U19 Asia Cup 2026: भारताची उपांत्य फेरीत गाठ अफगाणिस्तानशी; आर्यवीर सेहवागवर लक्ष 
क्रीडा

U19 Asia Cup 2026: भारताची उपांत्य फेरीत गाठ अफगाणिस्तानशी; आर्यवीर सेहवागवर लक्ष

१९ वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी भारताचा संघ गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात मैदानात उतरणार आहे. या महत्त्वपूर्ण लढतीत माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग याच्या फलंदाजीवर विशेष लक्ष असेल.

Swapnil S

अल अमेरात : १९ वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी भारताचा संघ गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात मैदानात उतरणार आहे. या महत्त्वपूर्ण लढतीत माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग याच्या फलंदाजीवर विशेष लक्ष असेल.

आर्यवीरने स्पर्धेत आतापर्यंत सातत्यपूर्ण आणि आक्रमक फलंदाजी केली आहे. संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध अ गटातील अखेरच्या सामन्यात त्याने १६८ चेंडूंत १६० धावांची खेळी करत भारताला ७० धावांनी विजय मिळवून दिला होता. या खेळीसह तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

आर्यवीरने तीन डावांत नाबाद ७०, २२ आणि १६० अशा खेळी करत एकूण २५२ धावा केल्या आहेत. त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारताने नेपाळ आणि यूएईवर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. मात्र, साखळी फेरीत पाकिस्तानकडून भारताला तीन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

आर्यवीरव्यतिरिक्त अर्जुन राजपूत यानेही फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने १०७ धावांची खेळी केली होती. मध्यमगती गोलंदाज इशान सूद आणि डावखुरा फिरकीपटू मनाल चौहान यांनीही प्रभावी कामगिरी केली आहे. इशानने आठ, तर मनालने पाच बळी मिळवले आहेत. गट ब मध्ये अव्वल स्थान मिळवणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्ध या दोन्ही गोलंदाजांकडून भारताला मोठ्या अपेक्षा असतील.

अफगाणिस्तानकडून फैसल रहीमी आणि सुब्हान जाखेल यांनी फलंदाजीची धुरा सांभाळली आहे. तर नूर अली हा संघाचा प्रमुख गोलंदाज ठरला असून त्याने आतापर्यंत १३ बळी मिळवले आहेत. आमिर हमजानेही पाच बळी घेतले आहेत.

भारताने नेपाळविरुद्धच्या सामन्यात प्रभावी गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला १२८ धावांत गुंडाळले होते. त्यानंतर कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांनी फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. यूएईविरुद्ध मात्र भारतीय फलंदाजांनी चमक दाखवली. आर्यवीरच्या १६० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने सात बाद ३०९ धावा केल्या होत्या.

मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची फलंदाजी कमकुवत ठरली. पाकिस्तानच्या प्रभावी गोलंदाजीसमोर भारतीय संघ २०८ धावांत गारद झाला. अर्जुन राजपूतने एकाकी झुंज दिली, तर अन्य फलंदाजांपैकी केवळ चार जणांना दुहेरी धावसंख्या गाठता आली.

अफगाणिस्तानची गोलंदाजी प्रभावी असल्याने भारताच्या आघाडीच्या फलंदाजांची कसोटी लागणार आहे. भारताने आतापर्यंत १९ वर्षांखालील आशिया चषकाचे विक्रमी आठ वेळा विजेतेपद मिळवले आहे. यामध्ये एका संयुक्त विजेतेपदाचाही समावेश आहे. यंदाही अंतिम फेरी गाठून आणखी एका विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मदर डेअरी, अमूल दूध महागले; प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू

Mumbai : दिवाळीत हवेचे 'दिवाळे'! नेव्ही नगरमध्ये AQI ४९७, तर शिवडीत ४५२ वर पोहोचला

राज्यात लवकरच समान नागरी कायदा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

नवी मुंबई सर्वाधिक स्वच्छ शहर; देशातील सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पटकावला प्रथम क्रमांक

कोकण किनाऱ्यांचा जागतिक गौरव; गुहागर, लाडघर, श्रीवर्धन समुद्रतटांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा 'ब्ल्यू फ्लॅग' पुरस्कार