फिरकीपटूंविरुद्ध भारताची कसोटी; गॉल येथे आजपासून श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना; संघनिवडीचा पेच कायम 
क्रीडा

फिरकीपटूंविरुद्ध भारताची कसोटी; गॉल येथे आजपासून श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना; संघनिवडीचा पेच कायम

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला शनिवारी गॉल येथे सुरुवात होत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ फिरकीला अनुकूल असलेल्या श्रीलंकेच्या खेळपट्टीवर आपली लाल चेंडूंतील कामगिरी सुधारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

Swapnil S

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला शनिवारी गॉल येथे सुरुवात होत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ फिरकीला अनुकूल असलेल्या श्रीलंकेच्या खेळपट्टीवर आपली लाल चेंडूंतील कामगिरी सुधारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकपदाच्या काळात भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक जिंकून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये मायदेशात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या पराभवांमुळे भारताच्या 'जागतिक कसोटी चॅम्पियनशिप' (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशांना धक्का बसला आहे.

गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेचा फिरकीचा दबदबा राहिला आहे. यजमान संघाकडे प्रभात जयसूर्या आणि रमेश मॅडिस यांच्यासारखे प्रभावी फिरकीपटू आहेत. भारतीय फलंदाजीचा मुख्य आधार कर्णधार शुभमन गिल असणार आहे. याशिवाय के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, रिषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

भारतीय गोलंदाजीत कुलदीप यादव, मानव सुतार आणि रवींद्र जडेजा या तीन फिरकीपटूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांना जलद गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा साथ देतील. श्रीलंकेचा संघ धनंजय डी सिल्व्हाच्या नेतृत्वात मैदानात उतरेल.

या मालिकेसाठी भारतीय संघात फिरकी अष्टपैलू सारांश जैन आणि वेगवान गोलंदाज आकिब नबी या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशसाठी सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल ३३ वर्षीय सारांश जैनचे गंभीर यांनी अभिनंदन केले. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराच्या जागी संघात स्थान मिळालेल्या नबीच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ प्रथमच श्रीलंकेत कसोटी सामना खेळणार आहे. आतापर्यंत त्याच्या नेतृत्वात भारताने फक्त इंग्लंडमध्येच परदेशात कसोटी मालिका खेळली होती, हे विशेष.

भारताने गेल्या १८ वर्षांत श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका गमावलेली नाही. २००८ मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध अखेरची कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर भारताने ५ वेळा त्यांना कसोटी मालिकेत धूळ चारली, तर २०१०ची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती.

भारत ४ वर्षांनी प्रथमच श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. २०२२मध्ये उभय संघांत भारतात अखेरची कसोटी मालिका झाली होती. त्यावेळी भारताने २-० असे यश संपादन केले होते. तसेच २०१७नंतर प्रथमच भारतीय संघ श्रीलंकेत कसोटी मालिका खेळणार आहे.

डब्ल्यूटीसीमध्ये भारताची सद्यस्थिती कशी?

जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत भारतीय संघ सध्या पाचव्या स्थानी आहे. भारताने ९ पैकी ४ कसोटी जिंकल्या आहेत, तर ४ कसोटींत त्यांचा पराभव झाला आहे. १ लढत अनिर्णित राहिली आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात ५२ गुण असून त्यांची टक्केवारी ४८.१५ इतकी आहे.

डब्ल्यूटीसीमध्ये टक्केवारीनुसार संघांची क्रमवारी ठरवली जाते. ऑस्ट्रेलिया ८७.५० टक्क्यांसह अग्रस्थानी आहे, तर दक्षिण आफ्रिका ७५ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अनुक्रमे न्यूझीलंड (७२.२२%) आणि बांगलादेश (५८.३३%) यांचा क्रमांक लागतो.

भारताचे आता २०२५-२७च्या डब्ल्यूटीसी मालिकेतील ९ कसोटी सामने अद्याप शिल्लक आहेत. श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ प्रत्येकी २ कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर जानेवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ ५ कसोटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येईल. भारताला अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याकरता ९ पैकी किमान ७ कसोटी जिंकणे व १ अनिर्णित लढत हे समीकरण परवडू शकते. तसेच ते फक्त एकच पराभूव स्वीकारू शकतात.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : शुभमन गिल (कर्णधार), के.एल. राहुल, आकिब नबी, गुर्नूर ब्रार, रवींद्र जडेजा, सारांश जैन, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, सर्फराझ खान, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत, प्रसिध कृष्णा, मानव सुतार.

श्रीलंका : धनंजय डीसिल्व्हा (कर्णधार), कामिंदू मेंडिस, दिनेश चंडिमल, निरोशन डिकवेला, सोनल दिनुशा, निशान फर्नांडो, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो, लाहिरू इगालागमगे, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका, रमेश मेंडिस, केशरा नुवांथा.

थेट प्रक्षेपण: सोनी टेन १, ३ वाहिनी आणि सोनी लिव्ह अॅप ; वेळ : सकाळी १० वाजता

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Independence Day 2026 : 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमला लाल किल्ला; ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक क्षण, Videos

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

मुंबई अग्निशमन दलाच्या १३ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक

नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास बंदी; उच्च न्यायालयाचा निर्णय

कुत्र्यांची 'नसबंदी' वेगाने करा! उच्च न्यायालयाचे आदेश