नवी दिल्ली : २०३६ च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांच्या यजमानपदासाठी भारताने आपली तयारी आणि भविष्यातील नियोजन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) फ्युचर होस्ट कमिशनसमोर मांडले. देशातील क्रीडा पायाभूत सुविधांचा वेगाने होणारा विकास आणि गेल्या काही वर्षांत डोपिंगविरोधात करण्यात आलेल्या कठोर उपाययोजनांवर भारताने विशेष भर दिला.
गुरुवारी ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या बैठकीत भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) निवर्तमान अध्यक्ष पी. टी. उषा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघुराम अय्यर यांनी भारताची बाजू मांडली. अहमदाबाद शहराची ऑलिम्पिक आयोजनासाठी असलेली तयारी हा सादरीकरणाचा मुख्य विषय होता. सुमारे ३० मिनिटांच्या सादरीकरणानंतर कोलिंदा ग्राबार-कितारोविच यांच्या नेतृत्वाखालील नऊ सदस्यीय फ्युचर होस्ट कमिशनसोबत चर्चा झाली. ही चर्चा जवळपास २० मिनिटे चालली.
२०३६च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारतासह जर्मनी, हंगेरी, कतार, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्किये हे देश इच्छुक आहेत. तुर्कियेने फ्युचर होस्ट कमिशनसमोर आपले पहिले सादरीकरण आधीच केले असल्याचे समजते. भारताच्या सादरीकरणानंतर आयओसीकडून जनतेचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी एक गोपनीय सर्वेक्षण केले जाणार आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात हे सर्वेक्षण अपेक्षित असून पुढील वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या भारताच्या प्रस्तावाच्या मूल्यांकनात त्याला महत्त्व असेल. भारताला २०३०च्या राष्ट्रकुलचे यजमानपद आधीच मिळाले आहे.