कोलकाता : दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्करल्यानंतर सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे टी-२० वर्ल्डकपमधील आव्हान खडतर झाले आहे. त्यातच झिम्बाब्वेला हरवल्यामुळे भारताचे आव्हान जिवंत असले तरी आता रविवारी कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर रंगणाऱ्या 'सुपर-८' फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतासाठी 'करो या मरो'ची परिस्थिती असणार आहे.
वेस्ट इंडिज संघालाही दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हावे लागल्याने जणू 'उपांत्यपूर्व' फेरीचे स्वरूप लाभलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील महत्त्वपूर्ण लढतीतील विजेता संघ ५ मार्च रोजी मुंबईत रंगणाऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडशी दोन हात करणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध भारताची फलंदाजी चमकली. संजू सॅमसनचा भारतीय संघात समावेश केल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतीय फलंदाजीला बळ आले. त्याने २४ धावा केल्या असल्या तरी संघाला चांगली सुरुवात करून देण्याचे श्रेय त्यालाच जाते. शून्यावर बाद झाल्याची हॅटट्रिक साजरी केल्यानंतर अभिषेक शर्माला हवाहवासा सूर गवसला आहे. आक्रमक खेळी करणाऱ्या अर्धशतक झळकावले. तिलक वर्मानेही सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १६ चेंडूंत नाबाद ४४ धावांचे योगदान दिले. अभिषेकने या स्पर्धेतील पहिले भारताने झिम्बाब्वेविरुद्ध ४ बाद २५६ धावा करत यंदाच्या विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. मात्र भारतीय संघाला ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजशी लढताना अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. भारताचा जादुई गोलंदाज वरूण चक्रवर्ती सध्या सुमार फॉर्मात आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने झिम्बाब्वेविरुद्ध तिहेरी यश मिळवले, मात्र जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या यांना एकही विकेट मिळवता आली नाही. चक्रवर्ती अचूक टप्पा आणि दिशा राखून गोलंदाजी करण्यात अपयशी ठरला आहे. त्याच्या खराब चेंडूंमुळे आफ्रिकेच्या फलंदाजांनी त्याच्या ४ षटकांत ४७ धावा वसूल केल्या. वरुणने आफ्रिकेविरुद्ध आखूड टप्याचे चेंडू टाकले. त्यामुळे संघ व्यवस्थापन पुन्हा त्यालाच संधी देणार की डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवचा संघात समावेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवम दुबे फलंदाजीत चमक दाखवत असला तरी गोलंदाजीत मात्र त्याची फ्लॉप कामगिरी सुरूच आहे. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने २ षटकांत ४६ धावा बहाल केल्या. त्यातच चार वाइड आणि दोन नोबॉल टाकत त्याने १० चेंडूंचे षटक टाकले. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजांसमोर दुबेची मध्यमगती गोलंदाजी किती चालेल, याचा विचारही प्रशिक्षक गौतम गंभीरला करावा लागणार आहे. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर हलकेसे गवत असल्यामुळे त्याचा फायदा बुमरा, अर्शदीप आणि पंड्यासारख्या वेगवान गोलंदाजांना होणार आहे. त्यांची १२ षटके सामन्यात निर्णायक ठरणार आहेत.
वेस्ट इंडिजची कामगिरी संपूर्ण स्पर्धेत चांगली झाली आहे. १० षटकांच्या पहिल्या टप्प्यात सावध खेळी करायची आणि त्यानंतरच्या दुसऱ्या षटकांत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडायचे, ही रणनीती विंडीजने आखली आहे. त्यामुळेच सलग पाच विजय मिळवणाऱ्या विंडीजचा रथ आफ्रिकेने रोखला होता. आफ्रिकेविरुद्ध ११ षटकांत ७ बाद
८३ अशी स्थिती असतानाही, रोमारियो शेफर्ड याने नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद अर्धशतक झळकावत विंडीजला ८ बाद १७६ अशा स्थितीत आणून ठेवले. शिमरॉन हेटमायरला तिसऱ्या क्रमांकावर देण्यात आलेली बढती विंडीजसाठी सकारात्मक ठरली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून डावखुरा फिरकीपटू अकील होसेन याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
१० वर्षांपूर्वी डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजने भारताला वानखेडे स्टेडियमवर हरवत टी-२० विश्वचषक उंचावला होता. आता त्याचा वचपा काढण्याची संधी भारताला मिळाली आहे. यावेळी डॅरेन सॅमी हा वेस्ट इंडिजचा प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.
खेळपट्टीत दडलंय काय?
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, ईडन गार्डन्सवर पावसाची धूसर शक्यताही नाही. तापमान किमान २४ ते कमाल ३० अंश राहणार असल्यामुळे संध्याकाळी चाहत्यांच्या घामाच्या धारा निघणार आहेत. कोलकातातील खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. खेळपट्टीकडून चेंडूला उसळी मिळणार आहे. कोरड्या खेळपट्टीवर मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. रात्री दव पडल्यानंतर त्याचा फायदा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला होणार आहे.
सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होणार?
सुपर-८ फेरीतील पहिल्या गटातून दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे भारत वि. वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवल्यामुळे २ गुणांसह त्यांचे नेट रनरेट १.७९१ इतके आहे. भारतानेही झिम्बाब्वेला हरवले असले तरी २ गुणांसह त्यांचे नेट रनरेट-०.१०० इतके आहे. त्यामुळे ईडन गार्डन्सवरील हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. त्यामुळे दोन्ही संघांचे समान ३ गुण होतील. मात्र नेट रनरेट सरस असल्यामुळे वेस्ट इंडिज उपांत्य फेरीसाठी पात्र होईल तर ३ गुण मिळवूनही भारताचे आव्हान संपुष्टात येईल.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत ३० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने झाले असून त्यापैकी १९ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजचा संघ १० सामन्यांत विजयी ठरला असून एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ तब्बल ४ वेळा एकमेकांशी भिडले असून त्यापैकी ३ सामन्यांत विंडीजने भारताला मात दिली आहे. भारताला फक्त एकच सामना जिंकता आला आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्सचा टप्पा पार करण्यासाठी फक्त ५ बळींची आवश्यकता आहे. तसे झाल्यास, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या यांच्यानंतर १०० बळी मिळवणारा तो भारताचा चौथा गोलंदाज आणि पहिला फिरकीपटू ठरणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग.
वेस्ट इंडिज : शाय होप (कर्णधार), जॉन्सन चार्लस, शिमरॉन हेटमायर, बँडन किंग, रोवमन पॉवेल, शेरफाने रुदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, रॉस्टन चेस, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, मॅथ्यू फोर्ड, अकील होसेन, शामर जोसेफ, गुदाकेश मोती आणि जेडस सील्स.