किशन जायबंदी, वैभवला संधी? भारत-न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा सामना; गोलंदाजांची पुन्हा कसोटी X
क्रीडा

किशन जायबंदी, वैभवला संधी? भारत-न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा सामना; गोलंदाजांची पुन्हा कसोटी

IND vs NZ, 2nd T20I: न्यूझीलंड वारीला विजयासह प्रारंभ केल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ शनिवारी सलग दुसऱ्या विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरेल. हॅगली ओव्हल येथे भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरी टी-२० लढत खेळवण्यात येणार आहे.

Swapnil S

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंड वारीला विजयासह प्रारंभ केल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ शनिवारी सलग दुसऱ्या विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरेल. हॅगली ओव्हल येथे भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरी टी-२० लढत खेळवण्यात येणार आहे. इशान किशन स्नायूंच्या दुखापतीमुळे या सामन्यास मुकणार असल्याने १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

एकीकडे भारतात नवरात्रोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर आता दिवाळीचे वेध लागले असतानाच तिकडे भारतीय संघाच्या न्यूझीलंड वारीला गुरुवारपासून प्रारंभ झाला. न्यूझीलंडमधील मागील दोन टी-२० मालिकांमध्ये भारत अपराजित आहे. त्यामुळे अय्यरच्या नेतृत्वात खेळताना यंदादेखील भारत त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, हे पाहणे रंजक ठरेल. या दौऱ्यात न्यूझीलंडमधील खेळपट्टी, वातावरणाशी जुळवून घेण्याचे मोठे आव्हान भारतापुढे असेल. भारताला या मालिकेपूर्वी फारशी विश्रांती मिळालेली नाही. १७ ऑक्टोबर रोजी भारतात विंडीजविरुद्ध पाचवा टी-२० सामना खेळल्यानंतर २ दिवसांपूर्वीच भारतीय संघ न्यूझीलंडला दाखल झाला. या दौऱ्यात ५ टी-२०, ५ एकदिवसीय व २ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. पहिल्या लढतीत भारताने संजू सॅमसनच्या अर्धशतकासह नमन धीरने साकारलेल्या खेळीमुळे ४ गडी राखून सरशी साधली.

आता त्याच मैदानात होणाऱ्या दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडच्या बेधडक फलंदाजांना रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजीला कामगिरी उंचवावी लागणार आहे. मधल्या फळीतील अष्टपैलू खेळाडू अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नसल्यामुळे आणि हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त असल्यामुळे भारतासाठी पाचवा आणि सहावा गोलंदाजीचा पर्याय चिंतेचा विषय ठरला आहे. पहिल्या सामन्यात नितिश रेड्डीला एकही बळी मिळाला नाही आणि त्याने चार षटकांत ४० धावा दिल्या, तर नमनला गोलंदाजीची संधीच मिळाली नाही. त्याशिवाय चार वर्षांनंतर भारताकडून खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारला आपला प्रभाव पाडता आला नाही आणि त्याने चार षटकांत ४९ धावा दिल्या. पॉवरप्लेमध्ये फिन ॲलन आणि टिम सेईफर्ट यांनी भुवनेश्वर आणि अर्शदीप सिंग यांच्या गोलंदाजीवर चौकार-षटकारांची आतषबाजी केली. हवामानही फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने गोलंदाजांना फारशी संधी मिळणार नाही.

त्याशिवाय आयर्लंड आणि इंग्लंडमधील दौऱ्यांत पराभवांनी सुरुवात झाल्यानंतर अय्यरसमोर परदेशातील नेतृत्व सिद्ध करण्याचे आव्हान आहे. अलीकडेच भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले, तर वेस्ट इंडिजविरुद्धची मायदेशातील मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. या पार्श्वभूमीवर भारतीय संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. २०२२च्या दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करणारा हार्दिक यावेळी संघाचा भाग नाही. तसेच वेगवान गोलंदाजीचा शिलेदार जसप्रीत बुमरा या दौऱ्यात केवळ कसोटी सामने खेळणार आहे.

दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांना यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळेच या दौऱ्याचे महत्त्व वाढले आहे. आता विराट कोहली, हार्दिक पंड्या यांच्यानंतर न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका जिंकणारा सलग तिसरा भारतीय कर्णधार ठरण्याची संधी अय्यरकडे आहे.

सलामीच्या स्थानासाठी चढाओढ

* किशन दुखापतीमुळे पहिल्या लढतीत तिसऱ्या ऐवजी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर आलेला तिलक वर्मा ६ धावांवर बाद झाला. आता किशन जायबंदी असल्याने वैभवचे पुनरागमन पक्के मानले जात आहे. अशा स्थितीत अभिषेक शर्माच्या साथीने सॅमसन आणि वैभव यांच्यापैकी कोण सलामीला येणार, हे पाहणे रंजक ठरेल.

* कारण सॅमसन व अभिषेक यांची जोडी सलामीला सातत्याने छाप पाडत आहे. सॅमसनने गेल्याच लढतीत अर्धशतक साकारले. दुसरीकडे वैभव हा पॉवरप्लेमध्ये आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. आशियाई स्पर्धेत वैभव सलामीला, तर सॅमसन तिसऱ्या स्थानी येत होता. चौथ्या व पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे श्रेयस व तिलक फलंदाजीस येणे अपेक्षित आहे. नमनमुळे भारताला अखेरच्या षटकांत हाणामारी करणारा उत्तम फलंदाज गवसला आहे.

* गोलंदाजीत भारताला भुवनेश्वर, अर्शदीप यांच्याकडून अपेक्षा आहे. अक्षर गेल्या लढतीत महागडा ठरला होता. भारताकडे कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्यापैकी एका फिरकीपटूला खेळवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. तसेच नितीश रेड्डीसह शिवम दुबेही खेळू शकतो.

हेन्री, मिल्नेकडून सुधारणा अपेक्षित

न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज मॅट हेन्री आणि अडम मिल्ने यांनी पहिल्या स्पेलमध्ये चांगला स्विंग मिळवला, पण तितक्याच अतिरिक्त धावाही त्यांनी लुटल्या. पॉवरप्लेमध्येच भारताने पकड मिळवली होती. लॉकी फर्ग्युसनही संघर्ष करताना दिसला. त्यामुळे कर्णधार मिचेल सँटनर व मायकेल ब्रेसवेल या फिरकी जोडीवर किवी संघाची मदार असेल. भारताच्या डाव्या हाताच्या फलंदाजांची ऑफ-स्पिनविरुद्धची अडचण ब्रेसवेलच्या विरोधात स्पष्ट दिसून आली. भारतीय फलंदाजीच्या खोलीचा विचार करता, न्यूझीलंडला गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल. तसेच न्यूझीलंडला क्षेत्ररक्षणाचा दर्जाही उंचवावा लागेल.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, तिलक वर्मा, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयांक यादव, नमन धीर, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, जोश क्लार्कसन, डेवॉन कॉन्वे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, बेव्हन जेकब्स, कायले जेमिसन, ॲडम मिल्ने, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टिम सेईफर्ट, नॅथन स्मिथ, ब्लेर टिकनर.

वेळ : दुपारी १२.३० वाजता; थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३ वाहिनी आणि सोनी लिव्ह ॲप

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई धमक्यांनी हादरली! महापौर कार्यालय, अमिताभ यांचे निवासस्थान, शैक्षणिक संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

ऑडिओ क्लिपप्रकरणी फॉरेन्सिक तपास; महायुतीत बेबनाव वाढत चालला

Mumbai : सीएसएमटी भुयारी मार्ग प्रदूषणाच्या विळख्यात; BMC मुख्यालयाजवळच अनधिकृत विक्रेत्यांचे बस्तान

FSSAI च्या नियमांना महाराष्ट्राचे उच्च न्यायालयात आव्हान; राज्याच्या अधिकारांवर केंद्राने अतिक्रमण केल्याचा आरोप

भारत-चीन सैन्यात चकमकी; अरुणाचलबाबत इंडो-तिबेट सीमा दलाच्या महासंचालकांचा गौप्यस्फोट