भारताने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका ३-० ने जिंकली; यशस्वी जैस्वालचे नाबाद शतक, प्रसिध कृष्णाचे ५ बळी Photo : X
क्रीडा

भारताने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका ३-० ने जिंकली; यशस्वी जैस्वालचे नाबाद शतक, प्रसिध कृष्णाचे ५ बळी

यशस्वी जैस्वालचे नाबाद शतक आणि कर्णधार रोहित शर्माच्या ७९ धावांच्या जोरावर भारताने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा ९ गडी राखून पराभव केला. यासह भारताने तीन वनडे सामन्यांची ही मालिका ३-० अशी जिंकली.

Swapnil S

चेन्नई : यशस्वी जैस्वालचे नाबाद शतक आणि कर्णधार रोहित शर्माच्या ७९ धावांच्या जोरावर भारताने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा ९ गडी राखून पराभव केला. यासह भारताने तीन वनडे सामन्यांची ही मालिका ३-० अशी जिंकली.

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने २३ धावांत घेतलेले ५ बळी हे या विजयाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेले २१९ धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या २८.४ षटकांत १ विकेट्सच्या मोबदल्यात २२४ धावा करून पूर्ण केले. कर्णधार अफगाणिस्तानचे हशमतुल्ला शाहिदी याचे १०२ धावांचे झुंजार शतक भारताच्या आक्रमक खेळीसमोर व्यर्थ ठरले. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. रोहितने अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खानविरुद्ध सलग चौकार आणि षटकार ठोकले. दुसरीकडे जैस्वालने वेगवान गोलंदाज अजमतुल्ला ओमरझाईच्या पहिल्याच ९ चेंडूंच्या षटकात ३ चौकार मारत २३ धावा वसूल केल्या. या षटकात अफगाणिस्तानचा कर्णधार शाहिदी धावपट्टीच्या डेंजर झोनमध्ये वारंवार धावल्यामुळे भारताला ५ पेनल्टी धावा देखील मिळाल्या.

तत्पूर्वी, प्रसिद्ध कृष्णाच्या अचूक गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानचा संघ २१८ धावांत सर्वबाद झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. प्रसिद्धने आपल्या सुरुवातीच्या स्पेलमध्ये ४ बळी घेत अफगाणिस्तानची अवस्था ३६ धावांवर ४ बाद अशी केली होती. त्याने रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान आणि रहमत शाह यांना रोहित शर्माकरवी पहिल्या स्लिपमध्ये झेलबाद केले. तर दरविश रसुलीचा झेल श्रेयस अय्यरने घेतला.

पहिल्या १० षटकांत ४ बळी घेण्याच्या या कामगिरीमुळे प्रसिद्धने जसप्रीत बुमराह, जवागल श्रीनाथ आणि मोहम्मद सिराज यांच्या एलिट क्लबमध्ये स्थान मिळवले. यानंतर कर्णधार शाहिदी आणि अजमतुल्ला ओमरझाई यांनी पाचव्या गड्यासाठी ११७ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी करून डाव सावरला. ओमरझाई ५० धावा करून प्रिन्स यादवच्या चेंडूवर बाद झाला, त्याचा झेल प्रसिद्धने घेतला.

त्यानंतर शाहिदीने मोहम्मद नबीसोबत ६७ धावांची भागीदारी केली. शाहिदीने १२८ चेंडूंत आपले पहिले एकदिवसीय शतक पूर्ण केले. खेळताना कॅम्प्स आल्यानंतरही त्याने आपली खेळी सुरू ठेवली आणि संघाला २०० चा टप्पा पार करून दिला.

जैस्वालचे दुसरे वनडे शतक

जैस्वालने ३८ चेंडूंत आणि रोहितने ४७ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या २२.५ षटकांत १७० धावांची दणदणीत भागीदारी केली. रोहित शर्मा मोहम्मद नबीच्या चेंडूवर बदली खेळाडू सेदीकुल्ला अटलकडे झेल देऊन बाद झाला. यानंतर जैस्वालने ८३ चेंडूंत आपले दुसरे एकदिवसीय शतक पूर्ण केले आणि नबीच्या चेंडूवर षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. जैस्वाल ११० धावांवर नाबाद राहिला.

विधिमंडळाचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन टायगर, पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी, विषारी दारूकांडाचे मुद्दे गाजणार

भिवंडीत फेमस शोरमा हॉटेलवर बुलडोझर; अन्न विषबाधाग्रस्त रुग्णांची संख्या १०७ वर; महापालिकेने केली कारवाई

मंच्युरियनमध्ये आढळले पालीचे पिल्लू; उल्हासनगरातील तरुणीची प्रकृती बिघडली

लाडकी बहीणनंतर शिवसेनेचे लाडकी सून अभियान; राज्य प्रमुखपदी मीनाक्षी शिंदे, महिलांच्या न्यायासाठी उभारणार सक्षम यंत्रणा

Mumbai : उच्च रक्तदाब ठरतोय आरोग्याचा मोठा धोका; फादर्स डे निमित्ताने डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता