नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुल, सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज देवदत्त पडिकल यांच्यासह ११ कसोटी खेळाडूंना न्यूझीलंड-अ संघाविरुद्ध २४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन अनधिकृत कसोटी सामन्यांच्या १५ सदस्यीय भारत-असंघात स्थान देण्यात आले आहे.
बीसीसीआयच्या संक्षिप्त प्रसिद्धीपत्रकात मात्र राहुल, जैस्वाल आणि वॉशिंगटन सुंदर यांसारखे खेळाडू जे भारतीय एकदिवसीय संघाचाही भाग आहेत, ते न्यूझीलंडमधील तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये किती सामने खेळतील, याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. पहिला कसोटी सामना २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान लिंकन येथे खेळवला जाईल, तर ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान ख्राईस्टचर्च येथे दुसरा सामना होईल. त्यानंतर ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान लिंकन येथेच अंतिम कसोटी सामना पार पडेल. न्यूझीलंडविरुद्धचे पहिले तीन एकदिवसीय सामने ४, ७ आणि १० नोव्हेंबर रोजी होणार आहेत. त्यामुळे राहुल, वॉशिंगटन आणि जैस्वाल या सर्व खेळाडूंना सर्व अ-कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध राहणे अशक्यप्राय आहे.
या संघात दुखापतीपासून तंदुरुस्त होण्याच्या अटीवर ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. कसोटीसाठी पर्याय ठरलेला यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल भारत-अ संघाचे नेतृत्व करेल.
भारत-अ संघ
ध्रुव जुरेल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन स्मरण, ऋषभ पंत (तंदुरुस्तीच्या आधारे), वॉशिंग्टन सुंदर, आकिब नबी, आकाश दीप, अंशुल कंबोज, मानव सुथार, मुकेश चौधरी, साई सुदर्शन, यश राठोड, मुकेश कुमार.