रोहित, विराट, बुमराच्या पुनरागमनाकडे नजरा; भारत-इंग्लंड यांच्यात पहिला सामना आज BCCI
क्रीडा

रोहित, विराट, बुमराच्या पुनरागमनाकडे नजरा; भारत-इंग्लंड यांच्यात पहिला सामना आज

भारतीय टी-२० संघाच्या खराब कामगिरीनंतर आता एकदिवसीय मालिकेत संघाची प्रतिष्ठा वाचवण्याचे मोठे आव्हान अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर असणार आहे. मंगळवारपासून बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे.

Swapnil S

बर्मिंगहॅम : भारतीय टी-२० संघाच्या खराब कामगिरीनंतर आता एकदिवसीय मालिकेत संघाची प्रतिष्ठा वाचवण्याचे मोठे आव्हान अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर असणार आहे. मंगळवारपासून बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरादेखील या मालिकेद्वारे एकदिवसीय प्रकारात पुनरागमन करेल.

नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सातपैकी तब्बल सहा सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. यामध्ये आयर्लंडविरुद्ध ०-२ आणि इंग्लंडविरुद्ध ०-४ अशा मानहानीकारक पराभवांचा समावेश आहे. या सुमार कामगिरीमुळे बीसीसीआयने संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर रोहित, कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे.

३९ वर्षीय रोहित शर्मा आणि ३७ वर्षांचा विराट कोहली आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने आपली तयारी सिद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत. इंग्लंडच्या आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांच्या वेगाचा सामना करणे सोपे नसले, तरी या अनुभवी जोडीला इंग्लिश गोलंदाजांचा सामना करण्याचा मोठा अनुभव आहे. फलंदाजीत कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी के. एल. राहुल यांच्या उपस्थितीमुळे भारताची आघाडीची फळी मजबूत दिसते आहे.

गोलंदाजीत बुमराच्या सोबतीला अर्शदीप सिंग हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज असेल, तर हार्दिक पंड्या आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या अनुपस्थितीमुळे शिवम दुबेला चौथी वेगवान गोलंदाजीची भूमिका पार पाडावी लागेल. फिरकी विभागात वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल टी-२० मध्ये अपयशी ठरले असले, तरी कुलदीप यादवच्या तुलनेत फलंदाजीच्या क्षमतेमुळे त्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, इंग्लंडच्या संघाने जानेवारी महिन्यापासून एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. मात्र, टी-२० मालिकेतील मोठ्या विजयामुळे यजमान संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. इंग्लंडच्या फलंदाजीत जो रूटच्या पुनरागमनामुळे खोली वाढली असून हॅरी ब्रूक जोस बटलर दमदार लयीत आहेत.

वेळ : दुपारी ३.३० वाजता ; थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३

वाढत्या अन्नधान्याच्या किमतीचा सामान्यांना फटका

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ९२ लाख 'बहिणीं'ना वगळल्याने नवा वाद

जलतरणपटू गीताने केली 'इंग्लिश खाडी' पार

दोन्ही राष्ट्रवादीत अस्वस्थता; सुनेत्रा पवार गटाला कुरबुरींचे, तर शरद पवार गटाला फुटीचे ग्रहण?

भारत-इंग्लंड महिला कसोटी : भारतीय महिला संघाचे इंग्लंडमधील वर्चस्व अबाधित