लखनौ : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या आव्हानासाठी सज्ज होत आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला मंगळवारपासून प्रारंभ होत असून पहिली लढत लखनौ येथील इकाना स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
या सामन्यात संजू सॅमसनला सलामीला उतरवायचे की १५ वर्षांचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला संधी द्यायची, हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसमोर मोठा पेच असणार आहे. आशियाई स्पर्धेकरता व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी तात्पुरत्या स्वरूपासाठी प्रशिक्षकपद सांभाळले. तेथे अभिषेक शर्माच्या साथीने वैभव सलामीला आला, तर सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. गंभीरने मात्र विश्वचषक विजयातील सलामीच्या जोडीला प्राधान्य दिले जाईल, असे संकेत दिले आहेत. तसेच आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी असावी, यासही गंभीर व संघ व्यवस्थापन सातत्याने महत्त्व देत आहे.
गंभीरच्या धोरणानुसार, अभिषेक सलामीवीर म्हणून आधीच निश्चित असल्याने तो सॅमसन आणि वैभव या दोघांना एकाच संघात खेळवण्याची शक्यता कमी आहे. तसेच लखनौच्या इकाना स्टेडियमची आव्हानात्मक खेळपट्टी पाहता, गंभीर सॅमसनला पुन्हा सलामीवीर म्हणून मैदानात उतरवण्यास उत्सुक असेल आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीचा पर्यायही त्यामुळे उपलब्ध असेल.
आशियाई स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर चाचपडताना दिसला. परंतु अफगाणिस्तानविरुद्धच्या मागील मालिकांमध्ये त्याने दोन अर्धशतके झळकावली होती. संघात इशान किशन, कर्णधार श्रेयस, तिलक वर्मा, शिवम दुबे, रेड्डी आणि अक्षर पटेल आधीपासूनच मध्यक्रमात उपलब्ध असल्यामुळे वैभव किंवा सॅमसनपैकी एकाचाच संधी मिळेल, हे पक्के आहे.
प्रशिक्षक गंभीरसमोर वेगवान गोलंदाजीची बाजू निवडणे ही आणखी एक डोकेदुखी ठरत आहे. जसप्रीत बुमराला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत डावखुरा अर्शदीप सिंग गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्याच्या साथीला दिल्लीचे दोन युवा गोलंदाज मयांक यादव आणि प्रिन्स यादव असतील. फिरकी गोलंदाजीची धुरा अक्षर पटेल आणि कुलदीप यादव सांभाळणार आहेत. जर गंभीरला फलंदाजी मजबूत करायची असेल, तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संघात आलेल्या नमन धीरला मयांक किंवा प्रिन्स यांच्यापैकी एकाच्या जागी संधी मिळू शकते.
श्रेयसची दुहेरी कसोटी
२०१२ आणि २०१६ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या आणि या प्रकारात पॉवरहाऊस मानल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्ध श्रेयसच्या नेतृत्वाची कसोटी लागेल. श्रेयसच्या नेतृत्वात भारताने जून-जुलै महिन्यात आयर्लंड व इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका गमावली होती. मग झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानसारख्या क्रमवारीत खाली असलेल्या संघाविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्या. नुकताच झालेल्या आशियाई स्पर्धेतही श्रेयसला दोन सामन्यांत १००च्या स्ट्राइक रेटनेदेखील धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे त्याच्यावर फलंदाजीत छाप पाडण्याचेही दडपण असेल. टी-२० विश्वचषक विजेत्या सूर्यकुमार यादवची हकालपट्टी करून श्रेयसकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. यावर अनेकांनी त्यावेळी नाराजी दर्शवली होती. आता श्रेयसला कामगिरीद्वारे टीकाकारांची तोंडे बंद करणे गरजेचे आहे. दुसरीकडे उपकर्णधार तिलक वर्मा, इशान किशन, अभिषेक शर्मा या डावखुऱ्या फलंदाजांचे त्रिकुट भन्नाट फॉर्मात आहे.
बेधडक फलंदाजी विंडीजची ताकद; गोलंदाज मात्र अडचणीत
वेस्ट इंडिज संघात रोमारिओ शेफर्ड, रोव्हमन पॉवेल, शिम्रॉन हेटमायर असे धडाकेबाज फलंदाज व इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचा, भारतीय परिस्थितीचा अनुभव असलेले अनेक खेळाडू उपलब्ध आहेत. शाय होपच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज हा कोणत्याही दिवशी कोणत्याही संघाचा पराभव करण्यास सक्षम असा घातक टी-२० संघ आहे. कर्णधार होपशिवाय त्यांची फलंदाजी प्रामुख्याने हेटमायर, पॉवेल आणि विरोधी संघाचा नंबर एक टी-२० फलंदाज शर्फेन रुदरफोर्ड यांच्यावर अवलंबून असेल. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रोस्टन चेस, किमो पॉल, पॉवेल आणि शेफर्ड यांचा संघात समावेश आहे. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजी विभागाचे नेतृत्व चेन्नई सुपर किंग्जचा डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज अकील होसेन आणि वेगवान गोलंदाज शामर जोसेफ करणार आहेत. डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज गुडाकेश मोती आणि चेसची ऑफ-स्पिन गोलंदाजी त्यांच्या आक्रमणाला अधिक धार देईल.
घरच्या मैदानावर वेस्ट इंडीजविरुद्धच्या शेवटच्या १० पैकी ९ सामने जिंकल्यामुळे भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. तसेच २०१७नंतर विंडीजने भारताला भारतामधील टी-२० मालिकेत एकदाही नमवलेले नाही. २०२२नंतर विंडीज प्रथमच भारतीय दौऱ्यावर टी-२० मालिका खेळणार आहे.
खेळपट्टी-वातावरण
लखनौ येथील खेळपट्टी क्रमांक पाचवर ही लढत खेळवण्यात येणार आहे. काळ्या व लाल मातीची संमिश्र खेळपट्टी या सामन्यासाठी वापरण्यात येईल. पावसाचे या लढतीवर सावट नसल्याने चेंडू आणि फळीतील दमदार संघर्ष पाहायला चाहत्यांना मजा येईल.
मालिकेचे वेळापत्रक
पहिली टी-२० लढत : मंगळवार, ६ ऑक्टोबर (लखनौ)
दुसरी टी-२० लढत : शुक्रवार, ९ ऑक्टोबर (रांची)
तिसरी टी-२० लढत : रविवार, ११ ऑक्टोबर (इंदूर)
चौथी टी-२० लढत : बुधवार, १४ ऑक्टोबर (हैदराबाद)
पाचवी टी-२० लढत : शनिवार, १७ ऑक्टोबर (बेंगळुरू)
प्रतिस्पर्धी संघ
भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, नितीश रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयांक यादव, नमन धीर.
वेस्ट इंडिज : शाय होप (कर्णधार), ज्वेल अँड्रू, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिम्रॉन हेटमायर, अकील होसेन, आमिर जांगू, शामर जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, कामिल पूरन, रोव्हमन पॉवेल, शर्फेन रुदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, रोमारिओ शेफर्ड, शामर स्प्रिंगर.
वेळ : सायंकाळी ७ वाजता ; थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २ वाहिनी आणि जिओहॉटस्टार ॲप