्सेनने मुंबईकर यशस्वी जैस्वालचा शून्यावरच अडसर दूर केला, तर दोन षटकांच्या अंतरात त्याने के. एल. राहुलला (१) देखील अफलातून चेंडू टाकून बाद केले. गिल फलंदाजीस येणे शक्य नसल्याने उपहारालाच भारताची एकप्रकारे ३ बाद १० अशी स्थिती होती. दुसऱ्या सत्रात मग वॉशिंग्टन सुंदर व बढती देण्यात आलेला ध्रुव जुरेल यांनी काही षटके प्रतिकार केला. मात्र हार्मरला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जुरेल (१३) फसला. हार्मरनेच मग पंत (२) व रवींद्र जडेजा (१८) यांनाही माघारी पाठवून सर्वांना स्तब्ध केले.

कामचलाऊ फिरकीपटू एडीन मार्करमने मग सुंदरचा प्रतिकार ३१ धावांवर मोडीत काढून भारताला आणखी संकटात टाकले. कुलदीपही (१) थांबू शकला नाही. अक्षर पटेलने महाराजच्या एकाच षटकात २ षटकार व १ चौकार लगावून काहीशा आशा पल्लवित केल्या. मात्र त्याच षटकात महाराजने पाचव्या चेंडूवर अक्षरला (१७ चेंडूंत २६) बव्हुमाकडे झेल देण्यास भाग पाडले. पुढच्याच चेंडूवर सिराजलाही बाद करून महाराजने भारताचा दुसरा डाव ९३ धावांत संपुष्टात आणला व संस्मरणीय विजय नोंदवला.

बव्हुमाच्या नेतृत्वात आफ्रिकेचा संघ अद्याप अपराजित आहे. त्याच्या नेतृत्वात आफ्रिकेने ११ पैकी १० कसोटी जिंकल्या आहेत, तर एक लढत अनिर्णित राहिली आहे. पाकिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये आफ्रिकेने एक लढत गमावली होती. मात्र त्यावेळी बव्हुमा दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता.

आफ्रिकेने १५ वर्षांनी भारतात कसोटी जिंकली. २०१०मध्ये नागपूर येथे त्यांनी भारताला भारतात अखेरचे नमवले होते. त्यानंतर ते सलग आठ सामन्यांत पराभूत झाले होते. मात्र रविवारी ही मालिका संपुष्टात आली.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : सर्व बाद १५९

भारत (पहिला डाव) : १८९

दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : ५४ षटकांत सर्व बाद १५३ (टेम्बा बव्हुमा नाबाद ५५, कॉर्बिन बोश २५; रवींद्र जडेजा ४/५०)

भारत (दुसरा डाव) : ३५ षटकांत सर्व बाद ९३ (वॉशिंग्टन सुंदर ३१, अक्षर पटेल २६; सायमन हार्मर ४/२१, केशव महाराज २/३७)

निकाल : दक्षिण आफ्रिका ३० धावांनी विजयी

सामनावीर : सायमन हार्मर

Sheikh Hasina Sentenced To Death : मोठी बातमी! माजी पंतप्रधान शेख हसिना यांना मृत्यूदंडाची शिक्षा

सौदी अरेबियात भीषण अपघात; डिझेल टँकरला बस धडकल्याने ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, हेल्पलाइन क्रमांक जारी

मुंबईत CNG चा पुरवठा थांबण्याची शक्यता; वडाळा येथे महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाइनमध्ये बिघाड

सरनाईकांना रोखायला वनमंत्री नाईक मैदानात; मीरा-भाईंदरमध्ये भाजपला बळ देण्याचा प्रयत्न

मनपा निवडणुकीपूर्वीच महापौरपदावरून रस्सीखेच; कल्याण-डोंबिवलीत भाजप व शिवसेना (शिंदे गट) युतीची शक्यता