भारताचा थरारक विजय; न्यूझीलंडवर चार विकेट्स शिल्लक राखून मात तिलक वर्माची नाबाद अर्धशतकी खेळी 
क्रीडा

भारताचा थरारक विजय; न्यूझीलंडवर चार विकेट्स शिल्लक राखून मात तिलक वर्माची नाबाद अर्धशतकी खेळी

तिलक वर्माच्या झंझावाती नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चार विकेट्स शिल्लक राखून थरारक विजय मिळवला. शनिवारी झालेल्या या सामन्यात भारताची अवस्था ७० धावांवर पाच गडी बाद अशी बिकट झाली होती. मात्र, तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताला एका चेंडूच्या अंतराने विजय मिळवून दिला.

Swapnil S

खाइस्टचर्च : तिलक वर्माच्या झंझावाती नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चार विकेट्स शिल्लक राखून थरारक विजय मिळवला. शनिवारी झालेल्या या सामन्यात भारताची अवस्था ७० धावांवर पाच गडी बाद अशी बिकट झाली होती. मात्र, तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताला एका चेंडूच्या अंतराने विजय मिळवून दिला. भारताने १९.५ षटकांत सहा विकेट्सच्या मोबदल्यात १८१ धावा करून विजयाचे लक्ष्य गाठले.

तिलकने अवघ्या २६ चेंडूंत नाबाद ५१ धावा केल्या. त्याच्या खेळीत सहा चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. नितीश कुमार रेड्डीनेही १३ चेंडूंत नाबाद २६ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. रेड्डीने आपल्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार लगावला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी अवघ्या ३० चेंडूंत नाबाद ६९ धावांची भागीदारी करत सामन्याचे चित्रच पालटले. एकवेळ पराभवाच्या छायेत असलेल्या भारताला या भागीदारीने विजयाच्या उंबरठ्यावर आणले.

भारताच्या डावाची सुरुवात मात्र अडखळत झाली. जेकब डफीने संजू सॅमसनला १४ धावांवर बाद केले, तर नॅथन स्मिथने वैभव सूर्यवंशीला अवघ्या चार धावांवर माघारी धाडले. अभिषेक शनि २१ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह २७ धावा केल्या; मात्र मिचेल सँटनरने त्याला बाद केले.

कर्णधार श्रेयस अय्यरला केवळ सात धावा करता आल्या. सँटनरने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर अक्षर पटेलला ११ धावांवर बाद करत सँटनरने भारताची अवस्था १०.५ षटकांत पाच बाद ७० धावा अशी केली. सँटनरने चार षटकांत २१ धावा देत चार बळी मिळवले.

या कठीण परिस्थितीत नमन धीरने आक्रमक फलंदाजी करत भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. त्याने १७ चेंडूंत ३१ धावा केल्या. त्याच्या खेळीत एक चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्याने तिलकसोबत महत्त्वपूर्ण धावा जमवल्या.

फिलिप्स-जेकब्सची अर्धशतके ; न्यूझीलंडच्या १८० धावा

तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला प्रभावी कामगिरी केली; मात्र ग्लेन फिलिप्स आणि बेव्हॉन जेकब्स यांच्या अर्धशतकी खेळींमुळे न्यूझीलंडने पाच गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा उभारल्या. फिलिप्सने ४३ चेंडूंत ७० धावा केल्या, तर जेकब्सने ४६ चेंडूंत ५८ धावा ठोकल्या. या दोघानी चौथ्या विकेटसाठी ११६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. सुरुवातीला तीन गडी गमावल्यानंतर या जोडीने संयमाने फलंदाजी केली आणि अखेरच्या टप्प्यात धावांचा वेग वाढवला.

चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

भारताला दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगने टीम सेइफर्टला सात धावांवर बाद करत पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर प्रिन्स यादवने फिन अॅलनला १६ धावांवर, तर भुवनेश्वर कुमारने डॅरिल मिचेलला सहा धावांवर बाद केले. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था तिसऱ्या षटकाअखेर दोन बाद आणि सहाव्या षटकात तीन बाद ४१ धावा अशी झाली. फिलिप्सने ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने एकूण चार चौकार आणि चार षटकार लगावले. जेकब्सने ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना पाच चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी केली. दोघांनी ६९ चेंडूत चौथ्या विकेटसाठी शतकी (११६ धावा) भागीदारी पूर्ण केली. १८व्या षटकात अर्शदीपच्या गोलंदाजीवर नमन धीरने झेल टिपल्याने फिलिप्सची खेळी संपुष्टात आली. त्यानंतर नितीश कुमार रेड्डीने जेकब्सला ५८ धावांवर बाद केले. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था १६५ धावांवर पाच गडी बाद अशी झाली.

भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी

अर्शदीपने चार षटकांत ३३ धावा देत दोन बळी मिळवले. प्रिन्स यादवने ३० धावांत एक, तर भुवनेश्वर कुमारने ५० धावांत एक बळी घेतला. अक्षर पटेलने चार षटकांत २८ धावा दिल्या. नितीश रेड्डीने तीन षटकांत ३१ धावा देत एक बळी मिळवला. अखेरच्या दोन षटकांत मायकेल ब्रेसवेलने एक चौकार आणि एक षटकार ठोकत न्यूझीलंडच्या धावसंख्येत २३ धावांची भर घातली. त्यामुळे न्यूझीलंडला १८० धावांपर्यंत मजल मारता आली.

तिलक वर्माचा नवा विश्वविक्रम

भारताचा टी-२० उपकर्णधार तिलक वर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन झेल टिपत नवा विक्रम प्रस्थापित केला. एका कॅलेंडर वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. यंदाच्या मोसमात त्याच्या नावावर २६ झेल जमा झाले आहेत. यापूर्वी हा विक्रम इंडोनेशियाच्या डॅनिलसन हावोच्या नावावर होता. त्याने २०२५ मध्ये २५ झेल टिपले होते.

अर्शदीप सिंगचे सर्वाधिक बळी

भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत एका कॅलेंडर वर्षात भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याचा मान मिळवला. या कामगिरीसह अर्शदीपने अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा चार वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. न्यूझीलंडविरुद्ध शनिवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्शदीपने चार षटकांत ३३ धावा देत दोन बळी मिळवले. त्याने टीम सेइफर्ट आणि ग्लेन फिलिप्स यांना बाद केले. या कामगिरीमुळे त्याच्या नावावर २०२६ या वर्षात ३८ बळी जमा झाले आहेत. यापूर्वी भुवनेश्वर कुमारने २०२२ मध्ये ३२ सामन्यांत १९.५६ च्या सरासरीने ३७ बळी मिळवले होते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तपासात फेरफाराची भीती; पुढील निर्णय घेण्यापूर्वी महिनाभर तपासावर लक्ष ठेवणार- जरांगे

भारताचा हेतू योग्य नाही, पाकिस्तानमुळे काश्मिरी सुरक्षित; डॉ. फारुख अब्दुल्ला यांचे धक्कादायक वक्तव्य

Mumbai 'एसआयआर'मध्ये गोलमाल; एकाच व्यक्तीकडून एकाच दिवशी २४ अर्ज, धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai : बेस्ट बसमध्ये न घेतल्यास कोयता हाती घेऊ! मच्छिमार महिला संतप्त

एशियाटिकमधील वंदे मातरम् अपमान प्रकरण : डॉ. मुणगेकरांवर कारवाईची टांगती तलवार