प्रिन्स-गुर्नूर-हर्ष-सुतार; भारतीय संघात नवे चेहरे चार, अफगाणिस्तानविरुद्धच्या दोन्ही मालिकेसाठी संघ जाहीर, पंतऐवजी राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार 
क्रीडा

प्रिन्स-गुर्नूर-हर्ष-सुतार; भारतीय संघात नवे चेहरे चार, अफगाणिस्तानविरुद्धच्या दोन्ही मालिकेसाठी संघ जाहीर, पंतऐवजी राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार

मागील सहा महिन्यांतील खराब फॉर्ममुळे ऋषभ पंतला भारताच्या कसोटी संघाचे उपकर्णधारपद गमवावे लागले आहे.

Swapnil S

मुंबई : मागील सहा महिन्यांतील खराब फॉर्ममुळे ऋषभ पंतला भारताच्या कसोटी संघाचे उपकर्णधारपद गमवावे लागले आहे. याशिवाय अफगाणिस्तानविरुद्धच्या घरच्या मैदानांवरील एकदिवसीय मालिकेसाठीही त्याला संघात स्थान मिळालेले नाही. राष्ट्रीय निवड समितीने मंगळवारी येथे झालेल्या बैठकीत काही कठोर निर्णय घेतले. या मालिकांसाठी भारतीय संघात चार नव्या चेहऱ्यांना प्रथमच स्थान लाभले आहे.

भारत जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध एक एकमेव कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही एकमेव कसोटी ६ जूनपासून मुल्लानपूर येथे होणार असून त्यानंतर १४ जूनपासून धरमशाला, लखनऊ आणि चेन्नई येथे तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या कसोटी मालिकेसाठी नवोदित डावखुरा फिरकीपटू मानव सुतार आणि हर्ष दुबे यांचा संघात समावेश केला आहे. त्यांच्यासोबत ६ फूट ६ इंच उंचीचा पंजाबचा वेगवान गोलंदाज गुर्नूर ब्रार यालाही संधी देण्यात आली असून त्याने या हंगामात केवळ दोन रणजी सामने खेळले आहेत. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आणि फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये सातत्याने अपयशी ठरणाऱ्या पंतच्या जागी आता अनुभवी के. एल. राहुलची कसोटी उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एकदिवसीय संघात राहुलसोबत दुसरा यष्टीरक्षक म्हणून इशान किशनला स्थान मिळाले असून वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवनेही संघात जागा मिळवली आहे.

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले की, समितीला पंतकडून त्याच्या जुन्या कामगिरीची अपेक्षा आहे, जी त्याने परदेशातील कठीण दौऱ्यांवर दाखवली होती. पंत हा एक उत्कृष्ट कसोटी खेळाडू असून सध्या तो एकदिवसीय संघात नाही. आम्ही त्याला कसोटीत सर्वोत्तम कामगिरी करताना पाहू इच्छितो आणि त्याच्या कसोटी संघातील स्थानाबाबत कोणतीही चिंता नाही, असे आगरकर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. दुखापत होण्यापूर्वी त्याचा इंग्लंड दौरा चांगला झाला होता, कसोटी क्रिकेटमध्ये तो अजूनही आमचा मुख्य खेळाडू आहे, असे सांगत आगरकर यांनी पंत सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या योजनेत नसल्याचे संकेत दिले. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांची तंदुरुस्तीच्या अटीवर एकदिवसीय संघात निवड करण्यात आली असून पुढील दोन आठवड्यांत त्यांच्या उपलब्धतेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही आगरकर म्हणाले.

अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा कसोटी संघाचा अविभाज्य भाग असून तरुण फिरकीपटूंना पडताळून पाहण्यासाठी त्याला या एकमेव कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे, अक्षर पटेलला खराब फलंदाजी आणि चेंडूला टर्न न देऊ शकल्यामुळे दोन्ही संघांतून वगळण्यात आले आहे. डावखुरे फिरकीपटू मानव सुथार आणि हर्ष दुबे मागील दोन हंगामांपासून निवड समितीच्या रडारवर होते, त्यामुळे त्यांची निवड अनपेक्षित नाही. दुबेची एकदिवसीय संघातही निवड झाली असून समिती त्याच्याकडे भविष्यातील अष्टपैलू पर्याय म्हणून पाहत आहे. याशिवाय नितीश कुमार रेड्डीच्या गोलंदाजीत गेल्या काही महिन्यांत बरीच सुधारणा झाली असून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून अधिक परिपक्व होईल, असा विश्वास आगरकर यांनी व्यक्त केला.

एकूणच आता आयपीएल संपल्यावर जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकांकडे सर्वांचे लक्ष असेल. रोहित व विराटचे पुनरागमनही यानिमित्ताने भारताच्या एकदिवसीय संघात होईल.

कसोटी संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, गुर्नूर ब्रार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल.

एकदिवसीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्ष दुबे, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुर्नूर ब्रार. (रोहित व हार्दिकचा समावेश तंदुरुस्ती चाचणीवर अवलंबून असेल.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग