भारत-अफगाणिस्तान एकमेव कसोटी लढत : मानवची पदार्पणात चमक; भारताचा डाव ५६४ धावांवर घोषित, अफगाणिस्तानची ५ बाद ११३ स्थिती (Photo-X)
क्रीडा

भारत-अफगाणिस्तान एकमेव कसोटी लढत : मानवची पदार्पणात चमक; भारताचा डाव ५६४ धावांवर घोषित, अफगाणिस्तानची ५ बाद ११३ स्थिती

मूळचा राजस्थानचा, तर आयपीएलमध्ये गुजरातकडून खेळणारा २३ वर्षीय डावखुरा फिरकीपटू मानव सुतारने रविवारी आंतरराष्ट्रीय पदार्पणात अष्टपैलू चमक दाखवली.

Swapnil S

मुल्लानपूर : मूळचा राजस्थानचा, तर आयपीएलमध्ये गुजरातकडून खेळणारा २३ वर्षीय डावखुरा फिरकीपटू मानव सुतारने रविवारी आंतरराष्ट्रीय पदार्पणात अष्टपैलू चमक दाखवली. फलंदाजीत २८ धावांचे योगदान दिल्यानंतर मानवने गोलंदाजीत तीन फलंदाजांना जाळ्यात अडकवले. त्यामुळे एकमेव कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने अफगाणिस्तानची ३९.५ षटकांत ५ बाद ११३ अशी अवस्था केली आहे.

मुल्लानपूरच्या महाराज यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर रहमत शाह ४३ धावांवर नाबाद आहे. अफगाणिस्तानचा संघ अद्याप ४५१ धावांनी पिछाडीवर आहे. भारताने पहिला डाव १२७ षटकांत ८ बाद ५६४ धावांवर घोषित केला होता. कर्णधार शुभमन गिल (१७७ चेंडूंत १२६ धावा), के. एल. राहुल (१६५ चेंडूंत १००) यांच्या शतकांसह साई सुदर्शन (८१), वॉशिंग्टन सुंदर (नाबाद ५२) व ऋषभ पंत (८१) यांच्या अर्धशतकांनीदेखील भारताच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. मात्र रविवारचा दिवस गाजवला तो मानवच्या दुहेरी कामगिरीनेच.

आयपीएलचा १९वा हंगाम नुकताच संपन्न झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदा सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद काबिज केले. त्यापूर्वी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता. तर भारताचा अखेरचा कसोटी सामना नोव्हेंबर २०२५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला होता. आता अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याद्वारे भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा प्रारंभ केला. एकमेव कसोटीनंतर उभय संघांत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून १३ जून रोजी धरमशाला येथे पहिला, तर १७ व २० जून रोजी अनुक्रमे लखनऊ व चेन्नई येथे दुसरा व तिसरा एकदिवसीय सामना होईल.

दरम्यान, शनिवारी पहिल्या दिवसअखेर भारताने ३ बाद ३६८ धावांपर्यंत मजल मारली होती. तेथून पुढे गिल व पंत यांनी एकत्रित खेळताना भारताची धावगती वाढवली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६९ धावांची भागीदारी रचली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सलीमने गिलचा १२६ धावांवर अडथळा दूर करून ही जोडी फोडली. ध्रुव जुरेल (१९) मोठी खेळी साकारू शकला नाही. पंतने मात्र ६ चौकार व ३ षटकारांसह शतकाच्या दिशेने कूच केली होती. परंतु अझमतुल्ला ओमरझाईने त्याला ८१ धावांवर बाद केले.

मग सुंदर आणि मानव या फिरकीपटूंची जोडी जमली. दोघांनी सातव्या विकेटसाठी ५४ धावांची भर घालून अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना आणखी हैराण केले. मानवने २ चौकार-षटकारांसह २८ धावा केल्यावर सलीमने त्याला माघारी पाठवले, तर मोहम्मद सिराजने १२ चेंडूंतच २२ धावा फटकावून चाहत्यांचे मनोरंजन केले. अखेर सलीमनेच त्याला बाद करून कसोटीत प्रथमच डावात पाच बळी मिळवण्याचा पराक्रम केला.

