नवी दिल्ली : भारत २०३६ ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी उत्सुक आहेच, पण त्यापूर्वी २०३०च्या युवा ऑलिम्पिकसाठीदेखील भारत बोली लावणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली.
युवा ऑलिम्पिक स्पर्धेचे २०३०मध्ये पाचवे पर्व रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत या स्पर्धेच्या यजमानपदासाठी बोली लावणार आहे. मात्र, आमचे मुख्य उद्दिष्ट २०३६ ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळविण्याकडे असेल, असे मांडविय म्हणाले. आशिया ऑलिम्पिक परिषदेच्या महासभेसाठी मांडविय उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
क्रिकेट विश्वचषक, १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भारताने यशस्वी आयोजन करून दाखवले आहे. आता आम्ही ऑलिम्पिकचे शिवधनुष्य पेलण्यासाठी सज्ज झालो आहोत, असे भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. नड्डा या महासभेसाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. युवा ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताची पेरू, कोलंबिया, मेक्सिको, थायलंड, मंगोलिया, रशिया, युक्रेन, बोस्निया आणि हर्जेगोव्हिना या देशांशी स्पर्धा आहे.
जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके कमावली. यंदा भारताला तेथे सुवर्ण जिंकण्यात अपयश आले. मात्र पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी २९ पदकांची लयलूट केली. यामध्ये सात सुवर्णपदकांचा समावेश होता. त्यामुळे आता २०३६च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत पूर्ण जोमाने दावेदारी सादर करणार आहे.