चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : भारतीय पुरुष हॉकी संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत X
क्रीडा

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : भारतीय पुरुष हॉकी संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत

पाच वेळच्या विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा ८-१ असा एकतर्फी पराभव केला.

Swapnil S

जालंधर : पाच वेळच्या विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा ८-१ असा एकतर्फी पराभव केला. शिलानंद लाक्रा आणि दिलप्रीत सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली, हे विशेष.

भारताकडून शिलानंद लाक्राने चौथ्या आणि १३व्या मिनिटाला गोल केले. दिलप्रीत सिंगने २१व्या आणि २५व्या मिनिटाला गोल करत आपली चमक दाखवली. कर्णधार हरमनप्रीत सिंग (९वे मिनिट), सुखजीत सिंग (२१वे मिनिट), अंगद बीर सिंग (३६वे मिनिट) आणि विवेक सागर प्रसाद (५४वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. दक्षिण कोरियाकडून हान सांगजुन याने नवव्या मिनिटाला एकमेव गोल केला. भारताने या विजयासह विक्रमी सातव्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

भारताने साखळी फेरीतही दक्षिण कोरियाचा ८-० असा पराभव केला होता. त्यामुळे उपांत्य सामन्यातही भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम राखले. यंदाच्या स्पर्धेत भारताने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. सहा संघांच्या साखळी फेरीत पाचही सामने जिंकत भारताने अव्वल स्थान पटकावले होते.

दोन सत्रांतच सहा गोल

सामन्याच्या चौथ्या मिनिटाला शिलानंद लाक्राने मैदानी गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, नवव्या मिनिटाला हान सांगजुनने मैदानी गोल करत दक्षिण कोरियाला बरोबरी साधून दिली. त्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने या संधीचे सोने करत भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली. १३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरील रिबाऊंडचा फायदा घेत लाकराने आपला दुसरा गोल केला. त्यामुळे पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताने ३-१ अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात भारतीय आक्रमण अधिक आक्रमक झाले. २१व्या मिनिटाला सुखजीत सिंगने मैदानी गोल केला. त्यानंतर लगेचच दिलप्रीत सिंगने गोल करत भारताची आघाडी वाढवली. २५व्या मिनिटाला आणखी एक मैदानी गोल करत दिलप्रीतने दुसरा गोल नोंदवला. मध्यंतराला भारताने ६-१ अशी आघाडी घेतली होती.

उत्तरार्धातही वर्चस्व कायम

उत्तरार्धातील तिसऱ्या सत्रात ३६व्या मिनिटाला अंगद बीर सिंगने मैदानी गोल करत भारताची आघाडी ७-१ अशी केली. अखेरच्या सत्रात ५४व्या मिनिटाला विवेक प्रसादने आणखी एक गोल करत भारताच्या विजयावर मोहोर उमटवली. या सामन्यात भारताला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले, तर कोरियाला एकही कॉर्नर मिळवता आला नाही. भारताने आक्रमण आणि बचाव अशा दोन्ही आघाड्यांवर छाप पाडली.

आज जपानशी जेतेपदासाठी गाठ

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा अंतिम सामना गुरुवारी जपानविरुद्ध होणार आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात जपानने मलेशियाला पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ असे पराभूत केले. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता.

भारताने २०११, २०१६, २०१८, २०२३, २०२४ असे पाच वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. जपानने आजवर एकदाही जेतेपद मिळवलेले नाही. त्यांना दोन वेळा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. सायंकाळी ७ वाजता ही लढत सुरू होईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिवाळीत गावी जाणं महागलं! खासगी बसच्या तिकीट दरांत थेट दुप्पट-तिप्पट वाढ, प्रवासी संतापले

'ते' कायदे आता कालबाह्य - सर्वोच्च न्यायालय

फटाके फोडण्याच्या वेळा ठरवा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

'गोकुळ'साठी डाव! सहकार कायद्यात दुरुस्ती; सरकारकडून पाच सदस्यांची नियुक्ती

फॉर्म ६, घोषणापत्र आता वेगवेगळे