नवी दिल्ली : भारत २०२६ च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदाचा प्रबळ दावेदार आहे. या महाकुंभात देशाचा प्रभावी सहभाग निश्चित करण्यासाठी ५ ते १५ या वयोगटातील गुणवंत खेळाडूंचा शोध घेण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना त्यांनी क्रीडा क्षेत्रातील भारताच्या वाढत्या प्रभावाचा पुनरुच्चार केला.
ऑलिम्पिकमध्ये सुमारे ४० खेळ आणि ३५० स्पर्धा असतात, परंतु पात्रता निकष पूर्ण न करू शकल्याने आपण किमान दोन-तृतीयंश स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकत नाही, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. २०३६ मध्ये आपण किमान तीन चतुर्थांश ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला हवे. यासाठी लहान वयातच मुलांमधील क्रीडा क्षमता ओळखण्यावर भर दिला जाणार आहे.
सरकारने २०१४ मध्ये सुरू केलेल्या 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम' (टॉप्स) या प्रमुख योजनेला खेळाडूंना पाठबळ देण्यात मोठे यश मिळाले असल्याचे मोदी म्हणाले. खेलो इंडिया, युनिव्हर्सिटी गेम्स, बीच गेम्स किंवा विंटर गेम्स असो, तसेच क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा औषध आणि पोषण क्षेत्रात भारत वेगाने पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताची कामगिरी सुधारत असून आपण २०२६ च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहोत.
एआयचा वापर करून फिटनेस चाचण्या घेतल्या जाणार
सरकार देशव्यापी टॅलेंट हंट सुरू करणार असून यामध्ये ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश असणार आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून क्रीडा क्षेत्रात चांगली क्षमता असलेल्या मुलांचा शोध घेतला जाणार आहे. या शोधमोहिमेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून फिटनेस चाचण्या घेतल्या जातील. विशेषतः अॅक्वाटिक्स आणि सायकलिंग यांसारख्या १०० हून अधिक पदके असणाऱ्या खेळांमध्ये भारताची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न असेल.
२०३० मध्ये भारतात राष्ट्रकुल स्पर्धा रंगणार
भारताच्या दीर्घकालीन क्रीडा धोरणात २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धादेखील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे या स्पर्धांचे आयोजन होणार आहे. २०१० मध्ये दिल्लीने राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केल्यानंतर भारतात या स्पर्धांचे आयोजन करणारे अहमदाबाद हे दुसरे भारतीय शहर ठरणार आहे. या स्पर्धांसाठी उभारण्यात येणाऱ्या आणि विकसित करण्यात येणाऱ्या क्रीडा सुविधांचा फायदा भविष्यातील खेळाडूंना होण्याची शक्यता आहे.