क्रीडा

मालिका विजयासाठी आज निर्णायक झुंज; भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडशी तिसरा एकदिवसीय सामना

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी निर्णायक तिसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने ही लढत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Swapnil S

अहमदाबाद : टी-२० विश्वचषकातील अपयश बाजूला सारून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ मंगळवारी न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी निर्णायक तिसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने ही लढत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नुकताच यूएई येथे झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. न्यूझीलंडनेही भारताला गटात नमवले होते. सोफी डिवाइनच्या नेतृत्वाखाली मग न्यूझीलंडने प्रथमच टी-२० विश्वचषक उंचावण्याची किमया साधली. मात्र आता पुढील वर्षी भारतातच होणाऱ्या महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणी करण्याचे भारतापुढे आव्हान असेल.

स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा असे अनुभवी फलंदाज भारताच्या ताफ्यात आहेत. मात्र स्मृतीला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्या दोन्ही लढतींमध्ये तिने अनुक्रमे ५ व ० धावा केल्या आहेत. हरमनप्रीत सातत्याने धावा करत आहे. मात्र आघाडीच्या फळीचे अपयश भारताला दुसऱ्या लढतीत महागात पडले.

रेणुका सिंगच्या साथीने अरुंधती रेड्डी वेगवान गोलंदाजीची धुरा वाहत आहे. श्रेयांका पाटील, राधा यादव यांच्यावर फिरकीची भिस्त असेल. सायली सतघरे, साइमा ठाकोर, प्रिया मिश्रा, तेजल हसबनीस यांचा प्रथमच भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे. त्यांपैकी तेजल व मुंबईकर साइमाने दोन्ही लढतींमध्ये लक्षवेधी कामगिरी केली.

दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ टी-२० विश्वविजयामुळे फॉर्मात असून या स्पर्धेतील बहुतांश खेळाडू भारताविरुद्ध खेळतील. अमेलिया कर, डिवाईन, सुझी बेट्स, ली ताहुहू यांच्यावर किवी संघाची भिस्त असेल. पॉली इंग्लिसला प्रथमच संधी लाभली आहे. न्यूझीलंडचा महिला संघ अद्याप सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र न ठरल्याने त्यांच्या दृष्टीने ही मालिका जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे भारताला सांभाळून खेळावे लागेल.

- उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ५६ एकदिवसीय सामन्यांपैकी न्यूझीलंडने ३४, तर भारताने फक्त २१ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल.

प्रतिस्पर्धी संघ

-भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दयालन हेमलता, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), उमा छेत्री (यष्टिरक्षक), सायली सतगरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, तेजल हसबनीस, साइमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयांका पाटील.

-न्यूझीलंड : सोफी डिवाइन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, लॉरेन डाऊन, इजाबेला गेझ, मॅडी ग्रीन, ब्रूक हालिडे, पॉली इंग्लिस, फ्रान जोनास, जेस कर, अमेलिया कर, मोली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हॅना रोव, ली ताहुहू.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश