नवी दिल्ली : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात शुक्रवार, १० ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी फलंदाजांना पोषक खेळपट्टी बनवण्यात येणार आहे. ही लढत चार ते पाच दिवसांपर्यंत लांबावी, या हेतूने खेळपट्टीवरील गवत काढण्यात आले आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (कोटला) भारत-विंडीजमधील दुसरी कसोटी रंगणार आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच दुबईत आशिया चषक टी-२० स्पर्धा विक्रमी नवव्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर आता शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने विंडीजला पहिल्या कसोटीत एक डाव आणि १४० धावांच्या फरकाने धूळ चारली. ही लढत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रातच संपुष्टात आली. त्यामुळे विंडीजच्या फलंदाजांवरही टीका झाली. तर खेळपट्टीही गोलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे समोर आले. आता दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघांतील फलंदाज धावांच्या राशी उभारण्यास आतुर असतील.
पहिल्या कसोटीत भारताकडून के. एल. राहुल, रवींद्र जडेजा व ध्रुव जुरेल यांनी शतके झळकावली. विंडीजचा पहिला डाव १६२ धावांत गुंडाळल्यावर भारताने पहिल्या डावात ५ बाद ४४८ धावांपर्यंत मजल मारून डाव घोषित केला. मग विंडीजचा दुसरा डाव भारताने तिसऱ्या दिवशी ४५.१ षटकांत १४६ धावांत गुंडाळून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
दरम्यान, साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर अद्याप छाप पाडू शकलेला नाही. त्यामुळे त्याला आणखी एक संधी दिली जाणार का, याकडे लक्ष असेल. या मालिकेनंतर थेट नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातच दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. सर्फराझ खान, देवदत्त पडिक्कल असे युवा फलंदाज संधीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच ऋषभ पंत परतल्यावर ध्रुव जुरेलचे संघातील स्थान कायम राहणार का, याकडेही लक्ष असेल.
कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा हे आशिया चषक खेळून लगेचच कसोटी मालिकेसाठी दाखल झाले. त्यामुळे बुमरा किंवा कुलदीपला विश्रांती दिली जाऊ शकते.