Twitter
क्रीडा

अफगाणी खिंड ओलांडण्याचे ध्येय! सुपर-८ फेरीतील भारताच्या अभियानाला आजपासून प्रारंभ; फिरकीपटूंचे द्वंद्व ठरणार निर्णायक

Swapnil S

ब्रिजटाऊन : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ गुरुवारी अफगाणी खिंड ओलांडण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर-८ फेरीतील पहिल्या गटात भारताची अफगाणिस्तानशी गाठ पडणार आहे. केन्सिंग्टन ओव्हल, बार्बोडास येथे होणाऱ्या या लढतीत फिरकीपटूंचे द्वंद्व निर्णायक ठरणार असून साहजिकच तारांकित फलंदाज विराट कोहली पुन्हा लय प्राप्त करणार का, हे पाहणेसुद्धा रंजक ठरेल.

२००७मध्ये टी-२० विश्वचषक उंचावणाऱ्या भारताने यंदा साखळी फेरीत अ-गटात अग्रस्थान काबिज केले. तीन सामन्यांत भारताने अनुक्रमे आयर्लंड, पाकिस्तान व अमेरिकेला नमवले. तर कॅनडाविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. मात्र साखळी फेरीतील भारताचे सर्व सामने अमेरिकेत झाले. आता सुपर-८ फेरीपासून भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये सर्व लढती खेळणार असून पुढील ५ दिवसांत त्यांचे ३ सामने आहेत. त्यामुळे प्रवासाचा थकवा झटकून तंदुरुस्ती टिकवण्याचे आव्हानही भारतीय खेळाडूंपुढे असेल.

दुसरीकडे फिरकीपटू रशिद खानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अफगाणिस्तानने क-गटात दुसरे स्थान मिळवून आगेकूच केली. युगांडा, पापुआ न्यू गिनी व न्यूझीलंड या संघांना धूळ चारल्यानंतर अखेरच्या साखळी लढतीत अफगाणिस्तानला विंडीजकडून पराभव पत्करावा लागला. मात्र ते अपयश बाजूला सारून हा संघ भारताला धक्का देण्यास आतुर असेल. तसेच अफगाणिस्तानने यंदाच्या विश्वचषकात चारही सामने विंडीजमध्येच विविध ठिकाणी खेळले आहेत. त्यामुळे ही बाब त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

विराटवर नजरा; कुलदीपला संधी?

विराटने यंदाच्या विश्वचषकात सलामीला येताना तीन सामन्यांत १, ४, ० अशा फक्त ५ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता सुपर-८ फेरीत विराटने फॉर्मात परतणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विराटला मधल्या फळीत खेळवायचे झाल्यास मुंबईकर यशस्वी जैस्वालला रोहितसह सलामीला पाठवता येऊ शकते. रोहित स्वत:ही आयर्लंडविरुद्धच्या अर्धशतकानंतर छाप पाडू शकलेला नाही. त्यामुळे रोहित-विराटच्या कामगिरीवर भारताची फलंदाजी अवलंबून असेल. मधळ्या फळीत सूर्यकुमार यादव व शिवम दुबे यांनी अमेरिकाविरुद्ध छाप पाडली. त्यामुळे त्यांना वगळण्यात येण्याची शक्यता कमी आहे. ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर सातत्यपूर्ण फलंदाजीसह यष्टिरक्षणात छाप पाडत आहे. गोलंदाजीचा विचार करता या लढतीसाठी चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भारताच्या दोन्ही सराव सत्रात कुलदीप घाम गाळताना दिसला. अशा स्थितीत मोहम्मद सिराज किंवा रवींद्र जडेजापैकी एकाला संघाबाहेर रहावे लागू शकते. जसप्रीत बुमरा पुन्हा एकदा गोलंदाजीचा आधारस्तंभ असेल. त्याला अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या यांची साथ लाभेल.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज

> केन्सिंग्टन येथे आतापर्यंत झालेल्या २९ टी-२० सामन्यांत १८ वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. तसेच येथे १६० ते १७० धावा विजयासाठी पुरेशा ठरू शकतात.

> वेगवान गोलंदाजांना येथे पॉवरप्लेमध्ये चेंडू स्विंग करण्याची संधी असून त्यानंतर फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात.

> गुरुवारी बार्बाडोस येथील वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता हा सामना सुरू होणार असून या लढतीत २५ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुपारी १२ ते १च्या सुमारास काही वेळेसाठी पाऊस येऊ शकतो.

रशिद, फारुकी अफगाणिस्तानचे अस्त्र

अफगाणिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज फझलहक फारुकीने या विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक १२ बळी मिळवले आहेत. त्यामुळे त्याच्यापासून पॉवरप्लेमध्ये स्वत:चा बचाव करणे भारताच्या दृष्टीने मोलाचे असेल. मधल्या षटकात रशिद व नूर अहमद यांची फिरकी जोडी प्रभावी ठरू शकते. फलंदाजीत रहमनुल्ला गुरबाझने ४ लढतींत सर्वाधिक १६७ धावा केल्या आहेत. त्याशिवाय इब्राहिम झादरानही लयीत आहे. भारतीय गोलंदाजांविरुद्ध अफगाणिस्तानच्या सलामीवीरांची खरी कसोटी लागेल. गुलाबदीन नईब, नवीन उल हक व अझमतुल्ला ओमरझाई यांनीही संघासाठी यंदा सातत्याने योगदान दिले आहे. त्यामुळे दोन्ही संघांत कडवी झुंज अपेक्षित आहे.

७-०

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ८ टी-२० सामन्यांपैकी भारताने ७ लढती जिंकल्या आहेत. तर एक लढत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भारताने अफगाणिस्तावर एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे, हे अधोरेखित होते. टी-२० विश्वचषकात उभय संघांत यापूर्वी ३ सामने झाले आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

> भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

> अफगाणिस्तान : रशिद खान (कर्णधार), इब्राहिम झादरान, गुलाबदीन नईब, रहमनुल्ला गुरबाझ, अझमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झादरान, करिम जनत, नूर अहमद, फझलहक फारुकी, फरीद अहमद, हझरतुल्ला झझई, मोहम्मद इशाक, नांगेयालिया खररोटे.

> वेळ : रात्री ८ वाजल्यापासून

> थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि हॉटस्टार ॲप

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?