लंडन : शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्याची नामी संधी आहे. त्यासाठी त्यांनी गुरुवारपासून ओव्हल स्टेडियमवर रंगणारा पाचवा कसोटी सामना जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळे उभय संघांतील या लढतीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून असेल.
आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. परिणामी रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन असे तारांकित खेळाडूही एकामागोमाग कसोटीतून निवृत्त झाले. त्यामुळे आता युवा गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
मात्र गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडने भारताला धूळ चारली. मग एजबॅस्टन येथे भारताने पलटवार करताना मालिकेत बरोबरी साधली. तिसऱ्या कसोटीत भारताने साऊथहॅम्पटन येथे अवघ्या २२ धावांनी पराभव पत्करला. मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत मग भारताने दुसऱ्या डावात तब्बल पाच सत्र फलंदाजी करून लढत अनिर्णित राखली. त्यामुळे उभय संघांतील पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या इंग्लंडचा संघ २-१ असा आघाडीवर आहे.
मुख्य म्हणजे भारताने आजवर कोणत्याही मालिकेत २-१ अशा पिछाडीवर असताना मालिका बरोबरीत सोडवलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ यावेळी हा पराक्रम करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष असेल. भारताने २००७मध्ये यापूर्वी इंग्लंडमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात अखेरची कसोटी मालिका जिंकली होती.
भारतीय संघासमोर विविध खेळाडूंना झालेल्या दुखापती, वर्कलोड मॅनेजमेंट आणि इंग्लिश मिडीयाकडून करण्यात येणारी टीका यांसारख्या विविध आव्हानांना सामोरे जात पाचव्या कसोटीसाठी योग्य संघनिवड करण्याचे आव्हान असेल. प्रशिक्षक गंभीर व पिच क्युरेटर फोर्टिस यांच्यातील वाद ताजाच असल्याने सामन्यादरम्यान चाहत्यांकडून भारतीय खेळाडूंना डिवचलेसुद्धा जाऊ शकते.
दरम्यान, या कसोटीतही पाचव्या दिवसापर्यंत सामना लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मालिकेतील चारही लढती पाचव्या दिवसापर्यंत रंगलेल्या आहेत. पाचव्या कसोटीतील दोन दिवसांवर पावसाचे सावट असेल.
गिल, राहुलवर फलंदाजीत भिस्त; सुंदर, जडेजावर लक्ष
भारतासाठी या मालिकेत चार शतकांसह सर्वाधिक ७२२ धावा करणाऱ्या कर्णधार गिलवर पुन्हा एकदा फलंदाजीची मदार असेल. त्याला अनुभवी के. एल. राहुलची साथ लाभेल. मात्र यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन या डावखुऱ्या फलंदाजांनी कामगिरी उंचावण्याची गरज आहे. विशेषत: यशस्वी गेल्या काही डावांपासून आक्रमकतेच्या नादात लवकर बाद होत आहे. रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलूंची जोडी सातत्याने फलंदाजीत योगदान देत आहे. डावखुरा ऋषभ पंत या कसोटीला दुखापतीमुळे मुकणार आहे. त्यामुळे यष्टिरक्षणाची जबाबदारी ध्रुव जुरेलकडे सोपवण्यात येईल, असे समजते. त्याशिवाय एन. जगदीशनचा पर्यायही भारताकडे आहे.
बुमराच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम; अर्शदीपचे पदार्पण?
तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा खेळणार की नाही, याविषयीचा निर्णय सामन्यापूर्वीच सकाळी घेऊ असे कर्णधार गिलने सांगितले. त्यामुळे बुमराविषयी संभ्रम कायम आहे. आकाश दीप व अर्शदीप सिग हे वेगवान गोलंदाज मात्र दुखापतीतून सावरले आहेत. अर्शदीपला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. फिरकी विभागात सुंदर व जडेजाचे पर्याय भारताकडे आहेतच. मात्र शार्दूल ठाकूर किंवा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार, हे पाहणे रंजक ठरेल. प्रसिध कृष्णाही चमूत आहे. मात्र पहिल्या दोन कसोटीत त्याने निराशाजनक कामगिरी केली.
स्टोक्ससह चार खेळाडू संघाबाहेर, पोप कर्णधार
इंग्लंडने नेहमीप्रमाणे कसोटीच्या एक दिवस अगोदरच अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. बेन स्टोक्स उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे या कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज ओली पोपकडे इंग्लंडचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्याशिवाय जोफ्रा आर्चर, ब्रेडन कार्स व डावखुरा फिरकीपटू लियाम डॉसन यांनाही इंग्लंडने वगळले आहे. ओव्हलच्या खेळपट्टीचा आढावा घेता इंग्लंडने जेमी ओव्हर्टन, जोश टंग व गस ॲटकिन्सन या वेगवान त्रिकुटाला संघात स्थान दिले आहे. तसेच जेकब बेथलच्या रूपात फिरकी अष्टपैलूचा पर्यायही त्यांच्याकडे आहे. ख्रिस वोक्स त्यांच्या गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करेल.
ओव्हलवर भारताची निराशाजनक कामगिरी
भारताने ओव्हल येेथे १५ पैकी फक्त २ कसोटी सामने जिंकले आहेत. १९७१ व २०२१मध्ये भारताने अशी कामगिरी केली होती. २०२३मध्ये मात्र येथेच भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाला होता. त्यावेळी भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भारतीय संघ यावेळी कशी कामगिरी करणार, हे पाहावे लागेल.