नवी दिल्ली: कर्णधार शुभमन गिलने शानदार फलंदाजी करत शनिवारी कारकीर्दीतील दहावे शतक झळकावले. त्यानंतर कर्णधाराने अनुभवी रवींद्र जडेजाकडे गोलंदाजीसाठी चेंडू सोपवत वेस्ट इंडिजला अडचणीत टाकले. जडेजाने विंडीजच्या ३ फलंदाजांना आपल्या सापळ्यात अडकवत मालिकेतील दुसऱ्या कसोटीत शनिवारी आणखी एका मोठ्या विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे ३७८ धावांची मजबूत आघाडी आहे.
गिलने (नाबाद १२९ धावा) लंचनंतर शतकी बॅट उंचावली. विंडीजच्या खराब गोलंदाजीचा फायदा घेत दुहेरी शतक झळकावण्याऐवजी त्याने भारताचा डाव घोषित केला. ५१८ धावांवर ५ फलंदाज बाद अशा स्थितीत भारताने पहिला डाव घोषित केला.
फलंदाज आणि कर्णधार अशा दोन्ही आघाड्यांवर गिलने शानदार कामगिरी केली. त्याने स्वतःची धावसंख्या वाढवण्यापेक्षा संघाच्या हिताचा विचार केला. वैयक्तीक धावसंख्या वाढवण्यासाठी त्याच्याकडे पुष्कळ वेळ होता. पण गिलने त्याकडे दुर्लक्ष केले.
हालचाल करणे, उसळी घेणे अशी लक्षणे खेळपट्टीने दिली नाहीत. मात्र तरीही रवींद्र जडेजाने (३/३७) कुलदीप यादवच्या (१/४५) साथीने वेस्ट इंडिजला अडचणीत टाकले. दुसऱ्या दिवसाअखेर वेस्ट इंडिजने ४३ षटकांत १४० धावांवर ४ फलंदाज गमावले आहेत.
विव रिचर्ड्स आणि ब्रायन लारा हे दिग्गज खेळाडू स्टँडमध्ये बसले होते. मात्र या दिग्गजांसमोर विंडीजच्या खेळाडूंना खेळ उंचावण्यात अपयश आले. जॉन कॅम्पबेलला रवींद्र जडेजाने आपल्या सापळ्यात अडकवले. साई सुदर्शनने अप्रतिम झेल टिपत पाहुण्या संघाला पहिला धक्का दिला.
टगेनरीन चंद्रपॉल (३४) आणि ॲलिक अथानाझ (४१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावा जोडल्या. पण नंतर जडेजा आणि कुलदीप या फिरकी दुकलीने या दोन फलंदाजांना माघारी धाडले. चंद्रपॉलने बॅटचे तोंड उघडण्याचा प्रयत्न केला, पण स्लिपमध्ये केएल राहुलने त्याचा झेल टिपला. अथानाझ कुलदीपच्या सापळ्यात अडकला. जडेजाने मिड-विकेटवर त्याचा झेल पकडला. कर्णधार रोस्टन चेसला भोपळाही फोडता आला नाही. जडेजाने आपल्याच गोलंदाजीवर त्याचा झेल टिपत पाहुण्या संघाला अडचणीत टाकले. गिलने पहिल्या दिवशी शेवटच्या तासात बचावात्मक खेळ केला. पण दुसऱ्या दिवशी त्याने थोड्या आक्रमकतेने फलंदाजी केली. अँडरसन फिलिपने टाकलेल्या चेंडूंवर गिलने चार-पाच चौकार लगावले. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी गिलने सकाळच्या चुका भरून काढल्या होत्या.
तत्पूर्वी दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मुंबईचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने (२५३ चेंडूंत नाबाद १७३ धावा) शुक्रवारी कसोटी कारकीर्दीतील सातवे शतक साकारले. त्याला साई सुदर्शनच्या (१६५ चेंडूंत ८७धावा) अर्धशतकाची सुरेख साथ लाभली. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसावर भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले.
दुसऱ्या दिवशीही भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे दुसऱ्या दिवसाअखेर भारताने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (कोटला) सुरू असलेल्या या लढतीत भारताने पहिल्या दिवसअखेर ९० षटकांत २ बाद ३१८ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या दिवशी गिलने नाबाद शतक झळकावत भारताची धावसंख्या पाचशे पार नेली.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या पाहुण्या संघाच्या फलंदाजांना भारताच्या फिरकीपटूंनी आपल्या ताब्यात ठेवले. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या उजव्या-डावखुऱ्या फिरकी दुकलीपुढे वेस्ट इंडीजच्या फलंदांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. अनुभवी रवींद्र जडेजाने आघाडीच्या ३ फलंदाजांना बाद केले. तर कुलदीपने एका फलंदाजाला माघारी धाडले. त्यामुळे दुसऱ्या दिवसाअखेर वेस्ट इंडीजने १४० धावांवर ४ फलंदाज गमावले आहेत. विंडीजला पहिल्या कसोटीत एक डाव आणि १४० धावांच्या फरकाने धूळ चारून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ही लढत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रातच संपुष्टात आली.
दुसऱ्या दिवशी शुभमन गिलने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने आपले दहावे शतक झळकावले. कर्णधाराने १९६ चेंडू खेळले. त्याच्या १२९ धावांच्या खेळीत त्याने १६ चौकार आणि २ षटकार मारले. गिलने नितीश कुमार रेड्डी (४३) सोबत चौथ्या विकेटसाठी ९१ आणि ध्रुव जुरेल (४४) सोबत पाचव्या विकेटसाठी १०२ धावा जोडल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत ३१८/२ अशा स्थितीत होता. दुसऱ्या दिवशी भारताने ४४.२ षटके खेळून आणखी २०० धावा वाढवल्या. गिलने कट शॉट मारून तीन धावा जमवून आपले शतक पूर्ण झाले. गिलने मागील सात कसोटी सामन्यांमध्ये पाचवे शतक ठोकले आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : १३४.२ षटकांत ५ बाद ५१८ (यशस्वी जैस्वाल १७५, शुभमन गिल नाबाद १२९; जोमेल वॉरिकन ३/९८); वेस्ट इंडिज (पहिला डाव) ४३ षटकांत ४ बाद १४० (अलिक अथानाझे ४१, टॅगेनरीन चंद्रपॉल ३४; रवींद्र जडेजा ३/३७).