क्रीडा

भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका; भारतीय महिलांना मालिका विजयाची पुन्हा हुलकावणी

Swapnil S

नवी मुंबई : सांघिक कामगिरी करण्यात पुन्हा एकदा अपयश आल्याने भारतीय महिलांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात प्रथमच टी-२० मालिका जिंकण्यात अपयश आले. तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ७ गडी व ८ चेंडू राखून सहज वर्चस्व गाजवत मालिकेत २-१ असे यश संपादन केले.

नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ६ बाद १४७ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार हरमनप्रीत कौर (३) व जेमिमा रॉड्रिग्ज (२) यांनी निराशा केली. मात्र रिचा घोष (२८ चेंडूंत ३४ धावा), स्मृती मानधना (२९) व शफाली वर्मा (२६) यांनी उपयुक्त योगदान दिले. दीप्ती शर्माने १८ चेंडूंत १४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी ॲनाबेल सदरलँड व जॉर्जिया वेरहॅमने प्रत्येकी दोन बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार एलिसा हिली (३८ चेंडूंत ५५), बेथ मूनी (५४ चेंडूंत नाबाद ५२) या सलामीवीरांनी १० षटकांतच ८५ धावा फटकावल्या. दीप्तीने हिलीला बाद करून ही जोडी फोडली. पूजा वस्त्रकारने ताहिला मॅकग्रा (२०) व एलिस पेरीला (०) एकाच षटकात बाद करून रंगत निर्माण केली. मात्र मूनी व फोबे लिचफील्ड (नाबाद १७) यांनी चौथ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी रचून १८.४ षटकांतच कांगारूंचा विजय साकारला. सदरलँड सामनावीर, तर हिली मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ६ टी-२० मालिकांपैकी भारताने तब्बल पाचवी मालिका गमावली. २०१५-१६मध्ये फक्त ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत नमवण्याचा पराक्रम मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने केला होता.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस