कोलकाता : आतापर्यंतचा भारतातील सर्वात मोठा फुटबॉल सामना मानला जात असलेला मुकाबला अखेर आला असून, पाच वेळा विश्वविजेता राहिलेला ब्राझीलचा संघ कोलकात्यात दाखल झाला आहे. शनिवारी ऐतिहासिक साॅल्ट लेक स्टेडियमवर होणाऱ्या आमंत्रणपर मैत्रीपूर्ण सामन्यात ब्राझीलचा सामना अशा भारतीय राष्ट्रीय संघाशी होणार आहे, जो आशियातील प्रस्थापित संघांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी अजूनही धडपड करत आहे.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेला ब्राझील संघ भारताविराधात आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असून, यात रिअल माद्रिदचा फॉरवर्ड विनिसिअस ज्युनियर, आर्सनलचा डिफेंडर गॅब्रिएल मगहालेस, मिडफिल्ड स्टार ब्रुनो गुइमारेस आणि अनुभवी मार्किन्होस हे खेळाडू सहभागी झाले आहेत. फुटबॉल जगतात प्रचंड लोकप्रियता असलेल्या या पिवळ्या जर्सीच्या संघाचे कोलकातात आगमन झाल्यानंतर शहरात प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
भारतासाठी, ज्यांचे मानांकन १३८वे आहे, हा सामना केवळ मनोरंजन पुरता मर्यादित नसून भारतीय संघाने आतापर्यंत किती प्रगती केली आहे, याची चाचणी घेणारी मोठी संधी आहे. भारताने कधीही विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही आणि सौदी अरेबियात २०२७ मध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठीही त्यांना पात्रता मिळवण्यात अपयश आले आहे. यादरम्यान, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष कल्याण चौबे यांनी याला एक 'ऐतिहासिक' संधी म्हटले आहे.
मात्र, या सामन्याच्या आयोजनावरून टीकाही होत असून भारताने फिफा आशियाई कप स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे माजी कर्णधार बायचुंग भुतिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. या सामन्यासाठी ५० ते ७० कोटी रुपयांच्या दरम्यान खर्च आला असून, ब्राझीलच्या ९० सदस्यांच्या शिष्टमंडळासाठी चार्टर विमानावर सुमारे ६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे वृत्त आहे. पश्चिम बंगालच्या नवीन भाजप सरकारच्या पूर्ण पाठिंब्याने हा सामना होत आहे. गेल्या वर्षी लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर या वेळी सुरक्षा आणि व्यवस्थापनावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
प्रशिक्षक कार्लो अन्सेलोटी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ब्राझील संघात अनुभवी खेळाडूंसोबतच तरुण खेळाडूंचाही समावेश आहे. दुसरीकडे, खालिद जमिल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा भारतीय संघ बेंगळुरूमध्ये पनामाविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधून मैदानात उतरत आहे. रियान विल्यम्स आणि आशिक कुरुनियन यांच्या वेगावर भारताची भिस्त असेल. ब्राझीलविरुद्ध खेळताना तुम्हाला मैदानावरील एकाग्रता एक हजार टक्के ठेवावी लागेल, असे प्रतिपादन डिफेंडर जय गुप्ता यांनी केले आहे. १९७७ मध्ये पेले यांच्या न्यूझॉर्क कॉसमॉस संघाच्या आगमनापासून फुटबॉलचे विविध सोहळे पाहणाऱ्या कोलकातासाठी हा सामना आणखी एक सुवर्ण क्षण ठरणार आहे.
वेळ : सायं. ७.३० वाजता ; थेट प्रक्षेपण : सोनी टेन वाहिनी