क्रीडा

ICC T20 World Cup 2026 : भारताचा पुढील मार्ग खडतर! सुपर-आठच्या पहिल्या गटात भारत, द.आफ्रिका, विंडीजचा समावेश; चौथा संघ लवकरच ठरणार

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने रविवारी पाकिस्तानला धूळ चारून थाटात आगेकूच केली. आता सुपर-आठ फेरीतील भारताचा गट जवळपास स्पष्ट झाला आहे.

Swapnil S

क्रीडा प्रतिनिधी/मुंबई

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने रविवारी पाकिस्तानला धूळ चारून थाटात आगेकूच केली. आता सुपर-आठ फेरीतील भारताचा गट जवळपास स्पष्ट झाला आहे. या फेरीत भारताचा पहिल्या गटात समावेश असून त्यांना दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध दोन हात करायचे आहेत. चौथ्या संघासाठी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यात चुरस असेल. त्यामुळे एकूणच भारताचा यापुढील मार्ग खडतर असेल.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

या स्पर्धेत अ-गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया यांचा समावेश आहे. ब-गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान हे संघ आहेत. क-गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ, इटली, स्कॉटलंड यांना स्थान देण्यात आले आहे, तर ड-गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ सुपर-आठ फेरीत दाखल होतील. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार केले जातील. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. ७ मार्चला अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळवण्यात येईल.

दरम्यान, स्पर्धेचा थरार आता साखळी फेरीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. काही गटांतील आघाडीचे संघ ठरले असून त्यांनी सुपर-आठ फेरीतील स्थान पक्के केलेले आहे. अ-गटातून भारताने सलग तीन विजयांसह सर्वप्रथम आगेकूच केली आहे. भारताने वानखेडेवर अमेरिकेला पराभूत केले. मग नवी दिल्ली येथे नामिबियाला धूळ चारली. रविवारी कोलंबो येथे पाकिस्तानला चीतपट करून भारताने सुपर-आठ फेरीच्या पहिल्या गटातील स्थान पक्के केले. भारताचा शेवटचा साखळी सामना बुधवारी नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. मात्र या लढतीच्या निकालाचा भारतावर काहीही परिणाम होणार नाही.

दुसरकडे साखळी फेरीच्या क-गटातून वेस्ट इंडिज व इंग्लंड या संघांनी बाद फेरी गाठली आहे. विंडीजने रविवारी नेपाळला नमवून आगेकूच केली, तर सोमवारी इंग्लंडने इटलीवर मात केल्यामुळे त्यांचाही मार्ग मोकळा झाला. त्यामुळे क-गटातील अन्य तीन संघ म्हणजेच स्कॉटलंड, इटली व नेपाळ यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. तसेच ड-गटातून सलग तीन विजयांसह आफ्रिकेने बाद फेरी गाठली आहे. दुसऱ्या स्थानासाठी अद्याप न्यूझीलंड, अफगाणिस्तान, यूएई यांच्यात चुरस आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आयसीसीने जागतिक क्रमवारीनुसार संघांना मानांकन दिले होते. त्यामुळे भारत, विंडीज व आफ्रिका यांनी आपापल्या गटात साखळी फेरीच्या अखेरीस अग्रस्थान मिळवले किंवा नाही, तरी ते सुपर-आठ फेरीत एकाच गटात येण्याची शक्यता आहे.

सुपर-आठ फेरीच्या पहिल्या गटातील चौथा संघ मात्र अद्याप ठरलेला नाही. त्यासाठी साखळी फेरीच्या ब-गटातून कोण आगेकूच करणार, हे पाहणे रंजक ठरेल. ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे व आयर्लंड या तिन्ही संघांना सुपर-आठ फेरीत जाण्याची संध आहे. त्यापैकी ऑस्ट्रेलिया किंवा झिम्बाब्वे भारताच्या गटात येईल. श्रीलंका दुसऱ्या गटात दाखल झालेली आहे. एकूणच विश्वचषकातील पुढील काही दिवस रोमाचंक ठरणार आहेत.

आतापर्यंत या स्पर्धेत नवख्या देशांनी बलाढ्य संघांना झुंजवले आहे. नेपाळ-इंग्लंड, भारत-अमेरिका, नेदरलँड्स-पाकिस्तान ही यांपैकीच काही उदहरणे. तर झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला नमवून हंगामा केला. त्यामुळेच हा विश्वचषक रंगतदार ठरत आहे.

अशा असतील भारताच्या लढती

  • रविवार, २२ फेब्रुवारीला भारताची सुपर-आठ फेरीतील पहिल्या लढतीत आफ्रिकेशी गाठ पडेल. अहमदाबाद येथे ही लढत होईल.

  • मग २६ तारखेला भारताचा दुसरा सामना होईल. या लढतीसाठी भारताचा प्रतिस्पर्धी अद्याप ठरलेला नाही.

  • त्यानंतर १ मार्च रोजी भारताचा वेस्ट इंडिजशी कोलकाता येथे मुकाबला होईल. सुपर-आठ फेरीत ३ पैकी किमान २ सामने जिंकणे गरजेचे असेल.

दुसऱ्या गटात इंग्लंड, श्रीलंका

सुपर-आठ फेरीच्या दुसऱ्या गटात तूर्तास इंग्लंड व श्रीलंका यांचे स्थान पक्के आहे. श्रीलंकेने सोमवारी सुपर-आठ फेरी गाठली. या गटात साखळी फेरीच्या अ-गटातील दुसरा संघ (पाकिस्तान किंवा अमेरिका) दाखल होईल. तसेच ड-गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ (न्यूझीलंड किंवा अफगाणिस्तान) सुपर-आठ फेरीच्या दुसऱ्या गटात जाईल. त्यामुळे या गटातील संघ कोण असणार, याकडे लक्ष असेल. मात्र भारताच्या गटाच्या तुलनेत हा गट काहीसा सोपा असू शकतो. त्यासाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल.

मुंबईत PM मोदी आणि मॅक्रॉन यांची गळाभेट; 'भारत-फ्रान्स इनोव्हेशन ईयर'चे करणार उद्घाटन, दिल्लीत AI समिटमध्येही होणार सहभागी

"तो आमचं सर्वस्व होता": एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दाम्पत्याची आत्महत्या; ४ पानी सुसाईड नोटसह Video मेसेज व्हायरल

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

लोकलच्या गर्दीतून दिलासा,१२ वीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जाग! KDMC-TMCचा निर्णय, ठाणे-डोंबिवली-कल्याण बससेवा होणार सुरु

ठाणे सामूहिक अत्याचार प्रकरण : पुण्यातून २२ वर्षीय आरोपीला अटक, वर्षभरापासून होता फरार