सुंदरने मात्र दुसरी बाजू सांभाळून धरत कसोटीतील सहावे अर्धशतक साकारले. त्याने ५ चौकार व १ षटकारासह ६८ चेंडूंत नाबाद ५२ धावा केल्या. कुलदीप यादवने नाबाद ९ धावा करताना सुंदरसह नवव्या विकेटसाठी २४ धावांची भर घातली. सुंदरने अर्धशतकाची वेस ओलांडल्यावर १२७ षटकांत ८ बाद ५६४ धावांवर भारताने पहिला डाव घोषित केला. सलीमने सर्वाधिक ६ बळी मिळवले.

जवळपास चार सत्रे क्षेत्ररक्षण केल्यावर फलंदाजीस उतरलेल्या अफगाणिस्तानच्या फलंदाजांचे खांदे आधीच खालावले होते. अब्दुल मलिक व सेदिउल्ला अटल यांनी सुरुवातीची ५ षटके खेळून काढली. मात्र सहाव्या षटकात गिलने मानवकडे चेंडू सोपवला व त्याने चौथ्याच चेंडूवर मलिकला (१६) सिराजकडे झेल देण्यास भाग पाडले. दुसऱ्या बाजूने प्रसिध कृष्णाने अटलचा (१७) त्रिफळा उडवला.

तिसऱ्या सत्रात रहमनुल्ला गुरबाझ व रहमत यांनी काहीसा प्रतिकार केला. मात्र मानवच्याच गोलंदाजीवर गुरबाझचा सुदर्शनने उत्तम झेल टिपला, तर कर्णधार हश्मतुल्ला शाहिदीला कृष्णाने २० धावांवर पायचीत पकडले. दिवसातील अखेरच्या षटकात मानववर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात अफसर झझईदेखील (३) फसला व मानवने तिसरा बळी मिळवून अफगाणिस्तानला ५ बाद ११३ असे संकटात ढकलले. मानवने एकूण १५.५ षटके गोलंदाजी करताना ७ षटके निर्धाव टाकली असून २१ धावांतच ३ बळी मिळवले आहेत. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांच्या अनुपस्थितीत मानवचा उत्तम पर्याय भारताकडे उपलब्ध असेल. आता तिसऱ्या दिवशी अफगाणिस्तानला लवकर गुंडाळण्याचे भारताचे ध्येय असेल.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : १२७ षटकांत ८ बाद ५६४ (शुभमन गिल १२६, के. एल. राहुल १००, ऋषभ पंत ८१, साई सुदर्शन ८१; मोहम्मद सलीम ६/१४०)

अफगाणिस्तान (पहिला डाव) : ३९.५ षटकांत ५ बाद ११३ (रहमत शाह नाबाद ४३, हश्मतुल्ला शाहिदी २०; मानव सुतार ३/२१)

मानवचा आत्मविश्वास कौतुकास्पद : गावस्कर

मानवच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तो भविष्यात भारताच्या कसोटी संघात सातत्याने स्थान मिळवण्यासाठी एक प्रबळ दावेदार बनला आहे, असा विश्वास माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला. “मानवची केवळ गोलंदाजीच नाही, तर फलंदाजी करताना दाखवलेला आत्मविश्वास विशेष उठून दिसला. त्याने खेळपट्टीवर ज्या प्रकारे पावलांचा वापर केला आणि तो ज्या सहजतेने खेळत होता, ते कौतुकास्पद होते. गोलंदाजी करताना मानव अत्यंत अचूक होता आणि त्याने सातत्याने फलंदाजांवर दबाव राखला. खेळपट्टीकडून मदतीचा त्याने चांगला वापर करून घेतला, असे गावस्कर म्हणाले.

घरगुती गॅस दरवाढ; विरोधकांचा हल्लाबोल, मोदी सरकारला किंमत मोजावी लागेल - शरद पवार

राजीनामा होत नाही तोवर आंदोलन; धर्मेंद्र प्रधानांच्या गच्छन्तीबाबत ‘कॉकरोच’ ठाम, राजकीय पक्षांशी संबंध नाही - अभिजीत दीपके

ही अस्थिरता अराजकतेकडे नेऊ शकते?

आजचे राशिभविष्य, ८ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

बाजारातील मिठाई विसराल! घरच्या घरी बनवा दुधी भोपळ्याचा स्वादिष्ट कलाकंद