बुमरा, जडेजाचे पुनरागमन? श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची पुढील आठवड्यात घोषणा संग्रहित छायाचित्र
क्रीडा

बुमरा, जडेजाचे पुनरागमन? श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची पुढील आठवड्यात घोषणा

श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा पुढील आठवड्यात होणार आहे.

Swapnil S

बंगळुरू : श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा पुढील आठवड्यात होणार आहे. या निवडीदरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बुमराच्या तंदुरुस्तीवर विशेष चर्चा केली जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान बुमराहच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने आणि सूज आल्याने त्याला या निर्णायक सामन्यातून बाहेर राहावे लागले होते. या दौऱ्यातील पहिली कसोटी १५ ऑगस्टपासून गॉल येथे, तर दुसरी कसोटी २३ ऑगस्टपासून कोलंबोमध्ये खेळवली जाईल.

बुमराच्या रिकव्हरी प्रक्रियेवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असून कसोटी मालिकेला अजून तीन आठवडे बाकी आहेत. त्यामुळे त्याला दुखापतीतून सावरून श्रीलंकेतील संघात सामील होण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध आहे. भारतीय संघ ४ ऑगस्टपर्यंत श्रीलंकेत पोहोचणार असून स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कोलंबोतील 'नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब' येथे चार दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. मात्र, बुमरा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संघासोबत प्रवास करू शकेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामना खेळल्यानंतर जडेजा संघात परतत असून, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याची अष्टपैलू कामगिरी महत्त्वपूर्ण ठरेल. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेत जडेजाला स्थान देण्यात आले नव्हते, ज्या मालिकेत भारताला १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता.

वॉशिंग्टन सुंदरबाबत साशंकता

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर सध्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी झाला आहे. त्याच्या दुखापतीचे स्वरूप पाहता, दुखापतीतून पूर्णपणे बरा होण्यासाठी त्याला किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे निवड समिती सुंदरचा समावेश करण्याबाबत संदिग्ध आहे. त्याचबरोबर नितीशकुमार रेड्डी याच्या समावेशाबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP आंदोलकाला नोटीस; सरन्यायाधीशांनी दंडाधिकाऱ्यांना फटकारले

विकास प्रकल्पांना गती; 'महाराष्ट्र लँड बँक', 'महाभूमी स्टॅक' प्रणालीचे महसूलमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक

Mumbai : गणेशोत्सवात विद्यापीठाचे दीड हजार ‘सारथी’; NSS चे विद्यार्थी पोलिसांच्या मदतीला

मराठा-मराठा संघर्ष झाल्यास त्याला सर्वस्वी शिंदेच जबाबदार, मनोज जरांगे यांचा इशारा