पदकांचा रौप्यमहोत्सव! भारताची दिवसभरात ७ सुवर्णांसह तब्बल २५ पदकांना गवसणी 
क्रीडा

पदकांचा रौप्यमहोत्सव! भारताची दिवसभरात ७ सुवर्णांसह तब्बल २५ पदकांना गवसणी

जपान येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी सुरू ठेवली असून भारताची एकूण पदकांची संख्या ८९ वर पोहोचली आहे.

Swapnil S

नागोया : जपान येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी सुरू ठेवली असून भारताची एकूण पदकांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. यामध्ये २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ४१ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या या घोडदौडीत ॲथलेटिक्समध्ये ५२ पदके जिंकत मोलाचे योगदान दिले आहे.

दोन्ही हात नसलेल्या भारताच्या प्रतिभावान तिरंदाज शीतल देवीने दोन तासांपेक्षा कमी वेळात दोन सुवर्णपदके जिंकून आशियाई पॅरा गेम्समध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक विजेती आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या १९ वर्षीय शीतल देवीने प्रथम तोमन कुमारसोबत मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या तेओडोरा ऑडी आयुडिया फेरेली आणि केन स्वागुमिलांग यांच्यावर १५१-१४८ अशी मात केली.

त्यानंतर शीतलने वैयक्तिक अंतिम फेरीत सिंगापूरच्या अलीम नूर स्याहिदाहचा १४२-१३९ असा पराभव केला. सुरुवातीला चार गुणांनी पिछाडीवर असूनही तिने संयम राखत विजय मिळवला. हांगझोऊ २०२३ स्पर्धेतील अंतिम फेरीचीच पुनरावृत्ती या सामन्यात पाहायला मिळाली. भारताच्या स्वर्णा राज यांनी महिलांच्या एफ५४ थाळीफेक प्रकारात १५.६६ मीटर अंतराची सर्वोत्तम फेक नोंदवत दिवसाची सुरुवात सुवर्णपदकाने केली. वयाच्या ४४ वर्षी सुवर्णाने सलग चार वेळा १५ मीटरहून लांब फेफे मारत आपल्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा विजय मिळवला. याशिवाय पुरुषांच्या उंच उडी टी-६३ प्रकारात शैलेश कुमारने १.८९ मीटरचा खेळ करत सुवर्णपदक पटकावले, तर वरुण भाटीने रौप्य आणि राहुलने कांस्यपदक जिंकले.

ट्रॅक आणि फील्ड प्रकारात भारताचे वर्चस्व कायम राहताना अंजनबेन बुंबडिया आणि दिलीप महादू गावीत यांनी आपापल्या ४०० मीटर टी-४७ स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली. बुंबडियाने ५९.९७ सेकंद वेळ नोंदवत महिलांचे सुवर्ण जिंकले, तर गावीटने ४८.२७ सेकंद वेळ नोंदवून पुरुषांच्या विभागात बाजी मारली. याशिवाय धर्मराज सोलाईराजने टी-४४/६२/६४ प्रकारात ७.१५ मीटर लांब उडी मारत आशियाई विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक कायम राखले.

बॅडमिंटनमध्ये अंतिम फेरीत

पुरुषांच्या एसएल३ एकेरीत प्रमोद भगतने कोरियाच्या ली सेउंघूचा १६-२१, २१-१८, २१-१७ असा पराभव केला. दोन तास नऊ मिनिटे चाललेल्या या लढतीनंतर त्याची अंतिम फेरीत नितेश कुमारशी गाठ पडणार आहे. त्यामुळे या प्रकारातील सुवर्ण आणि रौप्य दोन्ही पदके भारताला मिळणार हे निश्चित झाले.

पॅरिस पॅरालिम्पिक विजेता नितेश कुमारने पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरी या दोन्ही प्रकारांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने एकेरीत इंडोनेशियाच्या एम. इम्रानचा २१-१९, २१-१६ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत थुलसिमती मुरुगेसनसोबत खेळताना भारतीय जोडीने चीनच्या जोडीवर मात केली. नवीन शिवकुमारनेही पुरुष एकेरी एसएल४ प्रकाराची अंतिम फेरी गाठली.

टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलला कांस्य

भाविना पटेल आणि शुभम वाधवा या भारतीय जोडीने मिश्र दुहेरी एक्स७ प्रकारात कांस्यपदक मिळवले. उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाच्या जांग योंगजिन आणि ली मिग्यू यांच्याकडून भारतीय जोडीला ६-११, ११-८, ५-११, ८-११ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जोडीला सरळ गेममध्ये पराभूत करून त्यांनी पदक निश्चित केले होते.

एकूणच सलग तिसऱ्या दिवशी भारताने २४ किंवा त्याहून अधिक पदके कमावून खळबळ माजवली.

भारताच्या खात्यात २१ सुवर्ण, २७ रौप्य, ४१ कांस्य अशी एकूण ८९ पदके जमा असून पदकतालिकेत भारताने चौथे स्थान प्राप्त केले आहे. चीन १५० सुवर्णपदकांसह अग्रस्थानी विराजमान आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! दिवाळीनंतर कसारा मार्गावर १५ डब्यांच्या लोकल वाढणार

MLC Election 2026 : शिक्षक, ‘पदवीधर’साठी आज मतदान; मतदानासाठी यंत्रणा सज्ज; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात

CJP चे आज देशव्यापी आंदोलन; दीपके, राकेश टिकैतसह परकला सीतारामन, प्रकाश राज यांची उपस्थिती

मतवारी दुष्काळाची! छतावरचं पाणी, घरासमोरची टाकी; ब्राझीलची दहा लाख टाक्यांची चळवळ

नांदेड : दसरा गेला अंधारात, आता दिवाळीचं काय? फुले अक्षरशः फेकली रस्त्यावर; शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघाला नाही