क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचेच वर्चस्व अपेक्षित : गावस्कर

वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणारी पाच सामन्यांची कसोटी मालिका भारतीय संघ ३-१ अशा फरकाने जिंकेल असे भाकीत गावस्कर यांनी केले.

Swapnil S

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने २०१४-१५ पासून प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर करंडकावर ताबा राखला आहे. या करंडकाला ज्यांचे नाव देण्यात आले आहे, त्या सुनील गावस्करांना यंदाही यात बदल होईल असे वाटत नाही. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणारी पाच सामन्यांची कसोटी मालिका भारतीय संघ ३-१ अशा फरकाने जिंकेल असे भाकीत गावस्कर यांनी केले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने २०१८-१९ आणि २०२०-२१ असे दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजयांची हॅट‌्ट्रिक साजरी करण्याची भारताकडे यंदा संधी आहे.

“दोन्ही संघांत उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यामुळे ही मालिका चुरशीची होणार यात शंका नाही. कसोटी हेच क्रिकेटचे सर्वोत्तम प्रारूप का आहे, हे या मालिकेतून पुन्हा सिद्ध होईल याची मला खात्री वाटते,” असे भारताचे माजी कर्णधार असलेल्या गावस्कर यांनी नमूद केले.

“डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीमुळे ऑस्ट्रेलियन संघासमोर सलामीचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच मधल्या फळीतही त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा भारतीय संघाला फायदा होऊ शकेल. भारतीय संघ ही मालिका ३-१ अशा फरकाने जिंकेल असा माझा अंदाज आहे,” असेही गावस्कर म्हणाले. “कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंना प्रथमश्रेणी सामना खेळण्याची संधी मिळणार नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकाची संघांना आता सवय झाली आहे. त्यामुळे भारतीय संघ तेथील परिस्थितीशी जुळवून घेईल,” असेही मत गावस्कर यांनी मांडले.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश