IND vs NZ 1st Test : पंतमुळे भारतीय संघ निश्चिंत; पहिल्या डावात ७२० धावांचा डोंगर; पाचव्या दिवशी आणखी ८ बळींची गरज BCCI/X
क्रीडा

IND vs NZ 1st Test : पंतमुळे भारतीय संघ निश्चिंत; पहिल्या डावात ७२० धावांचा डोंगर; पाचव्या दिवशी आणखी ८ बळींची गरज

डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (१५३ चेंडूंत १२८ धावा) त्याचे कसोटी संघातील महत्त्व पुन्हा अधोरेखित करताना शानदार शतक झळकावले. त्यामुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी १६६ षटकांत ९ बाद ७२० धावांवर पहिला डाव घोषित केला.

Swapnil S

वेलिंग्टन : डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (१५३ चेंडूंत १२८ धावा) त्याचे कसोटी संघातील महत्त्व पुन्हा अधोरेखित करताना शानदार शतक झळकावले. त्यामुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी १६६ षटकांत ९ बाद ७२० धावांवर पहिला डाव घोषित केला. न्यूझीलंडच्या भूमीवरील ही कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली असून भारताला आता सोमवारी पाचव्या दिवशी विजयासाठी आणखी ८ बळींची आवश्यकता आहे.

वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर गुरुवारपासून सुरू असलेल्या या लढतीत भारताने पहिल्या डावात एकूण ३५२ धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने चौथ्या दिवसअखेर ४५ षटकांत २ बाद ११९ धावा केल्या आहेत. ते अद्याप २३३ धावांनी पिछाडीवर असून डेवॉन कॉन्वे ५९, तर रचिन रवींद्र २७ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे किवी संघ पाचव्या दिवशी भारताला विजयापासून रोखत लढत अनिर्णित राखणार की भारताचे गोलंदाज उर्वरित ८ बळी मिळवून मालिकेत आघाडी घेणार, हे पाहणे रंजक ठरेल.

दरम्यान, नवरात्रोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर येथे भारताच्या न्यूझीलंडवारीला प्रारंभ झाला होता. २२ ऑक्टोबरपासून भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून त्यांनी सलग तिसऱ्यांदा टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने टी-२० मालिकेत ३-२ अशी बाजी मारली. त्यानंतर भारताने एकदिवसीय मालिकेत ३-१ असे यश संपादन केले. या मालिकेतील पहिल्या तीन लढतीत शुभमन गिलने भारताचे नेतृत्व केले, तर उर्वरित दोन सामन्यांत श्रेयस भारताचा कर्णधार होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली या ताऱ्यांचा हा अखेरचा न्यूझीलंड दौरा ठरला. दिवाळीच्या काळात या दोघांचीही बॅट काहीशी शांत राहिली. आता या दोघांना पुन्हा भारताकडून खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांना डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

आता दिवाळी पार पडल्यानंतर भारतीय संघ कसोटीच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात २ कसोटी सामने होणार आहेत. उभय संघांतील या लढतीत भारताने प्रथम गोलंदाजी करताना न्यूझीलंडचा पहिला डाव ३६८ धावांत गुंडाळला. मग तिसऱ्या दिवसअखेर भारताने ४ बाद ४८६ धावांपर्यंत मजल मारून १००हून अधिक धावांची आघाडी घेतली होती. भारताकडून के. एल. राहुलने शतक साकारले, तर कर्णधार गिलला (९८) शतकाने हुलकावणी दिली. रविवारी चौथ्या दिवसाला प्रारंभ करताना पंत आणि नाइट वॉचमन अंशुल कंबोज यांनी उत्तम सुरुवात केली.

पंतची फटकेबाजी

पंत व कंबोज यांनी पाचव्या विकेटसाठी झटपट ६८ धावांची भर घातली. कंबोजने फलंदाजीत आपले कौशल्य दाखवताना ६ चौकार व १ षटकारासह ४२ चेंडूंतच ३८ धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने त्याला बाद करून ही जोडी फोडली. पंतने मात्र १० चौकार व ६ षटकारांसह कसोटीतील नववे शतक झळकावले. परदेशातील त्याचे हे सातवे शतक आहे. पंत व ध्रुव जुरेल यांनी सहाव्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली. पंतने ९९ धावांवर षटकार खेचून शतक झळकावले, हे विशेष.

अखेर रवींद्रच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळतानाच पंत १२८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने जुरेलने आक्रमक फलंदाजी करताना भारताची आघाडी ३०० धावांपलीकडे नेले. २५ वर्षीय जुरेलने ७ चौकार व १ षटकारासह कसोटीतील तिसरे अर्धशतक साकारले. जुरेल-सुंदरने सातव्या विकेटसाठी ५४ धावांची भर घातली. सुंदरने २६ चेंडूंत २४, तर आकाश दीपने ५ चेंडूंत १३ धावांचे योगदान दिले. अखेरीस फिलिप्सने जुरेलला ७८ धावांवर यष्टिचीत केले व भारताने १६६ षटकांत ९ बाद ७२० धावांवर पहिला डाव घोषित केला. भारताला एकूण ३५२ धावांची आघाडी मिळाली.

न्यूझीलंडचे प्रत्युत्तर

न्यूझीलंडची दुसऱ्या डावातही सुरुवात खराब झाली. कर्णधार टॉम लॅथमला बुमराने सलग दुसऱ्या डावात शून्यावरच तंबूत धाडले. मात्र पहिल्या डावातील शतकवीर हेन्री निकोल्स व कॉन्वे यांनी संघाला सावरले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. निकोल्स ३१ धावांवर असताना प्रसिध कृष्णाच्या उसळत्या चेंडूवर शॉर्ट लेगला जुरेलने त्याचा एकहाती अप्रतिम झेल टिपला. कॉन्वेने मात्र ६ चौकारांसह कसोटीतील १४वे अर्धशतक साकारले. त्याला रवींद्रने ३ चौकारांसह नाबाद २७ धावा फटकावून साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५९ धावा जोडल्या असून भारताला फारसे यश मिळू दिले नाही. आता पाचव्या दिवशी न्यूझीलंडचे फलंदाज कितपत तग धरणार, याकडे लक्ष लागून असेल.

आकडे चुकवू नका!

१ - पंत हा दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (सेना) या चारही देशांमध्ये कसोटी शतक झळकावणारा पहिला आशियाई यष्टिरक्षक ठरला. तसेच अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, विराट कोहली आणि के. एल. राहुल यांनी हा पराक्रम केला आहे.

७२० - ७२० ही परदेशातील भारताची सर्वोच्च कसोटी धावसंख्या ठरली. यापूर्वी २००४ मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने ७ बाद ७०५ धावा केल्या होत्या. भारताच्या कसोटी इतिहासातील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.

५ - भारताच्या पहिल्या पाचही फलंदाजांनी किमान ५०हून अधिक धावा केल्या. परदेशातील कसोटीत भारताने प्रथमच हा पराक्रम केला.

३ - बुमरा हा कसोटीच्या दोन्ही डावांतील पहिल्याच षटकात बळी मिळवणारा तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी एस. श्रीशांत (२००६ वि. वेस्ट इंडिज) व झहीर खान (२००७ वि. बांगलादेश) यांनी अशी कामगिरी नोंदवली होती.

७ - या डावात भारतीय फलंदाजांनी आणखी एक विक्रम नोंदवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सलग सात अर्धशतकी भागीदाऱ्या झाल्या.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड (पहिला डाव) : ३६८

भारत (पहिला डाव) : १६६ षटकांत ९ बाद ७२० घोषित (के. एल. राहुल १३६, ऋषभ पंत १२८)

न्यूझीलंड (दुसरा डाव) : ४५ षटकांत २ बाद ११९ (डेवॉन कॉन्वे नाबाद ५९, रचिन रवींद्र नाबाद २७)

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उद्यानात पोलीस गस्त, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक मागणीला केराची टोपली; उद्यान समिती अध्यक्षांचे पत्र दुर्लक्षितच

पुण्यात १९ विदेशी महिलांचे बेकायदा वास्तव्य

सरकारची खऱ्या प्रश्नांना बगल - अभिजीत दीपके

कुख्यात दाऊद टोळीच्या गुंडाला दुबईत अटक

कोयनेचे पाणी आता मुंबईकडे वळवणार