मुल्लानपूर : डावखुरा फिरकीपटू मानव सुतारने (सामन्यांत ७ बळी) पदार्पणात केलेल्या प्रभावी माऱ्याला अन्य गोलंदाजांची योग्य साथ लाभली. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानविरुद्धची एकमेव कसोटी अडीच दिवसांतच जिंकून खेळ खल्लास केला. शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने सोमवारी तब्बल एक डाव आणि ३०० धावांच्या फरकाने अफगाणिस्तानचा फडशा पाडताना कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय नोंदवला.
मुल्लानपूरच्या महाराज यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या कसोटीत भारताने उभारलेल्या ५६४ धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव ५८.४ षटकांत १५२ धावांत आटोपला. या डावात मानवने ३३ धावांत ६ बळी पटकावले. मग भारताने त्यांच्यावर फॉलोऑन लादून अफगाणिस्तानचा दुसरा डावही सोमवारीच ३५.५ षटकांत ११२ धावांत गुंडाळला. ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने ४, तर कुलदीप यादवने ३ बळी मिळवले. त्यामुळे भारताने तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रामध्येच शानदार विजय नोंदवला. पदार्पणवीर मानवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. यापूर्वी २०१८मध्ये भारताने वेस्ट इंडिजला एक डाव आणि २७२ धावांच्या फरकाने पराभूत केले होते.
दरम्यान, आयपीएलचा १९वा हंगाम नुकताच संपन्न झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदा सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद काबिज केले. त्यापूर्वी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता, तर भारताचा अखेरचा कसोटी सामना नोव्हेंबर २०२५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला होता. आता अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याद्वारे भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा प्रारंभ केला. एकमेव कसोटीनंतर उभय संघांत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून १३ जून रोजी धरमशाला येथे पहिला, तर १७ व २० जून रोजी अनुक्रमे लखनऊ व चेन्नई येथे दुसरा व तिसरा एकदिवसीय सामना होईल.
तत्पूर्वी, रविवारी दुसऱ्या दिवसअखेर अफगाणिस्तानची पहिल्या डावात ५ बाद ११३ अशी स्थिती होती. तेथून पुढे सोमवारी सुरुवात करताना रहमत शाहने अर्धशतकी झुंज देत १३५ चेंडूंत ६० धावा केल्या. दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. प्रसिध कृष्णाने ओमरझाईचा शून्यावर त्रिफळा उडवला. मग मानवने अश्रफचा (११) अडसर दूर केला. मानवनेच रहमतलाही बाद करून पदार्पणातच डावात पाच बळी मिळवण्याचा पराक्रम केला. सुंदरने मग रहमानला बाद करून पहिला डाव १५२ धावांत गुंडाळला. भारताला ४१२ धावांची आघाडी मिळाल्याने त्यांनी फॉलोऑन लादला.
दुसऱ्या डावात अफगाणी फलंदाजांनी मानववर आक्रमण केले. मात्र यावेळी सुंदर, कुलदीप यांनी पुढाकार घेतला. मोहम्मद सिराजने अब्दुल मलिकला (८) पायचीत पकडून सुरुवात केली. सेदिउल्ला अटल (४२) व रहमनुल्ला गुरबाझ (२४) यांनी काहीसा प्रतिकार केला. मात्र सुंदर व कुलदीपने अनुक्रमे दोघांना बाद केले. मानवने मग झझईला पायचीत पकडले. अखेरीस ३६व्या षटकात कुलदीपने लागोपाठच्या चेंडूवर सलीम व खरोटेला बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मूळचा राजस्थानचा, तर आयपीएलमध्ये गुजरातकडून खेळणारा २३ वर्षीय मानवची कामगिरी या लढतीत लक्षवेधी ठरली. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने मानवचा उत्तम पर्याय भारताकडे उपलब्ध असेल.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : १२७ षटकांत ८ बाद ५६४ घोषित
अफगाणिस्तान (पहिला डाव) : ५८.४ षटकांत सर्व बाद १५२ (रहमत शाह ६०; मानव सुतार ६/३३)
अफगाणिस्तान (दुसरा डाव) : ३५.५ षटकांत सर्व बाद ११२ (सेदिउल्ला अटल ४२; वॉशिंग्टन सुंदर ४/४२, कुलदीप यादव ३/३०)
सातत्य महत्त्वाचे!
कसोटी प्रकारात सातत्य राखणे महत्त्वाचे असते. मी सरावात एकाच टप्प्यावर गोलंदाजी करण्यावर भर देतो. त्यामुळेच मला पदार्पणात यश लाभले. भविष्यातही संधी मिळाली, तरी कामगिरीत सातत्य राखण्याचा माझा प्रयत्न असेल, असे मानव सामन्यानंतर म्हणाला.
हे आकडे चुकवू नका !
भारताने एक डाव आणि ३०० धावांच्या फरकाने विजय मिळवला. भारताचा हा कसोटी क्रिकेटमधील आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी २०१८मध्ये भारताने वेस्ट इंडिजला एक डाव आणि २७२ धावांच्या फरकाने हरवले होते.
मानवने पदार्पणाच्या कसोटीतील पहिल्या डावात ६ बळी घेतले. भारतासाठी पदार्पणात कसोटीतील एका डावात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. नरेंद्र हिरवाणी यांनी १९८८मध्ये विंडीजविरुद्ध पहिल्या डावात ८ बळी घेतले होते. हा विक्रम आजही कायम आहे.
पदार्पणातील कसोटीत सामनावीर पुरस्कार जिंकणारा मानव हा नववा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी प्रवीण अमरे, रुद्रप्रताप सिंग, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल यांनी हा पराक्रम केला होता.
कसोटी पदार्पणात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी मिळवणारा मानव हा एकंदर १०वा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी एम निसार, वामन कुमार, सय्यद अली, दिलीप जोशी, नरेंद्र हिरवाणी, अमित मिश्रा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, अक्षर पटेल यांनी अशी कामगिरी केली होती.