नवी मुंबई: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी (दि.२) रात्री नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर इतिहास रचला. एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी धूळ चारत पहिल्यांदाच आयसीसी वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी केली. शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने हा ऐतिहासिक विजय साकारला. या विजयासह भारताने २००५ आणि २०१७ च्या अंतिम सामन्यांमधील पराभवाच्या जखमा पुसल्या आणि ऑस्ट्रेलिया (७), इंग्लंड (४) आणि न्यूझीलंड (१) यांच्यासह विश्वचषक विजेत्यांच्या यादीत स्थान मिळवले.
नाणेफेकीचा कौल जिंकून आफ्रिकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय भारतासाठी चांगला ठरला. भारताची सलामीची जोडी शफाली वर्मा (७८ चेंडूत ८७) आणि स्मृती मानधना (५८ चेंडूत ४५) ने तब्बल १०६ चेंडूंमध्ये १०४ धावांची भागीदारी रचत आक्रमक सुरूवात करून दिली. स्पर्धेत दुसराच सामना खेळणाऱ्या शफालीने आफ्रिकेच्या जवळपास सर्वच गोलंदाजांवर सुरूवातीपासूनच हल्ला चढवला. भारत ३०० पार धावसंख्या उभारणार असे वाटत असताना आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगला मारा करीत मधल्या टप्प्यात भारतीय फलंदाजांना वेसण घातले. जेमिमा रॉड्रीग्स (३७ चेंडूत २४) कर्णधार हरमनप्रीत कौर (२९ चेंडूत २०) अमनजोत कौर (१४ चेंडूत १२ धावा) यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. अखेरीस दिप्ती शर्मा आणि रिचा घोषने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने ५० षटकांत २९८ धावा जमवल्या आणि आफ्रिकेसमोर २९९ धावांचे आव्हान ठेवले. दिप्ती शर्मा ५८ धावा काढून धावबाद झाली, तर रिचाने २४ चेंडूत ३४ धावा फटकावल्या. राधा यादव तीन धावांवर नाबाद राहिली.
आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉलफर्डची एकाकी झुंझ
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ६२ धावांवरच दोन गडी गमावले होते. एका बाजूने गडी बाद होत असताना आफ्रीकेची कर्णधार लॉरा वॉलवार्डने मात्र अप्रतिम फटकेबाजी करीत एकाकी झुंज दिली. सून लूस (३१ चेंडूंत २५) हिच्यासोबत वॉलवार्डने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. पण शफाली वर्माने ही जोडी फोडली. त्यानंतर भरवशाच्या मारिझान कापलाही शफालीने झटपट बाद केले. सिनालो जाफ्ताला दिप्ती शर्माने १६ धावांवर बाद केले. तरीही वॉलवार्डची फटकेबाजी सुरूच होती. एनेरी डर्कसनने कर्णधाराची साथ देण्याचा प्रयत्न केला, पण ३५ धावांवर दिप्तीने तिला बोल्ड केले. त्यानंतर अखेर झुंझार शतकी खेळी करून कर्णधार लॉरा वॉलवार्डही बाद झाली. दिप्तीने तिला अमनजोत कौरकडे झेल देण्यास भाग पाडले. लॉराने ९८ चेंडूत १०१ धावा केल्या. यासोबत आफ्रिकेच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या. संघाच्या २२० धावा असताना लॉराच्या रुपात आफ्रिकेने सातवी विकेट गमावली. त्यानंतर, तळाच्या फलंदाजांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस आफ्रिकेचा डाव ४५.३ षटकांत २४६ धावांवर संपला.
दिप्ती शर्मा, शफाली वर्माची अफलातून कामगिरी
भारताकडून दिप्ती शर्मा आणि शफाली वर्माने अष्टपैलू खेळी केली. दिप्तीने फलंदाजी करताना ५८ चेंडूत ५८ धावा फटकावल्या. तसेच, ९.३ षटकांत ३९ धावांत आफ्रिकेचा निम्मा संघही टिपला. तर, शफाली वर्मानेही आक्रमक फटकेबाजी करीत ७८ चेंडूत ८७ धावांची खेळी करीत संघाला दमदार सलामी दिली. शिवाय ७ षटके गोलंदाजी करताना ३६ धावा देताना मोक्याच्या क्षणी दोन विकेटही घेतल्या. या अफलातून कामगिरीसाठी शफालीला प्लेयर ऑफ द मॅच तर संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या दिप्तीला प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कार मिळाला. दिप्तीने या स्पर्धेत ९ सामन्यांत २१५ धावा फटकावल्या. शिवाय तब्बल २२ विकेट घेत ती स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाजही ठरली.