भारतीय युवा संघाकडून ऑस्ट्रेलियाला ३-० असा व्हाइटवॉश; कर्णधार लक्ष्य रायचंदानीच्या शतकामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६ गडी राखून विजयी X|BCCI
क्रीडा

भारतीय युवा संघाकडून ऑस्ट्रेलियाला ३-० असा व्हाइटवॉश; कर्णधार लक्ष्य रायचंदानीच्या शतकामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६ गडी राखून विजयी

कर्णधार लक्ष्य रायचंदानीच्या दमदार नाबाद ११० धावांच्या जोरावर भारताच्या १९ वर्षांखालील संघाने तिसऱ्या आणि अंतिम युवा एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला.

Swapnil S

राजकोट : कर्णधार लक्ष्य रायचंदानीच्या दमदार नाबाद ११० धावांच्या जोरावर भारताच्या १९ वर्षांखालील संघाने तिसऱ्या आणि अंतिम युवा एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला.

या विजयासह यजमान भारतीय संघाने या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन करून ऑस्ट्रेलियाला पूर्णपणे निष्प्रभ केले. भारताने याआधीचा पहिला सामना ७ धावांनी तर दुसरा सामना ६ गडी राखून जिंकला होता. आता दोन्ही संघांमध्ये २७ ते ३० सप्टेंबर आणि ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान दोन चार दिवशीय युवा कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय गोलंदाजांनी ४९.३ षटकांत २५४ धावांत रोखले. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर झेड हॉलिकने १२ चौकारांसह ८७ धावांची, तर नील पटेलने ५१ धावांची खेळी केली, मात्र इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून गोलंदाजीत मोहित उलवा (३/४३) आणि मनाल चौहान (३/४२) यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर काव्य पटेल (१/५४) आणि आर्यन सवसाणी (१/३९) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

विजयासाठी २५५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने ४२ व्या षटकातच ४ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. १७ वर्षीय कर्णधार लक्ष्य रायचंदानीने १०६ चेंडूंत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ११० धावांची कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याला सलामीवीर आर्यवीर सेहवागने ३१ चेंडूंत ३४ धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कुशाग्र ओझाने ४५ धावांचे मोलाचे योगदान दिले. युवा व्ही. के. विनीत १० धावांवर बाद झाला.

मुलाणीमुळे भारत-अ संघाला आघाडी

मुंबईचा डावखुरा फिरकीपटू शम्स मुलाणीने (६७ धावांत ४ बळी) केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारत-अ संघाने पहिल्या चार दिवसीय कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध १६३ धावांची आघाडी घेतली. भारताने कुमार कुशाग्रच्या (११३) शतकाच्या बळावर ३३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया-अ संघाचा पहिला डाव बुधवारी दुसऱ्या दिवशी ५५.३ षटकांत १७१ धावांत आटोपला. जेसन संघाने ४६ धावांची झुंज दिली. फलंदाजीत ६९ धावा करणाऱ्या तनुष कोटियनने गोलंदाजीतही छाप पाडून २ बळी मिळवले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण नको! समन्वय समितीचे मंडळांना आवाहन

MPSC आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली; रोहित पवार २७ सप्टेंबरच्या आंदोलनावर ठाम

Bhiwandi : टीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, दोन हजार सीसीटीव्हींची नजर

सरकारी शाळा बंदच्या धोरणाविरोधात धरणे; आझाद मैदानावर ५ ऑक्टोबरपासून आंदोलन; सिंधुदुर्गातून ३००० जण सहभागी होणार