युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : वैभव पुन्हा केंद्रस्थानी; आज श्रीलंकेविरुद्ध उपांत्य सामना BCCI
क्रीडा

युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : वैभव पुन्हा केंद्रस्थानी; आज श्रीलंकेविरुद्ध उपांत्य सामना

युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने यूएईविरुद्ध झळकावलेल्या विक्रमी द्विशतकामुळे भारत ‘अ’ संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. मात्र, आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी गुरुवारी होणाऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाला केवळ वैभवच्या फटकेबाजीवर अवलंबून राहून चालणार नाही.

Swapnil S

दोहा : युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने यूएईविरुद्ध झळकावलेल्या विक्रमी द्विशतकामुळे भारत ‘अ’ संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. मात्र, आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी गुरुवारी होणाऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाला केवळ वैभवच्या फटकेबाजीवर अवलंबून राहून चालणार नाही. संपूर्ण संघाला एकत्रितपणे सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.

वैभवने यूएईविरुद्ध अवघ्या ५३ चेंडूंत २०४ धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल २८ षटकार आणि सात चौकार ठोकले. त्याच्या या ऐतिहासिक खेळीमुळे अनेक विक्रम मोडले गेले. तसेच पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर भारतीय संघाला दमदार पुनरागमन करण्याची संधी मिळाली. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने नेपाळला अवघ्या २६ धावांत गुंडाळले होते. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला. पाकिस्तानने ३०० हून अधिक धावा करत भारतावर ४८ धावांनी विजय मिळवला. यूएईनेही आठ बाद २४९ धावांपर्यंत मजल मारली होती.

वैभवच्या आक्रमक खेळीमुळे भारतीय मधल्या फळीवरील दबाव काहीसा कमी झाला आहे. मात्र, आयुष बदोनी आणि रिंकू सिंह यांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. बदोनीला आतापर्यंत दोन सामन्यांत अनुक्रमे दोन आणि शून्य धावा करता आल्या आहेत. तर रिंकू सिंहने नऊ आणि सहा धावा केल्या आहेत. कर्णधार तिलक वर्माकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. त्याने दोन्ही सामन्यांत शतके झळकावली आहेत. मात्र, पाकिस्तानविरुद्ध १४९ चेंडूंत केलेले शतक अपेक्षित वेगाने झाले नव्हते. गोलंदाजीमध्ये प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी सात बळी घेतले आहेत. मात्र, श्रीलंकेच्या फलंदाजांना रोखण्यासाठी भारतीय वेगवान गोलंदाजांना अचूक टप्प्यावर आणि अधिक नियंत्रणाने गोलंदाजी करावी लागेल.

दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. निशान मदुश्का, लसिथ क्रूसपुल्ले आणि कर्णधार पवन रत्ननायके यांनी फलंदाजीत सातत्य दाखवले आहे. सहानच्या गोलंदाजीवर श्रीलंकेची मोठी भिस्त असेल.

वेळ : दुपारी ३.३० वाजता

थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३

४२ लाख शेतकऱ्यांना मोफत धान्य; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

पाच वर्षांत १०० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे लक्ष्य; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार; महापौर परिषदेचे उद्घाटन

पायाभूत क्षेत्राला बूस्टर; केंद्र सरकारची ११ हजार कोटींची तरतूद; उपकरण उत्पादनाला मिळणार चालना

पुण्यात कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार! शिवाजीनगर न्यायालयासमोर गँगवॉर, कोयत्याने हल्ला

अमेरिकेकडून १७ टक्के टॅरिफ प्रस्तावित