भारत-श्रीलंका कसोटी मालिका : भारत विजयाच्या उंबरठ्यावर! जिंकण्यासाठी आणखी ६ बळींची गरज; श्रीलंका चौथ्या दिवसअखेर ४ बाद ८४ (Photo-X)
क्रीडा

भारत-श्रीलंका कसोटी मालिका : भारत विजयाच्या उंबरठ्यावर! जिंकण्यासाठी आणखी ६ बळींची गरज; श्रीलंका चौथ्या दिवसअखेर ४ बाद ८४

डावखुरा फलंदाज ऋषभ पंतच्या ६९ चेंडूंतील ६६ धावांच्या झुंजार खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

Swapnil S

गॉल : डावखुरा फलंदाज ऋषभ पंतच्या ६९ चेंडूंतील ६६ धावांच्या झुंजार खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ३७२ धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेची चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद ८४ अशी स्थिती असून भारतीय संघ विजयापासून फक्त ६ बळी दूर आहे.

दुसऱ्या डावात ऋषभ पंत (६६), देवदत्त पडिक्कल (४४) आणि के. एल. राहुल (३५) यांच्या उपयुक्त योगदानाच्या बळावर भारताने १९३ धावांपर्यंत मजल मारली. यामुळे श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७२ धावांचे कठीण आव्हान उभे राहिले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यजमान श्रीलंकेला विजयासाठी अजूनही २८८ धावांची गरज असून कर्णधार धनंजय डीसिल्व्हा (३१) आणि सोनल दिनुषा (२५) क्रीझवर टिकून आहेत.

आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. मोहम्मद सिराजने निशान फर्नांडोला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर प्रसिध कृष्णाने कामिंदू मेंडिसला के. एल. राहुलकरवी झेलबाद केले. दुखापतग्रस्त दिनेश चंडीमलच्या जागी कन्कशन सब्सिट्यूट म्हणून आलेला पासिंदू सुरियाबंडारा पहिल्याच चेंडूवर डाव्या हाताचा फिरकीपटू मानव सुथारच्या गोलंदाजीवर पायचित झाला. सुथारने पुढे लहिरू उदारालाही बाद करत श्रीलंकेला चौथा धक्का दिला.

भारताच्या दुसऱ्या डावात देवदत्त पडिक्कलने आक्रमक फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. त्यानंतर ऋषभ पंतने ५३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. लहिरू कुमाराच्या चेंडूवर षटकार मारून पंतने कसोटी कारकीर्दीतील १०० वा षटकार नोंदवला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील सर्वात जलद फलंदाज ठरला आहे. पंतने रवींद्र जडेजासोबत सहाव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली.

तत्पूर्वी सलामीवीर यशस्वी जैस्वाल अवघ्या एका धावेवर असिथा फर्नांडोचा बळी ठरला, तर के. एल. राहुल आणि कर्णधार शुभमन गिल फिरकीपटू प्रभात जयसूर्याच्या गोलंदाजीवर बाद झाले. अखेरच्या टप्प्यात भारतीय फलंदाजांनी पटापट विकेट्स गमावल्या तरीही श्रीलंकेसमोर एक डोंगराएवढे आव्हान उभे करण्यात भारत यशस्वी ठरला. गॉल मैदानावर यापूर्वी ३४४ धावांचे यशस्वी पाठलाग झालेला असून इतिहास पाहता श्रीलंकेसमोरील मार्ग अत्यंत बिकट मानला जात आहे.

दरम्यान, २०२४च्या टी-२० विश्वचषकानंतर प्रशिक्षकपद स्वीकारणाऱ्या ४४ वर्षीय गौतम गंभीरच्या कार्यकाळात भारताची कसोटीतील कामगिरी सुमार राहिली आहे. भारताने एकीकडे मर्यादित षटकांच्या प्रकारात २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, तर २०२६मध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. मात्र कसोटीत न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या संघांकडून भारताला मायदेशातच दारुण पराभव पत्करावा लागला. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका गमावली. त्यामुळे गंभीरच्या प्रशिक्षणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

इंग्लंडविरुद्ध गतवर्षी भारताने शुभमन गिलच्या नेतृत्वात जेमतेम २-२ अशी बरोबरी साधली. आता अनेक अनुभवी खेळाडू निवृत्त झालेले असताना भारतीय संघ २०२७ या वर्षात प्रथमच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप-डब्ल्यूटीसी) सामना खेळत आहे. भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध जूनमध्ये कसोटी सामना खेळला होता. मात्र ती लढत डब्ल्यूटीसीचा भाग नव्हती. त्यामुळे २०२७च्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी पात्र ठरायचे असल्यास भारताला उर्वरित ९ कसोटींमध्ये कामगिरी उंचवावी लागेल.

भारत ४ वर्षांनी प्रथमच श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. २०२२मध्ये उभय संघांत भारतात अखेरची कसोटी मालिका झाली होती. त्यावेळी भारताने २-० असे यश संपादन केले होते. त्याशिवाय भारताने गेल्या १८ वर्षांत श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका गमावलेली नाही., हे विशेष. २००८मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध अखेरची कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर भारताने ५ वेळा त्यांना कसोटी मालिकेत धूळ चारली, तर २०१०ची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. त्यामुळे भारताचेच पारडे यंदाही मालिका विजयासाठी जड मानले जात आहे.

संक्षिप्त धावफलक

  • भारत (पहिला डाव) : ४६२

  • श्रीलंका (पहिला डाव) : २८४

  • भारत (दुसरा डाव) : ४८.५ षटकांत सर्व बाद १९३ (ऋषभ पंत ६६, देवदत्त पडिक्कल ४४; असिथा फर्नांडो ४/३१)

  • श्रीलंका (दुसरा डाव) : ३४ षटकांत ४ बाद ८४ (धनंजय डीसिल्व्हा नाबाद ३१, सोनल दिनुषा नाबाद २५; मानव सुथार २/३०)

पंतचे षटकारांचे शतक

भारताचा आक्रमक फलंदाज ऋषभ पंतने पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी एक दुर्मिळ आणि ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीदरम्यान पंतने सर्वात जलद १०० षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. त्याने अवघ्या ५१व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी करून दाखवली. मुख्य म्हणजे २०१८मध्ये पंतने १८ ऑगस्ट रोजीच इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले होते. यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स याने ८२ व्या कसोटीत १०० षटकार पूर्ण केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बेन स्टोक्स (१३८ षटकार), न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम (१०७ षटकार) आणि ऑस्ट्रेलियाचा ॲडम गिलख्रिस्ट (१०० षटकार) यांच्या पाठोपाठ पंत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी पंतच्या नावावर ९७ षटकार जमा होते. पहिल्या डावात त्याने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या ९८ षटकारांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती आणि दुसऱ्या डावात १०० चा टप्पा ओलांडला. भारतीयांमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा प्रत्येकी ९१ षटकारांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. एकूणच पंतने केलेला हा विक्रम कौतुकास्पद आहे, यात शंका नाही.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

उच्चस्तरीय समिती स्थापण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; दिल्ली विद्यार्थी आंदोलनातील पोलिसांच्या अतिरेकाची चौकशी

दारुडा मुख्याध्यापक निलंबित; हिंगोलीत दीपकेंचा दणका, ‘स्कूल ठीक करो’ आंदोलनाचे पहिले यश

ओपन AI ने लाँच केले ‘चॅट जीपीटी फॉर टीन्स’

विदेशी निधीचा खेळ,एफसीआरएची लढाई

आजचे राशिभविष्य, १९ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत